Wed, Jul 15, 2020 18:10होमपेज › Satara › जयकुमार गोरेंच्या भाजप प्रवेशाने समीकरणे बदलणार

जयकुमार गोरेंच्या भाजप प्रवेशाने समीकरणे बदलणार

Published On: Sep 02 2019 1:34AM | Last Updated: Sep 01 2019 11:16PM
खटाव : अजय.अं.कदम

माण-खटावचे काँग्रेसचे आ. जयकुमार गोरे यांनी शनिवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. जयकुमार गोरेंबरोबर काँग्रेसचे अनेक पदाधिकारीही  भाजपवासी होणार असल्यामुळे  माण-खटावसह जिल्ह्यातील बहुतांशी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. गोरेंच्या भाजप प्रवेशाविरोधात आमचं ठरलय असे म्हणत एकत्र आलेल्या भाजपा व इतर पक्षातील नेत्यांची आता गोची झाली आहे. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले शेखर गोरे आणि राष्ट्रवादीचे  प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे  कोणत्या हालचाली करणार याकडे  दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागले आहे. मतदारसंघातील म्हसवड नगरपरिषद, वडूज व दहीवडी नगरपंचायतींवर स्थानिक गटांच्या सोयीचे राजकारण पाहून सत्ता स्थापन करण्यात आल्या आहेत. जयकुमार गोरेंच्या भाजप प्रवेशामुळे काही ठिकाणी उलेटफेर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्हा काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तडकाफडकी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना लोकसभेचे तिकीटही मिळाले होते. जयकुमार गोरे यांनी त्या सर्व घडामोडींमध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. निंबाळकरांना  उघड पाठिंबा देत त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडूनही आणले होते.  मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्या निवडणूकीदरम्यानच जयकुमार गोरेंचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. खा. निंबाळकरांच्या विजयाचे श्रेय घेण्याची शेखर गोरे आणि आमचं ठरलय टीममधील डॉ. दिलीपराव येळगावकर, अनिल देसाई यांच्यात चढाओढ लागली होती. सर्वांनी आमच्यामुळेच निंबाळकर खासदार झाल्याचे ठासून सांगितले होते.

लोकसभा निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंच्या भाजप नेतेमंडळींबरोबर वाढलेल्या सलगीचा धसका घेत माजी आमदार येळगावकर आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी हालचाली वाढवत समविचारींना एकत्र आणायचा प्रयत्न केला. आमचं ठरलय असे म्हणत देसाई, येळगावकरांसह राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. संदीप पोळ,  शिवसेनेचे रणजीत देशमुख तसेच रासप, राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांनी जयकुमार गोरे हटाव ही मोहीम हाती घेतली. गोरेंच्या विरोधात एकच उमेदवार उभा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्यामुळे माण-खटावच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण झाल्याचे चित्र उभे राहिले होते. आमचं ठरलय या टीमचा सर्व आटापीटा जयकुमार गोरेंना भाजपमध्ये प्रवेश मिळू नये म्हणून चालला होता. मात्र जयकुमार गोरेंचे ठरायचे ते चार महिन्यांपूर्वीच ठरले होते. त्यांनी मुख्यमंत्री आणि जलसंपदा तसेच सहकारमंत्र्यांच्या मदतीने जिहेकठापूर योजनेतून माणच्या उत्तर भागातील 32 गावांसाठी अडीचशे कोटींची योजना मंजूर करुन आणली. आता एका आठडवड्यातच मुख्यमंत्री या योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी माणमध्ये येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत खा. निंबाळकरांना पाठिंबा देणार्‍या शेखर गोरेंनी गेल्या महीन्यात शिवसेनेत प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकारणाला आणखी कलाटणी मिळाली आहे. गेल्या वेळी माण  मतदारसंघ रासपकडे होता. आता युती झाली तर हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येणार याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सगळे ठरल्याप्रमाणे झाले आहे, असे म्हणत जयकुमार गोरेंनी काहीही झाले तरी युतीचे उमेदवार तेच असतील असे संकेत दिले आहेत.

विरोधी राष्ट्रवादीनेही गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात रान उठवायला सुरुवात केली आहे. माजी आयुक्‍त प्रभाकर देशमुखांनी निवडणूक लढवण्यासाठी हालचाली सुरु ठेवल्या आहेत. मात्र चार दिवसांपूर्वी माण तालुक्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेला त्यांची अनुपस्थिती दिसली. मुंबईतही काही घडामोडी घडल्याचे कानावर येत आहे. त्याच वेळी खटाव राष्ट्रवादीने आता आम्हाला संधी मिळालीच पाहिजे असे म्हणत वातावरण तापविले आहे. माजी आमदार प्रभाकर घार्गे इच्छुक दिसत असले तरी ते आमचं ठरलय टीमबरोबर भाजपाच्या मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना भेटल्याचे कानावर येत आहे. राष्ट्रवादीतील ताज्या घडामोडी पहाता देशमुख आणि घार्गे सोडून दुसर्‍याच कट्टर शिलेदाराला निवडणूक लढवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. डॉ. संदीप पोळ आणि माजी उपसभापती संदीप मांडवे यांच्या त्यादृष्टीने हालचाली सुरु आहेत.

मतदारसंघातील म्हसवड नगरपरिषद, वडूज आणि दहीवडी नगरपंचातींमध्ये जयकुमार गोरेंच्या भाजप आणि शेखर गोरेंच्या शिवसेना प्रवेशामुळे थोडेफार उलटफेर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूकीनंतर ते चित्र पहायला मिळणार आहे.