Fri, Jul 10, 2020 01:58होमपेज › Satara › काँग्रेसचा ‘भाजप हटाव, देश बचाव’नारा

काँग्रेसचा ‘भाजप हटाव, देश बचाव’नारा

Published On: Sep 27 2019 2:18AM | Last Updated: Sep 27 2019 12:01AM

काँग्रेस बैठकीत बोलताना अ‍ॅड. विजयराव कणसे, त्यावेळी रजनी पवार, बाबासाहेब कदम, धनश्री महाडिक व इतर.सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यातील काँग्रेस संपली असल्याच्या पोकळ चर्चा केल्या जात आहेत. नेत्यांनी पक्षांतर केले असले तरी कार्यकर्ते आणि काँग्रेस विचारधारा जोपासणारे मतदार जाग्यावरच आहेत.  मी म्हणजे काँग्रेस, असे समजणार्‍या दलबदलू नेत्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकवू. 2 ऑक्टोंबरला जिल्हा पातळीवर महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीचे आयोजन करुन ‘भाजप हटाव, देश बचाव,’ अशी व्यापक मोहीम सुरु करु, असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.

जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक गुरुवारी दुपारी पार पडली. महत्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करणे, सद्यपरिस्थितीत राजकीय परिस्थितीचा आढावा घेणे या प्रमुख विषयांवर यावेळी चर्चा झाली. अ‍ॅड. विजयराव कणसे म्हणाले, आनंदराव पाटलांच्या मेळाव्याला गेलो असलो तरी पक्षांतराचा कार्यक्रम असेल तर  तेथूनच बाहेर पडू असे त्यांना सांगितले. भाजप प्रवेश करावा यासाठी माझ्यावर वेगवेगळे प्रयोग झाले. काँग्रेसमध्ये नंतर आलेल्या लुंग्यासुंग्यांनी शिकवू नये. पद नाही मिळाले तरी काँग्रेस सोडणार नाही. पक्षांतर अळवावरचं पाणी आहे. विराज शिंदे म्हणाले, वाई मतदारसंघात काँग्रेसचे 50 टक्के कार्यकर्ते आहेत. कोणी कुठे गेले तरी फरक पडणार नाही. युवकच्या कुठल्याही तालुकाध्यक्षाने पक्षांतर केलेले नाही. भाजप हटावचा नारा गावागावात देवू. रजनी पवार म्हणाल्या, काँग्रेस केवळ पक्ष नाही तर विचारधारा आहे.

पृथ्वीराज चव्हाणांना केंद्रस्थानी मानून भाजप हटावचा नारा द्यायचा आहे. कुणी कुणाचे पाय ओढले हे विसरुन कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा विश्‍वास निर्माण करु. कुणीही पक्षासोबत बईमानी करु नये. बाळासाहेब बागवान यांनी खंडाळा तालुक्यातील रिक्‍त असलेली विविध पदे भरावीत, अशी मागणी केली. राजेंद्र शेलार म्हणाले, काही तालुक्यांत काँग्रेसची पडझड झाली असली तरी कार्यकर्त्यांना उभारी देण्याची गरज आहे. 1999 सारखी परिस्थिती निर्माण झाली असली तरी त्यावर मात करुन पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. नेते बाजूला झाले असले तरी कार्यकर्ते जाग्यावर आहेत.मनोहर शिंदे म्हणाले, आगामी निवडणुकीत बुथ महत्वाचा घटक असून 2 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला प्रत्येकाने आले पाहिजे. 

सुरेश जाधव म्हणाले, सत्ताधारी पक्षाची विचारधारा पेशवाईची असून देश मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. आघाडी होते, तुटते. पण विस्कटलेले कार्यकर्त्यांना एकत्र करण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीचे तिकीट पृथ्वीराजांना मिळाले तर जबाबदारी वाढणार असून प्रत्येकाने काम केले पाहिजे. 

धनश्री महाडिक म्हणाल्या, खरे बोलणारे लोक शांत बसल्याने खोटं पण रेटून बोलणारे सत्तेत आले आहेत.पाण्याच्या लाटेप्रमाणे राजकीय लाटही मागे हटेल.पृथ्वीराजांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करु. 200 महिला कार्यकर्त्या लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 

मोहनराव इंगवले म्हणाले, मरगळ आली म्हणून कुठलाही पक्ष संपत नसतो. सातार्‍यातून अनेक चळवळी निर्माण झाल्या. गांधी जयंती कार्यक्रमात भाजप हटावचा नारा देवून देश वाचवण्यासाठी व्यापक मोहीम उघडली पाहिजे. भविष्यात पुन्हा काँग्रेस सत्तेवर येईल पण निष्ठावंतांना त्यावेळी डावलले जावू नये.

यावेळी मनोज तपासे, अविनाश फाळके, जितेेंद्र भोसले, विलास पिसाळ, शिवाजी गायकवाड, झाकिर पठाण, बाळासाहेब शिरसाट, प्रदीप जायगुडे, नरेश देसाई, विजया खोले, हरिभाऊ लोखंडे,  यांनीही मनोगत व्यक्‍त केले. प्रास्तविक बाबूराव शिंदे यांनी केले. यावेळी निवास थोरात, चंद्रकांत ढमाळ, बाबासाहेब कदम, नंदाभाऊ जाधव, किरण बर्गे, संदीप माने, रणजीत कदम, आदि उपस्थित होते.

काँग्रेस सोडणार्‍या आनंदरावांकडून जीप काढून घ्या 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून जिल्हा काँग्रेस कमिट्यांना जीप देण्यात आल्या होत्या. एका कार्यकर्त्यांनी आनंदराव पाटील यांच्याकडील जीप काढून घेण्याची मागणी केली. संबंधित जीप पक्षाची मालमत्ता आहे. त्याचा दुसर्‍या पक्षातील लोक कसा काय वापर करतात? पक्षाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी सुचनाही केली.