Mon, Sep 21, 2020 19:26होमपेज › Satara › सव्वा वर्षाचे बालक कोरोना संशयित

सव्वा वर्षाचे बालक कोरोना संशयित

Last Updated: Mar 26 2020 10:29PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील 14 महिन्याचे बालक कोरोना संशयित म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या घशातील स्रावाचा नमुना पुणे येथील एनआयव्हीकडे पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर फिनलँड येथून फॉरेन टूर करून आलेल्या 32 वर्षीय युवकही संशयित म्हणून दाखल झाला आहे. दरम्यान, गुरुवारी कोरोना संशयित असलेल्या आठही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.  

कोरोना विषाणू देशासह जगभर फैलावल्यानंतर सातार्‍यातही धास्ती लागून राहिली. जिल्हा प्रशासनाने राज्य व केंद्र शासनाच्या संपूर्ण उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. गुरूवारी सातारा जिल्ह्यातील 14 महिन्यांच्या बालकाला ताप, खोकला व श्वासाचा त्रास होत होता. बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार या बालकाला सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.  सिव्हिलमध्ये फिनलँड येथून आलेल्या 32 वर्षीय युवकालाही दाखल करण्यात आले आहे. त्याची तपासणी केल्यानंतर त्याला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे घशातील स्रावाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

बुधवारी दाखल झालेल्या 60 वर्षीय महिलेसह आठ जणांचे रिपोर्ट गुरुवारी निगेटिव्ह आले. त्यांना विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) ठेवण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिका, दुबई, सौदी अरेबिया, बहामा, अबुधाबी, कॅलिफोर्निया येथून फॉरेन टूरवरून आलेल्या कोरोना संशयितांची तपासणी सिव्हिलमध्ये केली जात आहे. आरोग्य विभागाच्या वतीने परदेशवारी केलेले आणि परजिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या लोकांचा सर्व्हे सुरू आहे. अशा लोकांवर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे. दरम्यान, परदेशवारी करून आलेल्यांपैकी 2 जण कोरोनाने बाधित आहेत. त्यांच्या संख्येत वाढ झाली नसली तरी संशयित म्हणून दाखल होणार्‍यांची संख्या मर्यादितच आहे. 

सातारा कोरोना अपडेट
एकूण दाखल रुग्ण                                     26       
नमुने घेतलेले रुग्ण                                    26       
कोरोना बाधित रुग्ण                                    2       
निगेटिव्ह रिपोर्ट                                        22       
प्रलंबित रिपोर्ट                                            2       
कोरोना संशयित डिस्चार्ज रुग्ण                    22       
कोरोना संशयित अ‍ॅडमिट रुग्ण                      4       
जिल्ह्यात आलेले परदेशी प्रवासी                411       
निगराणीखालील प्रवासी                            411       
निगराणी कालावधी पूर्ण झालेले प्रवासी       159       
होम क्वारंटाईन                                       252       
विलगीकरण कक्षातील क्वारंटाईन                24       
एकूण डिस्चार्ज                                           9       
विलगीकरण कक्षात दाखल                         15       

 "