Sat, Jul 04, 2020 01:01होमपेज › Satara › छ. संभाजीराजेंचे बलिदान जगात सर्वश्रेष्ठ

छ. संभाजीराजेंचे बलिदान जगात सर्वश्रेष्ठ

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 10:04PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

छ. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर सर्वसामान्य रयत आपल्या या राजासाठी 18 वर्षे लढली. त्यामुळेच काबूलपासून बंगालपर्यंत सल्तनत असणार्‍या औरंगजेबाला दख्खनमध्येच टाचा घासून मरावे लागले. जगाच्या पाठीवर असा एकमेव इतिहास आहे. मग आमचे संभाजीराजे बदफैली कसे? ज्यांनी बलिदान केलं ते संभाजीराजे त्या ताकदीचे होते म्हणूनच  त्यांच्या माघारीही रयतेने संघर्ष केला, असे प्रतिपादन स्वराज्यरक्षक प्रसिद्ध मराठी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. दरम्यान, त्यांचा जाज्वल्य इतिहास सर्वांसमोर आणायचा असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्हा परिषद मैदानावर भरलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी सायंकाळी 7 वाजता स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील कलागार डॉ. कोल्हे यांच्यासह लेखक व पटकथाकार प्रताप गंगावणे, आभा बोडस (छोटी येसूबाई), दिवेश मेदगे (छोटे संभाजी) आदी कलाकारांचा सत्कार नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला. यावेळी प्रदीप कांबळे यांनी मालिकेतील सर्व कलाकारांशी संवाद साधला. डॉ. कोल्हे म्हणाले, राज्यभिषेकानंतर राजधानीत न रमता संभाजीराजांनी सलग 7 दिवस दौड करून जळगावपासून 152 किमीवरील बुर्‍हाणपूर हे मोगलांचे दख्खनवरील मोठं ठाणं मारले आणि सुरतेच्या तिप्पट संपत्ती स्वराज्यात आणली. 32 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक लढाया जिंकल्या. तसेच साहित्य क्षेत्रातही त्यांनी बुधभूषणसारखा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या अत्यंत तरल बुद्धीचे, त्यांंच्या बुद्धीमत्तेतून वस्त्रगाळ झालेल्या संपूर्ण शिकवणुकीचं सार आहे. बालवयापासून त्यांनी छत्रपती शिवरायांना घडताना जे पाहिलं, ते अनुभव त्या ग्रंथात परावर्तीत केले असून भावी पिढ्यांसाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. हा ग्रंथ वाचायला घेतला तर आजच्या काळातील सर्व कार्पोरेट गुरुंची पुस्तकं फेकून द्यावीत, असा हा ग्रंथ आहे. 

प्रताप गंगावणे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे शिवरायांप्रमाणेच चारित्रसंपन्न होते. हा इतिहासपुरुष जसाच्या तसाच मालिकेद्वारे उभा करण्यासाठी डॉ. कोल्हेंनी अनेक अडचणींवर मात केल्याचे सांगितले. यावेळी मालिकेतील छोट्या येसूबाईची व संभाजीराजेंची भूमिका केलेल्या आभा बोडस व चि. दिवेश मेदगे यांनीही मालिकेतील संवादफेक करून  उपस्थितांची मने जिंकली. 

प्राचार्य यशवंत पाटणे यांनी प्रास्ताविकात छत्रपती महाराजांचे पात्र ताकदीने साकारल्याद्दल डॉ. अमोल कोल्हे आणि टिमचे कौतूक केले. सर्व कलाकारांना नगराध्यक्षांच्या हस्ते बुधभूषण ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यवाह शिरीष चिटणीस, डॉ. राजेंद्र माने तसेच ग्रंथमहोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.