Tue, Aug 11, 2020 21:55होमपेज › Satara › सातार्‍यात महिन्याला १३५ गुन्हे

सातार्‍यात महिन्याला १३५ गुन्हे

Published On: Dec 02 2017 12:36AM | Last Updated: Dec 01 2017 9:57PM

बुकमार्क करा

सातारा : विठ्ठल हेंद्रे

शहर पोलिस ठाण्याचे विभाजन होवून शाहूपुरी पोलिस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर सातार्‍यातील क्राईम कमी होईल, अशी अपेक्षा असताना तो वर्षानुवर्षे वाढतच असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एकटे शहर पोलिस ठाणे असताना वर्षाला 1100 गुन्हे दाखल होत असताना शाहूपुरी पोलिस ठाण्यासह पाहिल्यास तब्बल 1600 गुन्हे दाखल (सीआर) होत आहेत. दरम्यान, नुकत्याच ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थे’नुसार गुन्हे दाखल होण्यामध्ये देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे.

सातारा शहराचा उपनगराच्या माध्यमातून वेगाने विस्तार होत आहे. कायदा व सुव्यवस्था संभाळणार्‍या पोलिसांची संख्या तेवढीच राहिली. गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत असताना गृह विभागाने तीन वर्षापूर्वी सातारा शहर पोलिस  ठाण्याचे विभाजन करुन शाहूपुरी पोलिस ठाण्याची निर्मिती केली. नव्या पोलिस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर सातार्‍यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल व गुन्हे दाखल होण्याची संख्या घटेल, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे.

साधारणपणे पोलिस ठाण्यात भाग पाच व भाग सहा नुसार गुन्हे दाखल केले केले जात आहेत. भाग पाचमध्ये गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो तर भाग सहामध्ये कमी तीव्रतेच्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश येतो. सातारा शहर हे पेन्शनर्सचे शहर म्हणून ओळखले जात होते. हळूहळू मात्र पेन्शनर्सची ओळख पुसून जावून वाढत्या गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जावू लागले. चेन स्नॅचिंग, घरफोड्या अशा गुन्हेगारीसंबंधी घडणार्‍या घटनांबरोबर सध्या सावकारी, खंडणी, लुटमार, बलात्कार यासारख्या गंभीर प्रकाराने सातार्‍याला विळखा घातला आहे. सततच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराची गुन्हेगारी शहर अशी नव्याने ओळख होवू लागली आहे.

सातारा शहर पोलिस ठाण्यांतर्गत 1 जानेवारी 2017 ते 1 डिसेंबर रोजीपर्यंत तब्बल 976 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये गंभीर गुन्हे दाखल होण्याची संख्या 555 अशी असून भाग सहानुसार 312 गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस कारवाईत सर्वाधिक 90 दारुबंदीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. हे वर्ष संपण्यासाठी अद्याप एक महिन्यांचा कालावधी शिल्‍लक आहे. दर महिन्याला सरासरी 80 गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण आहे. यामुळे वर्षाअखेरीस 1050 ते 1100 गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शाहूपुरी पोलिस ठाण्याअंतर्गत  1 जानेवारी 2017 ते 1 डिसेंबर रोजी अखेर 469 एवढे गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे वर्षअखेरपर्यंत दोन्ही पोलिस ठाण्याअंतर्गत वर्षाला 1600 गुन्हे दाखल होणार आहेत.

महाराष्ट्रात सातारा अव्वल? 

महाराष्ट्रातील सर्व पोलिस ठाण्यांपैकी सातारा शहर पोलिस ठाण्यात सर्वाधिक गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीय असून टॉप थ्रीमध्ये समावेश असण्याची शक्यता पोलिस अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. एका वर्षात 1100 एवढे गुन्हे दाखल होत असल्याने ही शंका रास्त आहे. शहराचा वाढता आवाका लक्षात घेवून सदरबझार किंवा एमआयडीसी पोलिस ठाणे होणे गरजेचे बनले आहे. तत्पुर्वी सातारा शहर पोलिस ठाणे व शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोलिसांची आणखी कुमकवाढवण्याची गरज क्रमप्राप्‍त बनली आहे. सध्या दोन्ही पोलिस ठाण्यामध्ये मिळून पोलिस अधिकारी 22 व कर्मचारी संख्या 260 एवढीच आहे.

एनसीआरबीनुसार गुन्हेगारीत महाराष्ट्र तिसरा

देशपातळीवर राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्था कार्यरत आहे. पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेला क्राईम रजिस्टर (सीआर) असे म्हटले जाते. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या वर्षात प्रत्येक पोलिस ठाण्यात व त्यातून देशात दाखल गुन्ह्यांची संख्या मोजण्याचे काम राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्था करत असते. या आकडेवारीतून कोणत्या राज्यात सर्वाधिक गुन्हे दाखल होत आहेत. कोणत्या प्रकारचे गुन्हे कोणत्या राज्यात सर्वाधिक आहेत. गतवर्षी व यावर्षीचे प्रमाण कसे आहे, अशी सर्व आकडेवारी समजते. यंदा नुकत्याच प्रसिध्द झालेल्या आकडेवारीनुसार देशात उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल होत असून त्याखालोखाल मध्यप्रदेश व तिसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्राचा नंबर लागला आहे.