Tue, Sep 22, 2020 06:26होमपेज › Satara › सातारा : कोरोना बाधितासह ३ संशयितांचा मृत्यू

सातारा : कोरोना बाधितासह ३ संशयितांचा मृत्यू

Last Updated: May 22 2020 11:47AM
१४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह, १०९ जण विलगीकरण कक्षात दाखल

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जावली तालुक्यातील एक ५८ वर्षीय कोविड बाधित पुरुष रुग्णाचा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे आज सकाळी मृत्यू झाला. या रुग्णाला मधुमेह व श्वसन संस्थेचा तीव्र आजार झाला होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

दुसरीकडे वरळी, मुंबई येथून प्रवास करुन आलेली पाचगणी येथील ६४ वर्षीय महिला गृह विलगीकरणात होती. या महिलेचा दम्याच्या आजाराने व ह्दयविकाराने मृत्यू झाला असून संशियत म्हणून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी दिली आहे.

नांदलापूर (ता. कराड) येथील ६० वर्षीय महिला कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे संशियत म्हणून दाखल करण्यात आली होती. या महिलेचा मृत्यू झाला असून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे.

१४६ जणांचा अहवाल निगेटिव्ह 

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील ३४, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील ५३, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील ९, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील १५ असे एकूण १११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील ३५ जणांचे असे एकूण १४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

१०९ जण विलगीकरण कक्षात दाखल 

दि. २१ रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे २२, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे ८७ असे एकूण १०९ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- २०१ झाली आहे. यापैकी उपचार घेत असलेले कोरोना बाधित रुग्ण संख्या ९० इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेल्यांची रुग्ण संख्या १०६ आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या ५ आहे.

 "