Thu, Jul 02, 2020 19:13होमपेज › Satara › दर नसल्याने शेतकरी झाला हवालदिल

दर नसल्याने शेतकरी झाला हवालदिल

Published On: May 27 2018 11:00PM | Last Updated: May 27 2018 11:00PMतासवडे टोलनाका : प्रविण माळी 

गेल्या सहा महिन्यांपासून शेतकर्‍यांच्या कुठल्याच शेतीमालास दर नसल्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला असून त्याचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. आता जगायचं कसं हा मोठा यक्ष प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला असून हेच का ते अच्छे दिन! असा प्रश्‍न शेतकरी विचारु लागला आहे. 

ऊस हे  वार्षिक पीक असल्यामुळे तसेच त्याचे बिल ही पंधरा ते अठरा महिन्याने शेतकर्‍यांच्या हातात मिळते. त्यामुळे    आपले  आर्थिक बजेट सांभाळण्यासाठी शेतकरी  शेती मध्ये टोमॅटो, कांदा , वांगी , भेंडी तसेच इतर भाजी पिकवतात . पण परंतु गेल्या सहा महिन्यापासुन शेतकर्‍यांच्या कुठल्याही मालाला भाव नाही. सहा महिन्यापुर्वी असणारे कवडीमोल  दर आजही तेच आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या दरामध्ये शेतकर्‍याने पिकास केलेला खर्च सुध्दा निघत नाही. सरकारचा शेतकर्‍यांच्या बाबतीत कथनी आणि करनी मध्ये फार मोठा फरक स्पष्टपणे दिसत असून  सरकार  निव्वळ शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचे ढोंग केले जात आहे. सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा शेतकर्‍यांना किती लाभ झाला हा खरतर संशोधनाचा विषय आहे. सरकारला शेतकर्‍यांचे कोणतेही सोयरसुतक राहिले नसुन सरकार आपल्याच कामात मश्गुल आहे. 

दीडपट हमीभाव  देण्याची वाल्गना करणारे आहेत कुठे? असा प्रश्‍न शेतकरी विचारू लागले आहेत.  शासकीय तसेच निमशासकीय कर्मचार्‍यांना सरकारकडुन प्रत्येक वर्षी  महागाई भत्ता , पगार वाढ, प्रवास खर्च यासारखे निधी दिला जातो. त्याबरोबरच आजपर्यंत सहा वेळा वेतन आयोगही  दिला गेला आहे. त्यामुळे आता शासकीय कर्मचार्‍यांना मिळणारा   सातवा वेतन आयोग हा  महाराष्ट्रासह देशातील तमाम शेतकर्‍यांना वाटप करावा, अशी मागणी शेतकरी आता करू लागले आहेत.  रखरखत्या उन्हात, बोचर्‍या थडींत आणि पाऊसात रात्रंदिवस काबाडकष्ट करणार्‍या शेतकर्‍याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून शेतमालास चांगला  भाव मिळेल या आशेवर शेतकरी दिवस ढकलत आहे. 

उसाचीही अवस्था इतर पिकांसारखी होणार काय?
गेल्या काही वर्षापासून ऊस दर आंदोलनामुळे एफआरपी नुसार शेतकर्‍यांना ऊसास चांगला दर मिळत होता. परंतु  आता एक वर्षापासून साखरेचे आतंरराष्ट्रीय बाजारात दर कोसळले आहेत, साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे, लाखो मेट्रिक टन साखर पडून आहे. अशा प्रकारच्या बातम्या शेतकर्‍यांच्या कानी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे  शेतकरी पुरता धास्तावला आहे.  ऊसाचीही अवस्था इतर पिकाप्रमाणेच होणार काय? असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.