Sat, Sep 19, 2020 17:18होमपेज › Satara › सहायक फौजदारासह हवालदारास मारहाण

सहायक फौजदारासह हवालदारास मारहाण

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:44PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

येथील दत्त चौक परिसरात ड्युटीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या सहायक फौजदारासह हवालदारास धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी दत्त चौक परिसरात मोठी गर्दी जमली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांच्या मुलास पोलिसांनी अटक केली आहे.

सहायक फौजदार बळवंत चव्हाण व हवालदार उमेश बाजीराव माने यांना मारहाण करण्यात आली आहे. तर उमेश माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सईद अल्ताफ शिकलगार (रा. मंडई,  गुरुवार पेठ, कराड) याला पोलिसांनी अटक केली आहे. आणखी एकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड शहर पोलिस ठाण्यातील वाहतूक शाखेचे सहायक फौजदार बळवंत चव्हाण व हवालदार उमेश बाजीराव माने हे दोघेजण दत्त चौक ते कर्मवीर पुतळा परिसरात वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत होते. सईद शिकलगार याच्यासह आणखी दोघेजण मोटारसायकलवरून ट्रिपल सीट तेथे आले.

त्यांना पोलिसांनी अडविले असता मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला एकजण उतरून पळून गेला. तर अन्य दोघांना अडवून पोलिसांनी त्यांना तुम्ही वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे सांगितले. यावेळी आम्ही कोण आहे, माहिती आहे का? आम्हाला ओळखत नाही का? असे म्हणत सईद शिकलगार व त्याच्या जोडीदाराने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना मारहाण केली.  

संशयितानी सहायक फौजदार चव्हाण यांचे गचुंडे धरून त्यांचा हात पिरगळून फाईट मारल्या. तर उमेश माने यांच्या छातीवर फाईट मारून त्यांनाही जखमी केले. या मारहाणीमुळे हवालदाराच्या छातीवरील नेमप्लेट तुटली असून छातीला दुखापत झाली आहे. तर सहायक फौजदार चव्हाण यांच्या छातीवरील पदकही तुटले आहे. तशाही परिस्थितीत पोलिसांनी सईद शिकलगार याला पकडून शहर पोलिसांत आणले.

शहर पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांमध्ये माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांच्या मुलाचा समावेश असल्याची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी जमली होती.