Tue, May 26, 2020 13:51होमपेज › Satara › सातारा : लोणंदला उभारला सॅनिटायजर फॉगिंग पॉइंट (video)

सातारा : लोणंदला उभारला सॅनिटायजर फॉगिंग पॉइंट (video)

Last Updated: Mar 31 2020 9:10PM
लोणंद (सातारा) : पुढारी ऑनलाईन

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लोणंदकरांनी गांधी चौकात सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायजर (जंतुनाशक) फॉगिंग पॉइंट निर्माण केला आहे. या पॉइंटद्वारे दुचाकी व पादचारी यांच्या अंगावर स्प्रे प्रमाणे सॅनिटायजर फवारले जाऊन संसर्ग होणार नाही अशी व्यवस्था केली आहे. हा राज्यातील नव्हे तर देशातील पहिला पायलट प्रोजक्ट ठरणार आहे. लोणंद पॅटर्न म्हणून शहरातून व गावागावातून याची उभारणी केली जाऊ शकते. अंत्यत कमी खर्चात तयार केलेला या जंतुनाशक हबचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोरोना या संसर्गजन्य विषाणूने संपूर्ण देशातील व राज्यातील वातावरण ढवळून निघाले असताना याचा फैलाव रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. लोणंद येथील भैरवनाथ डोंगर ग्रुपचे सदस्य, एव्हरेस्टवीर प्राजीत परदेशी, अहमद लोणंदवाला व सहकाऱ्यांनी तुर्की देशात उभारलेल्या (जंतुनाशक)  सॅनिटायजर फॉगिंग पॉइंट प्रमाणे लोणंद येथे उभारण्याचा संकल्प केला. त्यानुसार ही कल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कामास सुरुवात केली.

लोणंदच्या गांधी चौकात सुमारे एक हजार लिटर पाण्याच्या टाकीतील पाणी पाइपमधून खाली आणुन सुमारे चार फूट रुंद, सहा फूट उंच व दहा फूट लांब असा ट्रॅक तयार केला. त्यामध्ये सहा ठिकाणी स्प्रे लावण्यात आले आहेत. तर बटन दाबल्यानंतर दहा सेकंद संपूर्ण स्प्रे मोटारसायकल अगर पादचारी यांच्या संपूर्ण अंगावर पडून संपूर्ण शरीर व गाडीवर सॅनिटायजर (जंतुनाशक) पडून जंतुमुक्त अशी संकल्पना आहे. या पाण्याच्या टाकीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सॅनिटायजरचे प्रमाण मिसळले जाणार आहे.

लोणंदच्या शंभर  डॉक्टरांनी एकत्र येऊन उभारलेली रक्षक क्लिनिक या पायलट प्रोजक्ट प्रमाणेच आता लोणंद येथील गांधी चौकात उभारलेला सॅनिटायजर फॉगिंग पॉइंट हा देशातील पहिला ठरणार असून लोणंद पॅटर्न म्हणून ओळखला जाईल.