Sat, Jul 11, 2020 21:13होमपेज › Satara › यशवंत विचारांचे चिरतंन स्मारक ‘विरंगुळा’

यशवंत विचारांचे चिरतंन स्मारक ‘विरंगुळा’

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 7:39PMकराड : चंद्रजीत पाटील 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हातांचे ठसे... सर्वसामान्यांनी यशवंतराव चव्हाण यांना लिहलेली तब्बल 82 हजाराहून अधिक पत्रे... यशवंतरावांनी पत्नी वेणूताईस स्वत:च्या हस्ताक्षरात लिहलेली पत्रे... निरनिराळ्या देशांच्या भेटीप्रसंगीची छायाचित्रे अन् यशवंतराव चव्हाण वापरत असलेला टीव्ही, यशवंतराव चव्हाण यांनी लिहलेली पुस्तके यामुळे कराडमधील यशवंतराव चव्हाण यांचे ‘विरंगुळा’ हे निवासस्थान एक चिरतंन स्मारकच बनले आहे.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवतंराव चव्हाण यांनी 1979 साली ‘विरंगुळा’ हे निवासस्थान बांधले. मात्र, दुदैवाने पुढील पाच वर्षांतच यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले. पुढे हे निवासस्थान एका नातेवाईकांच्या ताब्यात होते. मात्र, काही कारणास्तव ही वास्तू संबंधित नातेवाईकांनी विक्रीसाठी काढली होती. ही गोष्ट तत्कालीन नगराध्यक्ष स्व. पी. डी. पाटील यांना समजल्यानंतर सध्याचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, शाखा कराडचे सचिव मोहनराव डकरे यांच्यासह पी. डी. पाटील यांनी ही गोष्ट खा. शदर पवार यांच्या कानावर घातली. त्यानंतर शरद पवार यांनी गतीने हालचाली करत पुण्यात संबंधित नातेवाईकांची भेट घेत ‘विरंगुळा’ निवासस्थान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नावाने खरेदी केले आणि त्यामुळेच आज ‘विरंगुळा’ हे निवासस्थान स्व. यशवंतराव चव्हाण यांचे चिरतंन स्मारक बनले आहे. 

पुढे 2005 साली स्व. पी. डी. पाटील यांच्या पुढाकारानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कराड शाखेची सूत्रे मोहनराव डकरे यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यानंतर खा. शरद पवार, स्व. पी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मोहनराव डकरे यांनी अथक प्रयत्नांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जतन केल्या. या स्मृतींसह स्व. यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केलेले साहित्य व पत्रव्यवहार यातून यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याला उजाळाच मिळत आहे.

आज ‘विरंगुळा’ या यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी आपणास यशवंतराव चव्हाण यांचे कौटुबिंक फोटो पहावयास मिळतात. याशिवाय 1965 च्या युद्धानंतर ऐतिहासिक ताश्कंद करारावेळी तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्यासोबतच्या त्या ऐतिहासिक आठवणी, विविध देशांना भेटीप्रसंगीची छायाचित्रे यांचे मोठे दालनच या निवासस्थानी आपणास पहावयास मिळते. या दालनाच्या माध्यमातून स्व. यशवंतराव चव्हाण यांचे राज्यासह देशाच्या जडणघडणीत किती मोलाचे योगदान होते? याचीच प्रचिती आपणास पदोपदी येते.

याशिवाय स्व. यशवंतराव चव्हाण वापरत असलेला टीव्ही, सोफा तसेच अन्य साहित्यही विरंगुळा निवासस्थानी आपणास पहावयास मिळते. राज्यासह केंद्र सरकारच्या माध्यमातून देशपातळीवर काम करताना कराडसह राज्यातील लोकांनी यशवंतराव चव्हाण यांना विविध विषयांवर लिहलेली तब्बल 82 हजार 67 पत्रेही आपणास एका क्षणात याठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध होतात. यात जिल्ह्यातील किसन वीर, भिलारे गुरूजी, प्रतापराव भोसले, आप्पासाहेब देशपांडे, करमळकर काका यांच्यासह अनेक दिग्गजांनी लिहलेल्या पत्रांचाही समोवश आहे. 

याशिवाय देशाचा व राज्याचा कारभार करत असताना यशवंतराव चव्हाण यांनी पत्नी वेणूताई चव्हाण यांना स्वत:च्या हस्ताक्षरात लिहलेली 100 पत्रेही आपण पाहू शकतो. यशवंतराव चव्हाण यांनी देशभरातील विद्यापीठांच्या दीक्षांत समारंभरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केलेल्या 23 विविध भाषणांचा संग्रह असणारे ‘माझ्या विद्यार्थी मित्रांनो’ हे पुस्तकही मार्गदर्शक असेच आहे. 

तब्बल ‘पाच’वेळा मिळाली ‘डॉक्टरेट’...

कानपूर विश्‍वविद्यालय : 23 फेब्रुवारी 1969.
मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद - 1970.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : 1 डिसेंबर 1974.
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी :  17 जानेवारी 1976.
पुणे विद्यापीठ : 24 मार्च 1984.