Fri, Sep 25, 2020 16:13होमपेज › Satara › तळ्यांवरील खर्चाचा हिशेब द्या

तळ्यांवरील खर्चाचा हिशेब द्या

Published On: Dec 02 2017 12:36AM | Last Updated: Dec 01 2017 10:18PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा शहरात ठिकठिकाणी खोदलेल्या कृत्रिम तळ्यांवर झालेल्या संपूर्ण खर्चाचे तपशिल बांधकाम व लेखा विभागाकडून मागवण्यात आले आहेत. त्याबाबत नगर अभियंता व लेखापाल यांना नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी आदेश दिले आहेत. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि लावलेला खर्च याची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे.

सातारा नगरपालिकेने गणेश मूर्ती विसर्जनासाठी यावर्षी दगडी शाळा (सदरबझार), हुतात्मा स्मारक (सुभाषचंद्र बोस चौक), कल्याणी शाळा परिसर (गोडोली) याठिकाणीही कृत्रिम तळी काढली. या कामासाठी यांत्रिक विभागाला 1 लाख 84 हजार दिले. जि.प.च्या प्रतापसिंह शेती शाळेच्या परिसरातही कृत्रिम तळे खोदण्यात आले. दोन टप्प्यात खोदलेल्या या तळ्याच्या  दक्षिण बाजूसाठी 2 लाख 95 हजार 800 रुपये तर उत्तर बाजू खोदकामासाठी 2 लाख 99 हजार  खर्च करण्यात आले.   या कामावर 7 लाख 78 हजार 850 रुपये खर्च झाला असताना 32 लाखांची बिले निघाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी याकामाचा सर्व हिशेब सादर करण्याचे आदेश बांधकाम आणि लेखा विभागाला दिले आहेत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे.

दरम्यान, यांत्रिक विभागाला दिलेली संपूर्ण रक्‍कम खर्च झाली का? याची चौकशी न करताच या विभागाला पुन्हा निधी देण्याचे प्रयोजन आहे. या तळ्यांच्या कामासाठी किती ठेकेदारांनी निविदा भरल्या, याची माहिती का दिली जात नाही?  जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) यांनी जानुबाई मजूर सहकारी संस्था, वनगळ (ता. सातारा) यांनाच हे काम देण्याचे का सुचवले? याचेही कारण अस्पष्ट आहे. शेती शाळेजवळ खोदलेल्या तळ्यासाठी सुमारे 6 लाख खर्च होऊ शकतो का? याचा तांत्रिकद‍ृष्ट्या उलगडा झाला पाहिजे. लायनर कागद, बॅरागेटिंग करणे, क्रेन पुरवणे, लाईफगार्ड पुरवणे, विसर्जन पाट तयार करणे यावर 24 लाख खर्च कसा काय झाला? याचे कोडे आहे. कृत्रिम तळ्यांच्या कामाचे अंदाजपत्रक 10 लाखाने फुगवायला लावणारा नगरसेवक कोण? याचीही चर्चा सुरू झाली आहे.