Sat, Jul 11, 2020 09:28होमपेज › Satara › शरद पवार यांच्यावरील टिकेबाबत उदयनराजे म्हणाले...

शरद पवार यांच्यावरील टिकेबाबत उदयनराजे म्हणाले...

Last Updated: Jul 01 2020 11:09AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

मेडिकल कॉलेज मागेच उभे व्हायला पाहिजे होते. आतापर्यंत इमारत बांधून प्रवेशही झाले असते.कोनशिलेवर कोणाचीही नावे घ्या; पण काम करा. ज्यांनी आता उचल घेतली आहे. त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. केंद्रपातळीवर काही मदत लागली तर कमी पडणार नाही, अशा शब्दात खा. उदयनराजे भोसले यांनी मेडिकल कॉलेजच्या प्रश्नावरून जोरदार फटकेबाजी केली. मंगळवारी दुपारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक मंडळाची बैठक होती. यावेळी खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले हे बँकेत आले. यावेळी या दोघांनी नेहमीप्रमाणे चेष्टा मस्करीही केली.

पत्रकारांशी बोलताना खा. उदयनराजे म्हणाले, एसीबी प्रकरणात संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका अधिकार्‍यांमुळे सातारा नगरपालिका बाद आहे असे म्हटल्यास  अधिकारी व कर्मचारी कामच करणार नाहीत.यापुर्वीही अनेक अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले आहेत. त्यासाठी कडक कायदाच करावा.

कोरोनाचा कोणीही बाऊ करू नका. आतापर्यंत अनेकांना कोरोना होऊनही गेलेला असेल. जगात तीन अब्ज व्हायरस आहेत. त्यामुळे लोकांनी कोरोनाला घाबरून जाण्यापेक्षा वस्तूस्थितीला सामोरे जावे. कोरोना कधी संपणार हे कोणीच सांगू शकणार नाही. आज ना उद्या प्रत्येकाला जायचे आहे. त्यामुळे घाबरू नका, असा सल्लाही खा. उदयनराजे यांनी दिला. 

यावेळी पत्रकारांनी त्यांना  आ. पडळकर यांनी खा. शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेबाबत विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, या प्रकरणात माझा काही संबंध नाही. ज्यांनी कोणी कोणावर टीका केली ती त्यांनी मला विचारून केली नाही. तसेच या टीकेवर ज्यांनी उत्तर दिले त्यांनी मला विचारले नव्हते. ज्यांनी टीका केली आणि ज्यांनी उत्तर दिले  त्यांचं ते बघून घेतील, असे ते म्हणाले. 

खा. उदयनराजे पुढे म्हणाले, बंदमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्या चोरमोर्‍या वाढणार आहेत. लोक काम करायला इच्छुक आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी व काम करावे. यावर गॅरंटेड लस निघेल असे सांगता येत नाही. जेवढे मृत्यू विविध आजारांनी, सीमेवर आणि वृध्दावस्थेमुळे झालेत. त्यापेक्षा दहापटीने मृत्यू रस्ते अपघातात झालेत. कोरोनाचा इतका बाऊ करू नका. आता लोक काम करायला तयार आहेत. विविध राज्यातून आलेले कामगार होते, ते ही परत येत आहेत. प्रत्येकाला आपली प्रतिकार क्षमता वाढवावी लागणार आहे.

गोव्यात मी महिनाभर होतो, तेथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी माझी भेट झाली. येथून गेलेले कामगार परत येत आहे. कारण त्यांना तिकडे रोजगार नाही. उपासमारीमुळे ते कोरोनात गावी गेले होते. कोरोना कधी संपणार हे कोणीच सांगू शकणार नाही. आज ना उद्या प्रत्येकाला जायचे आहे घाबरू नका, असे आवाहनही त्यांनी केले.