Tue, Jul 14, 2020 02:37होमपेज › Satara › इथे कावळ्यांना मिळतो नाष्टा..!

इथे कावळ्यांना मिळतो नाष्टा..!

Published On: Mar 13 2018 1:44AM | Last Updated: Mar 12 2018 8:12PMमारूल हवेली : धनंजय जगताप

दिवस उजाडायला लागताच जवळपास शंभर भर कावळे एका जागी जमा होतात. जमलेल्या कवळ्यांना हॉटेल मालकांकडून नाष्टा दिला जातो. दिलेल्या नाष्ट्याचा फडशा पाडून कावळे आपल्या मार्गाने निघून जातात. हा दिनक्रम अनेक वर्षापासून मारूल हवेली (ता.पाटण) येथे सुरू आहे. येथे कावळ्यांना दिल्या जाणार्‍या  नाष्ट्याची चर्चा परिसरात सुरू असते.

कावळा या पक्ष्याच्या बाबतीत शुभ - अशुभ शकुन सांगितले जातात. इतर वेळी मनुष्याच्या तिरस्काराला सामोरे जावे लागणार्‍या कावळ्याला  विधी करताना महत्त्वाचे स्थान दिले जाते. मात्र मारूल हवेली येथे कावळ्यांना रोज पहाटेच्या वेळी खाऊ दिला जातो. खाद्य मिळण्याच्या अपेक्षेने कावळे येथे नियमित येऊन ताव मारत असतात.

येथील सेवा निवृत्त सैनिक शिवजी शिंदे यांचे छोटेखानी हॉटेल आहे. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गावातच हॉटेलचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय चालवत असताना हॉटेलमध्ये तयार करण्यात आलेले पदार्थ शिल्लक राहिल्यानंतर ते कोठेही फेकून न देता ते पक्षांसाठी हॉटेल बाहेरील मैदानात खायला ठेवत. हे पदार्थ खाण्यासाठी चिमणी, पारवा व कावळा हे पक्षी जमा होऊ लागले.  पुढे हा दिनक्रम नियमित सुरू राहिला. रोज पहाटे येथे खाद्य मिळत असल्याने दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या वाढत गेली. मात्र रोजचं अन्न पदार्थ शिल्लक राहत नसल्याने त्यांना खायला काय द्यायचे हा प्रश्‍न पडला. त्यानंतर त्यांनी शेव, चिवडा देण्यास सुरूवात केली. दिवस उजाडताच येथे खाद्य मिळत असल्याने कावळे आपोआपच हॉटेलच्या दिशेने येत असतात. तर हे कावळे हॉटेलसमोर आल्याचे पाहून शिवाजी शिंदे त्यांना खाऊ घालतात.

हा प्रसंग पाहून पाहाणार्‍याला 1995 साली प्रदर्शित झालेल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या हिंदी चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पशु - पक्षावर प्रेम करा हा संदेश वेळोवेळी दिला जातो. मात्र शिवाजी शिंदे यांच्या कृतीतून तो पाळला जात असल्याने त्यांचे कौतुकही होत असते.