Sun, Aug 09, 2020 11:30



होमपेज › Satara › मृत्यूशय्येवर असणारी पाटणची स्मशानभूमी नक्‍की कोणासाठी?

मृत्यूशय्येवर असणारी पाटणची स्मशानभूमी नक्‍की कोणासाठी?

Published On: Jul 12 2018 1:44AM | Last Updated: Jul 11 2018 7:47PM



पाटण : प्रतिनिधी 

‘शेवट गोडं व्हावा’ असं म्हटलंच नव्हे तर ठरवलंही जातं. मात्र हे किमान पाटणवासियांच्या तरी नशिबात नाही हीच वस्तुस्थिती. पाटणच्या हजारोंच्या लोकसंख्येला असणारी एकमेव स्मशानभूमीच गेली अनेक वर्षे मृत्यूशय्येवर असल्याने जन्मभर नागरी सुविधांअभावी मरण यातना सोसूनही येथे शेवट काही केल्या गोड होतच नाही. पण ... असू द्या त्या प्रेताला अथवा त्यांच्या अंत्यविधीला आलेल्यांची भलेही येथे गैरसोय होत असली तरी कुत्र्यांसाठी भर पावसात, थंडीत उब निर्माण करणारी हीच स्मशानभूमी तळीरामांच्यासाठी चांगलीच सोयीस्कर ठरतेय हेही नसे थोडके असे म्हणण्याची वेळ नक्कीच पाटणवासियांवर आली आहे. 

‘जन्मभर जळल्यावरही मेल्यानंतर जाळतात. लाकडापेक्षाही माणसचं लाकडाचे गुणधर्म पाळतात’. ही चारोळी कदाचित पाटण वासियांसाठीच तयार केली आहे की काय ? असा सामान्य प्रश्‍न येथे पडतो. कारण जन्माला आल्यापासून ते थेट शेवट सरणावर जाईपर्यंतच्या नागरी सुविधांची येथे वाणवा अनुभवायला मिळते. पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, स्वच्छता या मुलभूत सुविधा समस्यांचा सामना येथे नित्याचाच असतो आणि मग या सार्‍याला कंटाळून जेव्हा जगाचा निरोप घेण्याची वेळ येते त्यावेळी या ठिकाणच्या एकमेव स्मशानभूमीची अवस्था पहाता माणसांना पुन्हा जगण्याची आशा निर्माण होते हीदेखील कदाचित यातील उपहासाची सकारात्मक बाजू असू शकते. पावसाळा वगळता अन्य दिवसात हे अंत्यसंस्कार अथवा त्याच्याशी निगडीत विधी हे नदीकाठीच केले जातात.

मात्र पावसाळ्यात नदीचे पात्र, पाणी, चिखल या सर्व पाश्वभूमीवर स्मशानभूमीतच सध्या आहे त्या स्थितीतच हे सोपस्कार उरकले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असणार्‍या या स्मशानभूमीची अवस्था म्हणजे केवळ येथे स्मशानभूमी आहे एवढेच तांत्रिक व मानसिक समाधान मानावे लागते. पुर्णपणे सडलेल्या, गंजलेल्या पत्र्याच्या सहाय्याने लोखंडी पोलवर कसा बसा जगण्याचा प्रयत्न करणारी हीच स्मशानभूमी अक्षरशः शेवटच्या घटका मोजत आहे. येथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असते की तो विधी उरकेपर्यंतही उभे रहाणे अशक्य होते. उखडलेल्या फरशा, कचरा, कुजलेली घाण दुर्गंधी व डासांचे प्रमाण लक्षात घेता मग मान्यवरांसह बरेच जण संबंधित कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे अगदीच जवळच्या मंडळी सोबतच संबंधितांना या जगाचा अखेरचा निरोप घ्यावा लागतो आणि मग शेवटपर्यंत त्याची ही दयनीय अवस्था कायमच त्याचा पाठलाग करते. 

निश्‍चितच याचा नगरपंचायतीसह संबंधित सर्वांनीच गांभीर्याने विचार करावा. पावसाळ्यात होणारे त्या प्रेतांसह संबंधित नागरीकांची तरी या मरण यातनातून किमान सोडवणूक व्हावी एवढ्याच स्थानिकांच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.