Fri, Aug 07, 2020 15:37होमपेज › Satara › गोवेदिगर येथे जवानाचा खून 

गोवेदिगर येथे जवानाचा खून 

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 06 2018 12:08AMवाई : प्रतिनिधी

दारूच्या नशेत मित्रांसमवेत झालेल्या वादावादीतून भारतीय सैन्य दलाचा जवान गणेश बाळू पिसाळ (रा. गोवेदिगर, वय 26) याचा खून झाला असून या घटनेने खळबळ उडाली आहे. मृत गणेश यांचे चुलते कृष्णा तुकाराम पिसाळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील जवान सागर विष्णू पिसाळ (वय 30, रा. गोवेदिगर, ता. वाई, जि. सातारा) आणि सुनील पिलोबा गाढवे (रा. गंगापुरी, वाई ) यांना अटक केली. 

मृत गणेश पिसाळ हे भारतीय सैन्य दलात पठाणकोट येथे नेमणुकीस होते, तर सागर पिसाळ हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात दिल्ली येथे कार्यरत आहेत. गणेश, सागर आणि सुनील हे तिघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. गेल्या दहा दिवसांतील वाईच्या पश्‍चिम भागातील खुनाची ही दुसरी घटना आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश पिसाळ, अमोल पिसाळ, सागर पिसाळ, सुनील गाढवे आणि इतर तीन मित्र असे सात जण सायं. 6.30 वाजल्यापासून धोम धरणानजीक दारू पित बसले होते.

यावेळी मागील वादावरून गणेश आणि अमोल यांच्यात वादावादी झाली. आम्ही गणेशला समजावतो, असे सांगून सागर पिसाळ यांनी अमोल व त्यांच्या साथीदारांना तेथून जाण्यास सांगितले. अमोलला येथून का पाठविले यावरून गणेश, सागर आणि सुनील यांच्यात धक्‍काबुक्‍की झाली. तिघेही नशेत असल्याने कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यातूनच  एकमेकांच्या झटापटीत सागर आणि सुनील यांनी गणेशला गळ्याजवळ व पायाला पकडून  वल्याने यातच काही वेळात गणेशची हालचाल थांबली. घाबरलेल्या अवस्थेत सागर आणि सुुनील यांनी गाडी बोलवून गणेश यास वाईतील ग्रामीण रुग्णालयात आणले.

तेथे डॉक्टरांनी तपासले असता दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच गणेश यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यावरून पोलिसांनी सागर पिसाळ आणि सुनील गाढवे यांना पहाटे साडेचार वाजता अटक केली. वाईचे न्यायाधीश श्रीमती थोरात यांच्यासमोर आरोपींना हजर केले असता सरकारी वकील आर. पी. सोनावणे यांनी सरकारी पक्षाची बाजू  मांडली.

संशयितांना  दि. 8 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पो. नि. विनायक वेताळ यांनी दिली. गणेश याच्या पश्‍चात आई, भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. या घटनेने गोवेदिगर परिसरात शोककळा पसरली असून तणावपूर्ण वातावरणात दुपारी गणेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.