Tue, Aug 04, 2020 14:12होमपेज › Satara › कुडाळ : केवळ बिलाच्या वसुलीसाठी भर पावसात रस्‍त्‍याचे डांबरीकरण 

कुडाळ : केवळ बिलाच्या वसुलीसाठी भर पावसात रस्‍त्‍याचे डांबरीकरण 

Last Updated: Jul 09 2020 9:25PM
कुडाळ : पुढारी वृत्तसेवा  

जावळी तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या कुडाळमध्ये गावच्या चौकात चक्क भरपावसात डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. बांधकाम विभागाच्या नियुक्त ठेकेदाराकडून हे काम केले जात असल्याने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा होत असल्याचा प्रत्यय नागरिकांना आला.  

जावली तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच कुडाळ तालुका जावली येथील मुख्य चौकात वरून पाऊस पडत असताना बांधकाम ठेकेदार व बांधकाम विभागाचा कर्मचाऱ्यांकडून काळाकुट्ट डांबर रस्त्यावर वाहणाऱ्या पावसात टाकण्याचे काम सुरू होते. त्यावर डांबरीकरणाचे सपाटीकरणाचे कामही सुरू होते. या संदर्भात विचारणा केली असता, असं सगळं चालतं असे म्हणत संबंधित काटकर नावाच्या कर्मचाऱ्यांने पावसात तसेच डांबरीकरणाचे काम चालू ठेवले. त्‍यामुळे या रस्‍त्‍याच्या कामाविषयी नागरिकांमधून आश्चर्य हा संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. 

लाखो रुपयांचा निधी टाकून कुडाळ, पाचवड, मेढा या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते. मात्र वेळेत काम न झाल्याने हे काम बिल वसुलीसाठी चक्क पावसाळ्यामध्ये सुरू करण्यात आले आहे. वरून पाऊस पडत असताना वाहत्‍या पाण्यात केलेले डांबरीकरण कितपत टिकेल असे नागरिकातून प्रश्न उपस्‍थित करण्यात येत आहेत.  

नियमाप्रमाणे 25 मे पासून डांबरीकरण नियमबाह्य असून, पावसाळ्यात केलेले डांबरीकरण टिकून राहत नाही. असे असताना देखील सर्व नियम धाब्यावर बसवत केवळ बिलाच्या वसुलीसाठी धो-धो पावसात टाकले जाणारे लाखो रुपयांचे डांबरीकरण नेमके कोणाच्या घशामध्ये जाणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.

सर्व बांधकामे 25 मे पासून बंद करण्यात येत असतात, मात्र कुडाळ पाचगणी व कुडाळ चौकातील मार्गाचे काम सुरु आहे. निकृष्ट काम होत असून, अधूनमधून पाऊस पडत असल्याने डांबरीकरण उखडत आहे. संबंधित तांत्रिक अधिकारी कधीही कामाच्या ठिकाणी दिसून आलेले नाहीत. सदर डांबरीकरण टाकलेले काम पूर्णतः निकृष्ट असून पावसाळ्यात होत असल्याने गुणवत्ता तपासणी करण्याची आवश्यकता आहे.