Thu, Jun 24, 2021 11:54होमपेज › Satara › पोलिस, मिल्ट्री भरतीच्या सरावासाठी नवा जुगाड  (video)

पोलिस, मिल्ट्री भरतीच्या सरावासाठी नवा जुगाड  (video)

Last Updated: Jul 30 2020 3:26PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने अनेकांचे हाल बेहाल झाले आहेत. पोलिस भरती, मिल्ट्री भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यातच जिम, व्यायामशाळा बंद असल्याने व्यायाम करायचे वांदे निर्माण झाले आहेत. दरम्यान, सातारा येथील युवकांनी नामी शक्कल लढवली आहे. टाकाऊ वस्तूंपासून विविध व्यायामांची साधने तयार करून आपले ध्येय गाठण्याचा मार्ग मोकळा करत आहेत.

महाराष्ट्रामधील जबाबदारीची भूमिका बजावणाऱ्या पोलिस दलावरील कामाचे ताण कमी करण्यासाठी १० हजार जागांवर पोलिस शिपाई भरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यामुळे पोलिस होण्याची इच्छा असलेले अनेक तरुण तयारीला लागले आहेत. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे जिम, व्यायामशाळा बंद आहेत. त्यामुळे युवकांसमोर सराव कसा आणि कुठे करायचा असे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. 

 पोलिस भरती, मिल्ट्री भरतीसाठी इच्छुकांना आपली शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी रोज साधारणत ३५ ते ४० मिनिटे जलद चालणे/ धावणे हा व्यायाम करावा तसेच, सरावासाठी जिम, व्यायामशाळेतील साधनांचा वापरही करावा लागतो. मात्र, कोरोना सावटामुळे पोलिस भरती, मिल्ट्री भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. 

परंतु आलेल्या परिस्थितीला न डगमगता दरे (ता. सातारा) येथील युवकांनी नामी शक्कल लढवत आपला सराव कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून विविध व्यायामाची साधने बनवली आहेत. यामुळे त्यांचा व्यायाम करण्याचा प्रश्न सुटला आहे. व्यायामाच्या या गावठी जुगाडाची परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे.

दरम्यान, केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही अनलॉक-3 ची नियमावली जाहीर केली. त्यानुसार 5 ऑगस्टपासून मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुकाने, जिम, आऊटडोअर खेळांबरोबरच खासगी वाहनांमधून प्रवासाला परवानगी दिली आहे. मात्र, आंतरजिल्हा बंदी कायम ठेवण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. निर्णय जाहीर करीत राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यातील रात्रीची संचारबंदी उठविण्यात येणार आहे.