होमपेज › Satara › विकासकामांमुळे आ. शंभूराज देसाई यांचा मतदारसंघात प्रभाव

विकासकामांमुळे आ. शंभूराज देसाई यांचा मतदारसंघात प्रभाव

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 8:34PMसणबूर : तुषार देशमुख 

केंद्र सरकारच्या वन नेशन वन इलेक्शन धोरणा नुसार मे महिन्यात निवडणूका झाल्यास पाटण तालुक्यात विकास कामांच्या जोरावर आ. देसाई यांचे पारडे जड असल्याचा विश्‍वास देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. 

मे महिन्यात लोकसभा निवडणुका होत असून या निवडणुकांबरोबर महाराष्ट्रासह आकरा राज्यांत विधानसभा निवडणूका घेण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. असे झाल्यास सातारा जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे खेचून आणणारे शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांची पाटण विधानसभा मतदार संघावर पकड मज़बूत असल्याचे दिसुन येते.  आ. शंभूराज देसाई यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले मैत्रीचे संबंध, सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने सत्तेचा पूरेपूर वापर करून घेत तालुक्यात जलसंधारण, रस्ते विकास, शाळा खोल्या, धरणग्रस्थांचे पुनर्वसन अशी अनेक प्रकारे कोट्यावधी रूपयांची विकासकामे केल्याने आ. देसाईंना विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्यास काहीच अडचण नसल्याचे देसाई गटाचे कार्यकर्ते सांगतात.

गेल्या साडेचार वर्षात पायाला भिंगरी बांधून तालुक्यातील गांव, वाडीवस्ती पिंजून काढत जी गांवे विकासापासुन कोसो दूर होती अशा गावांचा सर्वे करून कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याने येथील नागरिक आ. शंभूराज देसाईवर ख़ूश असल्याचे उघडपणे सांगत आहेत.तालुक्यातील दुर्गम, डोंगरी भागात लाईट, पाणी, रस्ते मुलभुत सुविधांची वाणवा असताना डोंगरी विकास निधितून तसेच पवनउर्जा प्रकल्पातून या गावांना भरघोस निधी दिल्याने ही गांवे समृद्ध झाली आहेत.

मराठा मोर्चात सक्रीय सहभाग घेवून मोर्चा,अंदोलनांचे नेतृत्व करून तालुक्यातील मराठा युवकांना बळ देण्याचे काम केलेच शिवाय विधानसभेत मराठा आरक्षणावरून अनेक वेळा सभागृह देखील बंद पाडले आहे.मराठ्यांना आरक्षण घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगून वेळ प्रसंगी सरकार विरोधात लढण्याची भूमीका वेळोवेळी घेतल्याने युवकांच्यात आ. देसाई यांची चांगलीच क्रेझ असल्याचे कार्यकर्ते सांगतात.

 पाटण तालुक्यातील निवडणूक दुरंगी, तिरंगी का चौरंगी होणार यावर तालुक्यातून तर्कवितर्क लढवले जात आहेत, असे असले तरी तालुक्यातील इतर पक्षातील काही मान्यवर मंडळी आ. देसाईंच्या संपर्कात असल्याचे अनेक वेळा पहायला मिळाले आहे. सत्तेतला आमदार असल्याने तसेच मुख्यमंत्र्याचा जवळचा मित्र असल्याने याचा फ़ायदा देसाई गटाला झालाच परंतु  विरोधी गटातील  नाराज कार्यकर्त्यांना त्यांच्याच पक्षातील अविश्‍वासाला सामोरे जाताना त्यांचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली छुपी मदत ही आ. देसाईंच्या पथ्यावर पडणार असुन ही मंडळी उपकाराची परत फेड येत्या विधानसभा निवडणूकीत आ. देसाईंना मदत करून करतील असेच काहीसे चित्र अलीकडच्या काळात वाढलेल्या भेटीगाठीतून दिसत आहे.