Mon, Jul 06, 2020 16:31होमपेज › Satara › लाखाच्या रोकडसह १३ तोळ्यांवर डल्ला

लाखाच्या रोकडसह १३ तोळ्यांवर डल्ला

Published On: Aug 14 2019 11:24PM | Last Updated: Aug 14 2019 10:51PM
कोडोली : वार्ताहर

सातारा शहरातील विलासपूर या उपनगरामध्ये बुधवारी पहाटे दोन चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून जबरी चोरी केली. चोरट्यांनी तब्बल 1 लाख रुपये व 13 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्‍ला मारला. चोरट्यांना वृद्ध दाम्पत्याने अटकाव केला व त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी ऐवज घेऊन पळ काढला. या थरारक घटनेमुळे राधिका कॉलनी हादरून गेली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलिस कसून तपास करत आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वसंतराव जाधव हे पत्नी कुसुम जाधव (वय 72) यांच्यासह राधिका कॉलनी, विलासपूर येथे वास्तव्य करत आहेत. त्यांची दोन्ही मुले पुणे येथे कामानिमित्त आहेत. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून ते झोपी गेले. त्यांच्या घरामध्ये एकूण तीन खोल्या आहेत. यामधील हॉलमध्ये हे वृद्ध दाम्पत्य झोपले होते. हॉलमधील दरवाजाला आतून कडी लावली होती. तर किचनलाही पाठीमागून आतून कडी लावलेली होती. हे दाम्पत्य झोपी गेले असतानाच बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास किचनच्या बाजूने चोरटे आले. दरवाजा आतून बंद असल्याने चोरट्यांनी कटावणीने त्या दरवाजाची कडी तोडली व आत प्रवेश केला.

चोरटे हॉललगत बेडरुममध्ये गेले. बेडरुममध्ये कपाट उघडे होते. त्यातील लॉकरला लॉक असल्याने चोरट्यांनी किल्‍ली शोधली असता त्यांना तेथेच किल्‍ली सापडली. चोरट्यांनी किल्‍लीद्वारे लॉकर उघडून त्यातील रोख 1 लाख रुपये व 13 तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज चोरला. यादरम्यान हणमंतराव जाधव यांना जाग आली. बेडरुममध्ये त्यांना चोरटे असल्याचे लक्षात येताच त्यांनी चोरट्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे चोरटे गांगरले व ते जाधव यांच्या अंगावर धावून जात बेडरुममधून बाहेर आले व किचनच्या दरवाजाने कटावणी तेथेच टाकून पळ काढला.  जाधव दाम्पत्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. चोरटे घरातून बाहेर पळून गेल्यानंतर काही अंतरावर लावलेल्या दुचाकीवरुन पळून गेले. वृध्द दाम्पत्याने चोरट्यांचा काहीवेळ पाठलागही केला.

सुमारे 10 मिनिटे हा थरार सुरु होता. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक जागे झाले. घटनेबाबत वृध्द दाम्पत्याने माहिती दिल्यानंतर परिसरातील नागरिक हडबडून गेले. यानंतर शहर पोलिस ठाण्यात फोन करुन माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिस, श्‍वान पथक, ठसे तज्ञ यांनी भेट दिली. पोलिसांनी घटनेची माहिती घेतली असता संशयित दोन्ही चोरट्यांनी टी शर्ट व हाफ बर्म्युडा घातला होता. रस्त्यालगतच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. मात्र बुधवारी रात्रीपर्यंत चोरट्यांचा मागमूस लागला नव्हता.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी दरोडेखोरांनी धुडगूस घातला होता. पोलिसांनी काही संशयितांना गजाआड केली असतानाच सातारा शहरालगत पुन्हा वृध्द दाम्पत्य पाहून चोरी केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. यासाठी पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी होवू लागली आहे.वसंतराव हणमंतराव जाधव यांनी याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.