Connection Error लोकसभेच्या हॅट्ट्रिकसाठी उदयनराजे मैदानात | पुढारी 
Sun, Jul 12, 2020 19:08होमपेज › Satara › लोकसभेच्या हॅट्ट्रिकसाठी उदयनराजे मैदानात

लोकसभेच्या हॅट्ट्रिकसाठी उदयनराजे मैदानात

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 15 2018 1:58AMसातारा : प्रतिनिधी

लोकसभेच्या हॅट्ट्रिकसाठी खा. उदयनराजे पुन्हा मैदानात उतरत असून जिल्हा परिषदेच्या मैदानावर 24 फेब्रुवारी रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरातील नेत्यांना निमंत्रण देऊन उदयनराजे यांनी मोठी खेळी खेळली आहे.  उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी सातारा विकास आघाडीकडून जंगी नियोजन सुरू आहे. 

जिल्हा परिषदेच्या मैदानावर तमाम जनतेच्या साक्षीने होणारा हा सोहळा नेटका पार पडावा यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी सातारा पालिकेच्या मंगल कार्यालयात मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाची उत्कंठा जिल्हावासीयांना लागली आहे.  खा. उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त सातार्‍यात विकासकामांच्या रूपाने महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात येणार आहेत. कास तलावाची उंची वाढविणे, भुयारी गटर योजना भूमीपूजन, सातारा पालिका नव्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन, घनकचरा प्रकल्प शुभारंभ अशा विकासकामांचा धडाक्यात शुभारंभ करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्‍त होत असलेल्या या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी साविआ पदाधिकार्‍यांची तसेच कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी सातारा पालिकेच्या मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीत कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. 

या बैठकीस जि.प.चे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, जि.प.चे माजी  उपाध्यक्ष रवी साळुंखे,  अशोक सावंत, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, सौ. गीतांजली कदम, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, सभागृह नेत्या स्मिता घोडके, संदीप शिंदे, सभापती यशोधन नारकर, श्रीकांत आंबेकर, मनोज शेंडे, स्नेहा नलवडे, नगरसेविका सुजाता राजेमहाडिक, डॉ. संजोग कदम, विजय नायकवडी, विजय भिलारे, राजेंद्रसिंह यादव, डॉ. महेश गुरव, जयवंत पवार, भाऊ जाधव, सुनील सावंत, समृध्दी जाधव आदि उपस्थित होते. 

अशा आहेत नियोजन समित्या...
खा. उदयनराजे वाढदिवस नियोजनाच्या अनुषंगाने कार्यकारी समिती, स्टेज कमिटी, सत्कार समारंभ समिती, बैठक व्यवस्था समिती, प्रसार माध्यम समिती, आरोग्य व व्यवस्था समिती, अल्पोपाहार व्यवस्था समिती, वाहनतळ व्यवस्था समिती अशा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमधील सदस्यांना कामे विभागून देण्यात आली आहेत. प्रत्येकाला स्वतंत्र जबाबदार्‍या देण्यात आल्या. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामकाजाबाबत चर्चा केली. बैठकीवेळी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यांवर कमालीचा उत्साह व जोश होता.