Sat, Jul 11, 2020 20:02होमपेज › Satara › पाण्यावाचून नागरिकांचा घसा कोरडा राहणार?

पाण्यावाचून नागरिकांचा घसा कोरडा राहणार?

Published On: Mar 19 2018 1:49AM | Last Updated: Mar 19 2018 1:03AMसातारा : प्रवीण शिंगटे 

सातारा  जिल्ह्यात मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. यंदाही ग्रामीण भागात पाण्याचे टँकर सुरू करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत  1 कोटी 20 लाख 75 हजार रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. मात्र, ही कामे पूर्ण न झाल्याने  यंदाचा उन्हाळाही ग्रामीण भागातील नागरिकांचा पाण्यावाचून घसा कोरडा करणार, असे चित्र स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला सुमारे 1 कोटी 20 लाख 75 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी कामासंदर्भात वर्क ऑर्डर काढण्यात आल्या आहेत त्यानुसार सुमारे 31 कामे ठिकठिकाणी सुरू आहेत. त्यामध्ये अस्तित्वात सर्व नळपाणी पुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेवून दुरूस्ती करण्याची कार्यवाही केली जाते.गुणवत्ता बाधीत गावांमध्ये सुरक्षित स्त्रोत विकसीत करणे, लोकसंख्येत वाढ झाल्याने पुरक योजना करणे, किमान खर्चावर अधारित योजनांचा विचार करणे, वाड्यावस्त्यांवरील एकत्रीत योजना करण्यापेक्षा विकेंद्रीत उपाययोजना करणे, नळजोडण्या देणे,पाण्याचा ताळेबंद तयार करण्याची कामे या विभागामार्फत केली जातात त्याशिवाय साधी विहीर, विंधन विहीर, लघु नळपाणी पुरवठा योजना, शिवकालीन पाणी साठवण योजना, नवीन नळ पाणीपुरवठा योजना, सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून कामे सुरू असल्याचे पाणी पुरवठा विभागामार्फत सांगण्यात आले.

पाणी पुरवठा विभागामार्फत सुमारे 31 कामे सुरू आहेत तर काही कामे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मार्च महिना जवळ आला की पाणीपुरवठा विभाग निधी खर्च करण्यासाठी जागा झाला आहे. वर्षभर जि.प. सेसमधून मिळालेल्या निधीचे पाणीपुरवठा विभागाने काय केले? असा प्रश्‍न गावोगावच्या नागरिकांमधून उपस्थित होत आहे. 

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये  विहीर, पंपींग मशिनरी, जलवाहिनी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या , वितरण नलिकांचे जाळे पसरले आहे. मात्र  बहुतांश गावातील वितरण नलिका व जलवाहिन्या गंजल्या आहेत त्यामुळे बर्‍याच ठिकाणी या जलवाहिन्यांना गळती लागली आहे. या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. फुटलेल्या जलवाहिन्यांमध्ये गटारे व नाल्याचे पाणी जात असल्याने पाणी दुषित होत आहे. त्यामुळे काही नागरिकांना दुषित पाणी प्यायची वेळ आली आहे.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेसाठी सुमारे 47 लाख रुपयांचा निधी आला आहे. मात्र या निधीपैकी फक्त 10 लाख रुपये खर्च झाल्याचे समजते. जिल्हा वार्षिक योजनेमधून  राष्ट्रीय पेयजलसाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाला होता.हे बील ट्रेझरीमध्ये गेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पेयजलचे पैसे कसे खर्च होणार आहेत.पाणीपुरवठा विभागात अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये ताळमेळ नसल्याने ठेकेदारही वैतागले आहेत. मात्र, वर्षभर एकही रुपया खर्च न करणारा हा विभाग मार्च महिन्यातच खडबडून जागा झाला आहे. कामे सुरू असून लवकरच ही कामे पूर्ण केली जातील व सर्व निधी खर्च होईल, असे आश्‍वासन अधिकार्‍यांकडून दिले जात आहे. 15 दिवसांमध्ये निधी खर्च करण्याच्या घाई गडबडीमुळे सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेवर  परिणाम तर होणार नाहीना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.