Sat, Jul 11, 2020 19:50होमपेज › Satara › भगीरथ दाखवा अन् १०१ रुपये मिळवा  : आ. जयकुमार गोरे

भगीरथ दाखवा अन् १०१ रुपये मिळवा  : आ. जयकुमार गोरे

Published On: Jun 13 2019 9:01PM | Last Updated: Jun 13 2019 9:01PM
सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात सुमारे २२५ टीएमसी पाणी साठवले जाते. मात्र, अपेक्षेप्रमाणे दुष्काळी भागांना त्याचा लाभ मिळत नाही. जिल्ह्याने अनेक मुख्यमंत्री, मंत्री दिले पण जिल्ह्याचा दुष्काळ हटला नाही. निरा-देवधर धरणाचे पाणी खंडाळा, फलटण या तालुक्यांसाठी आरक्षित असताना बारामतीला पाणी नेण्याचा निर्णय झाला. तरीही रामराजेंनी भूमिका मांडली नाही. पंचवीस वर्षांच्या काळात मंत्री असताना त्यांनी आपल्या मातीशी बेईमानी केली. त्यांनीच नीरा-देवधरचे पाणी बारामतीला पाणी नेऊ दिले, असा घणाघात आ. जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत केला. गेली पंधरा-वीस दिवस झाले रामराजे कुठे आहेत? ‘भगीरथ’ दाखवा आणि १०१ रुपयांचे बक्षिस मिळवा, अशी टीकाही आ. गोरे यांनी केली.

आ. जयकुमार गोरे म्हणाले, फलटण मतदारसंघाने रामराजेंच्या घराण्यावर प्रेम केले. मात्र, जिल्ह्यातील तालुके दुष्काळी ठेवून बारामतीला पाणी देण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. टेंभू उपसा सिंचन योजनेतून २२. १३ टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहंकाळ या तालुक्यांतील २३७ गावांना दिले जाते. सातारा जिल्ह्यातील फक्त ३ गावांनाच या योजनेचा लाभ मिळतो. ताकारी-म्हैसाळ योजनेतून सुमारे २६ टीएमसी पाणी दिले जाते. त्यातून सातारा जिल्ह्यातील एक इंचसुध्दा जमीन भिजत नाही. हे पाणी वाळवा, पलूस, खानापूर, मिरज, सांगोला आदी सांगली व सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांना देण्यात येते. या ५२ टीएमसीपैकी फक्त ०.०७ टीएमसीच पाणी जिल्ह्याच्या वाट्याला येते. 

सत्ता आणि मंत्रीपद असतानाही हे पाणी जिल्हा दुष्काळी ठेवून इमाने-इतबारे बाहेर जावू दिले. पाणी धोरणासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर रामराजेंच्या सह्या आहेत. शरद पवार, अजित पवार यांच्यावर संपूर्ण सातारा जिल्ह्याने प्रेम केले. मोदी लाट असतानाही त्यांच्या पक्षाच्या आमदारांना ४०-५० हजारांचे मताधिक्क्य दिले. त्याच जिल्ह्यावर त्यांनी अन्याय केला. निरा-देवधरचे पाणी वंचित दुष्काळी तालुक्यांना मिळवून एक मिशन पूर्ण केले. जिल्ह्यातील उर्वरित दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळत नाही तोपर्यंत जिल्ह्याबाहेर एकही पाण्याचा थेंब बाहेर जावू देणार नाही. सरकारने दखल घेवून जिल्ह्याचा दुष्काळ हटवावा, अन्यथा परिणामांना सामोरे जावे, असा इशाराही आ. जयकुमार गोरे यांनी दिला. 

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, बारा वर्षांपूर्वी बारामतीला दिलेले पाणी मी खासदार झाल्यावर बारा दिवसांत बारा जूनला बंद केले. दुष्काळी तालुक्यांना पाणी दिल्याचे समाधान आहे. जिल्ह्यातील वंचित दुष्काळी भागाला पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न करणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.