Fri, Dec 04, 2020 03:36होमपेज › Satara › तोतया पत्रकारांकडून अवैध धंद्यांची झाडाझडती 

तोतया पत्रकारांकडून अवैध धंद्यांची झाडाझडती 

Published On: Dec 07 2017 1:30AM | Last Updated: Dec 06 2017 10:59PM

बुकमार्क करा

मारुल हवेली : वार्ताहर

पोलिस टाईम्स (गुन्हे) दैनिकाचे पत्रकार असल्याचे सांगून बुधवारी मल्हारपेठ येथे तोतया पत्रकारांनी अवैध व्यावसायिकांची झाडाझडती घेतली. त्यांच्या कारवाईबाबत संशय आल्याने  नागरिकांनी मल्हारपेठ पोलिसांत याबाबत तक्रार दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार मल्हारपेठ येथे पोलिस टाईम्सचे पत्रकार असल्याचे सांगत जिप्सी गाडीतून आलेल्या पाच तोतया पत्रकारांनी अवैध व्यावसायिकांच्या भेटी घेऊन त्यांची झाडाझडती घेतली. तसेच एकाच्या घरात घुसून अवैध मुद्देमालाची तपासणीदेखील केली. 

पोलिस कर्मचार्‍यांप्रमाणे तपासणी हे पत्रकार करीत असल्याने ग्रामस्थांना संशय आला. काही ग्रामस्थांनी मल्हारपेठ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन या तोतया पत्रकारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गाडी व रोख रक्कम जप्त केली. कारवाईची ही बातमी सर्वत्र पसरताच या तोतया पत्रकारांनी  नागठाणे, अतित, उंब्रज व विहे येथेही असाच प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती. पाटण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, मल्हारपेठचे पोलिस उपनिरीक्षक जावीर यांच्याकडून याबाबत अधिक चौकशी सुरु होती.