होमपेज › Satara › जाखणगाव जलसंधारणाची परदेशी पाहुण्यांना भुरळ!

जाखणगाव जलसंधारणाची परदेशी पाहुण्यांना भुरळ!

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:26PM

बुकमार्क करा
खटाव : प्रतिनिधी  

खटाव तालुक्यातील जाखणगावच्या जलसंधारणाची दखल आता जागतिक पातळीवर घेण्यात आली असून 14 देशांच्या जलदूतांनी  जाखणगावमध्ये चक्क दोन दिवसांचा मुक्काम ठोकून गावकर्‍यांनी केलेल्या जलसंधारण कामाची पाहणी केली. जलसंवर्धनाच्या या अनोख्या  कामांनी पाहुण्यांना अक्षरशः भुरळ पाडली. गेल्या 8 वर्षात जाखणगावने डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाची अनेक कामे केली आहेत.  हजारो   लोकांनी या गावाला भेट देवून पाणी अडविण्याचे धडे गिरविले आहेत. आता 14 देशातील जलदूत या कामाचा डंका आपापल्या देशात वाजवणार आहेत. कॉक्स स्कॉलर प्रोग्रॅम या आंतरराष्ट्रीय संस्थेमधील 14 देश शांतता, तंटामुक्ती आणि नेतृत्वगुण विकासाच्या त्रिसुत्रीवर एकत्र येऊन या तत्वप्रणालीचा जगभर प्रसार करत आहेत. वर्ण द्वेष,जागतिक तापमान वाढ, पर्यावरणाचा र्‍हास, प्रदूषण, पाणी अशा  विषयावर अभ्यास करून संस्था प्रतिनिधींद्वारे त्या त्या देशात शांती आणि प्रदूषण मुक्तीचा संदेष देण्याचा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.  फिलिपिन्स, इंडोनेशीया, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, अमेरीका, रशिया, अफगाणिस्तान, अर्मेनिया, केनिया, तिबेट या देशांमधील प्रतिनिधीनी पाणीटंचाईबाबत भारतात भेट देण्याचे आयोजन केले. खटाव तालुक्यातील जाखणगावसारख्या गावाने इतर अनेक गावांना अशी कामे हाती घेण्यासाठी प्रेरित केले. या पार्श्‍वभूमीवर या प्रतिनिधींनी जाखणगावला भेट  दिली.  इथे पावसाचे प्रमाण अत्यल्प असूनही  गावकर्‍यांनी पडणार्‍या पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी सिसीटी, सिमेंट बंधारे, नाला बंडींग,ओढे खोलीकरण आणि रुंदीकरणाबरोबरच बोअर  रिचार्ज, छोट्या नाल्यांवर बांधलेले जे.पी.पॅटर्न, काँक्रिट ब्लॉक  अशी कामे केली. यामधील नाविन्यता पाहून परदेशी पाहुणे चांगलेच प्रभावित झाले.