Wed, Sep 23, 2020 01:47होमपेज › Satara › सरकारमुळे शेतकरी देशोधडीला लागला: अजित पवार

सरकारमुळे शेतकरी देशोधडीला लागला: अजित पवार

Published On: Apr 08 2018 5:01PM | Last Updated: Apr 08 2018 5:15PMदहिवडी : प्रतिनिधी

शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या सरकारविरोधात हल्लाबोल आहे.

महागाई विरोधात सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. त्याला उत्तर दिलं जात नाही. धनगर समाज, मराठा समाज यांना आरक्षण देतो म्हणून दिशाभूल केली जात आहे. 
जाती जातीत, धर्मा धर्मात तणाव निर्माण करणारे भाजप व शिवसेना हे जातीयवादी पक्ष असल्याची टीका आमदार अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सातारा जिल्ह्यात आली असून दहिवडी येथील आयोजित सभेत आ. अजित पवार बोलत होते.

स्व चव्हाण साहेबांनी निर्माण केलेली त्रिस्तरीय पंचायत राज मोडीत काढण्याचे प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप आ. पवार यांनी केला.

आ. धनंजय मुंडे यांनी, चार वर्षे जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारचा वर्धापन दिन ६ एप्रिल ऐवजी १ एप्रिल करा, जनता दररोज फुल होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अटलजी,अडवणीजी, प्रमोद महाजन यांच्या नावाचा विसर पडला असून नेत्यांशी गद्दारी करणारे जनतेशी काय इमान राखणार? असा सवाल विरोधी पक्ष नेते आ. धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.

पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची लायकी आहे का? अच्छे दिनच्या नावावर जनतेला फसवले असून त्याच अच्छे दिन ची चेष्टा घरोघरी होत आहे.
चार वर्षात तरुणांना नोकऱ्या नाहीत तरुण भटकतोय, आणि हे म्हणतात पकोडे विका. अशा पध्दतीने तरुणांची चेष्टा सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही फळबागा शेतकरी तोडून टाकत आहेत. तरीही या निगरगट्ट सरकारला काही फरक पडेना अशा सरकारला उलथवून टाकण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन आ.मुंडे यांनी केले.

यावेळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा अध्यक्ष सुनील माने यांनी मनोगत व्यक्त केले.