Mon, Aug 10, 2020 04:19होमपेज › Satara › सावधान, बिबट्या सावज शोधतोय!

सावधान, बिबट्या सावज शोधतोय!

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:26PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी 

दोन दिवसांपूर्वी अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण दरवाजाच्या बाजूला दोन बिबटे दिसले असून पैकी एकाने किल्ल्यावरच चरत असलेल्या एका शेळीवर हल्ला करून ठार केले आहे. फलटणमध्येही बिबट्या घुसल्याचे  सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या दोन्ही घटनांवरून बिबट्या आपले सावज शोधण्यासाठी शहरात येत असल्याचे चित्र आहे. ‘सावधान बिबट्या सावज शोधतोय’, अशी परिस्थिती ओढवली असून बिबट्याचा नागरी वस्तीकडे होणारा शिरकाव वन विभागासाठी चिंतेचा तर नागरिकांसाठी घबराटीचा विषय बनला आहे. 

अजिंक्यतारा किल्ल्यावर फिरायला जाणार्‍या नागरिकांना दक्षिण दरवाजाजवळ काही दिवसांपूर्वी सायंकाळी 6 च्या दरम्यान दोन बिबटे दिसले होते. या बिबट्यांचे नागरिकांनी फोटोही काढले. त्यातील एका बिबट्याने जगन्नाथ पवार यांच्या शेळीवर हल्ला करून तिला ठार केले होते. त्यानंतर तो बिबट्या पसार झाला होता. तर फलटणमध्येही एका चित्रपटगृहाच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसला  आहे.  तेथील नागरिकांनीही आपण बिबट्या पाहिल्याचे सांगितले. या दोन घटनांवरून काही दिवसांमध्ये बिबट्या आपले सावज शोधण्यासाठी शहरापर्यंत येऊन ठेपल्याचे चित्र  आहे. जंगलाच्या अधिवासात शिकार मिळत नसल्याने बिबटे शहराच्या परिसरात येत असल्याने पाळीव प्राण्यांबरोबरच लोकांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

खिंडवाडीनजिक दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग ओलांडणारा बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला होता. तेव्हापासूनच बिबट्यांचे वारंवार दर्शन होऊ लागले आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर सर्रास बिबटे पहायला मिळत आहेत. ते आता मानवी वस्तीकडे वळू लागल्याने वन विभागाने त्यांना रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

किल्ले अजिंक्यतारा परिसरात बिबट्याचा वावर काही नवा नाही.  डोंगरावर अनेकांना यापूर्वीही बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यावर उपाययोजना करण्याबाबत वन विभागाला अनेकांनी कळवले होते. मात्र, तरीही ठोस उपाययोजना न झाल्यानेच अपघातांमध्ये बिबटे ठार झालेली उदाहरणे आहेत.

संरक्षक कुंपणाची मागणी प्रलंबितच

खिंडवाडीच्या पट्टयात महामार्गाच्या पश्‍चिमेकडे घनदाट जंगल आहे. तेथून श्‍वापदे अगदी सहजपणे महामार्गाच्या व नागरी वस्तीच्या दिशेने जावू शकतात. महामार्गालगत जंगलाभोवती संरक्षक कुंपण उभे करण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सातार्‍याच्या कास, ठोसेघर, अजिंक्यताराच्या दिशेनेही  अनेकदा बिबट्याचा वावर दिसून आला आहे. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सातारकरांनी केली आहे.