Fri, Oct 30, 2020 04:49होमपेज › Satara › पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; ६ ठार, २० जखमी (video)

पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; ६ ठार, २० जखमी (video)

Published On: Sep 12 2019 8:35AM | Last Updated: Sep 12 2019 12:00PM
लिंब : वार्ताहर 

पुणे- बंगळूर महामार्गावरील सातारा तालुक्याच्या हद्दीत डी मार्ट जवळ मुंबई कडून बेळगावकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुभाजकाला धडकलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू तर २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बेळगावमधील तिघांचा समावेश आहे. अब्बास अली (वय ४२, अनगोळ), विश्वनाथ गड्डी (५५ ,हुक्केरी), रविंद्र अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत अपघात स्थळावरून मिळालेली माहिती अशी की पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एस आर एस कंपनीची ट्रॅव्हल्स केए 01 एएफ 9506 मुंबईहून बेळगावकडे निघाली होती. ही ट्रॅव्हल्स सातारा नजीक असणाऱ्या डी-मार्ट जवळ आली असता टायर फुटून दुभाजकाला धडकलेल्या ट्रकला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्सच्या पुढच्या बाजुचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातात विश्वनाथ विरुप्पाकशी गड्डी (५५ ,हुक्केरी), अब्बास अली (वय ४२, अनगोळ), अशोक रामचंद्र जुनघरे ( वय ५०, रा. दिवदेव वाडी, ता. जावली), डॉ. सचिन शंकर गोंडा - पाटील ( वय ३५), गुंडू तुकाराम गावडे ( वय ३२) यांच्यासह एका अनोळखी एकाचा मृत्यू झाला. याचबरोबर सुमेधा तीरवार ( वय २२), राजश्री जयदीप पाटील ( वय २३), जयदीप रामचंद्र पाटील ( वय ३०, सर्व रा. बेळगाव) यांच्यासह १२ जण जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्स मधून एकूण ३० प्रवासी प्रवास करत होते. यावेळी दोन चालक व क्लिनर ही गाडीत होता.

दरम्यान, या अपघाताची सातारा तालुका पोलिस ठाण्यात माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडवरून वळवत सुरळीत केली आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.