फलटण : प्रतिनिधी
फलटणजवळील नाईकबोमवाडी ते तातमगिरी रस्त्यावर घोडे उड्डाण क्षेत्र परिसरात एका 25 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून करून मृतदेह फेकून दिला आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, रविवारी सकाळी ती निदर्शनास आली. पोलिसांनी शहर व कोळकी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून श्वानपथकही पाचारण करण्यात आले होते.
संबंधित युवकाचा मृतदेह गाडीतून आणून कच्च्या रस्त्यापासून 30 फुटांपर्यंत फरफटत आणून फेकल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. मृताच्या डाव्या हातावर सचिन असे इंग्रजी अक्षरात लिहिले आहे तर डाव्या हाताच्या आतील बाजूस आई व उजव्या हातावर आतील बाजूस आर्लू व उजव्या अंगठ्यालगत इंग्रजी आर अक्षर गोंदले आहे. अंगावर काळ्या रंगाचा फुलबाह्याचा टीशर्ट, त्यावर लाल व पांढरे पट्टे व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र श्वान तेथेच घुटमळले.
दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या. फलटण पोलिसांनी फलटण शहर तसेच कोळकी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असून त्याआधारे धागेदोरे सापडतात का हे पाहिले जात आहे. त्याचप्रमाणे बारामती शहर व ग्रामीण, नातेपुते, दहिवडी, लोणंद पोलिस ठाण्यांशीही संपर्क साधला आहे.
संबंधित मृत युवक फलटण तालुक्यातील नसून बाहेरून आणून मध्यरात्रीच्या सुमारास त्याला ठार मारण्यात आल्याची शक्यता स्थानिकांतून व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिस पाटील हणमंत किसन बिचुकले यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भगवान बुरसे करत आहेत.