Thu, Jul 09, 2020 22:12होमपेज › Satara › पश्‍चिमेकडील सेंद्रिय मध जागतिक पातळीवर

पश्‍चिमेकडील सेंद्रिय मध जागतिक पातळीवर

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 10:30PMसातारा : प्रवीण शिंगटे 

सेंद्रिय मध संकलनासाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर व वाई तालुक्यातील 23 गावांची तर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील 34 गावांची मध संचलनालयामार्फत निवड करण्यात आली आहे. या गावांची पाहणी उत्तराखंड येथील स्टेट ऑरगॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी ( उस्का) मार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील सेंद्रिय मध आता  जागतिक पातळीवर पोहोचण्यास मदत होणार आहे.

राज्यातील नैसर्गिक जैवविविधता पाहता सह्याद्रीच्या रांगा ह्या पश्‍चिम घाटातील 12 जिल्ह्यातील 63 तालुक्यातून जात असतात. या परिसरात विपुल नैसर्गिक वनसंपदा असून मध संकलनास फायदेशीर ठरत आहेत. या जंगलात जांभूळ, गेळा, हिरडा,  पिसा, आखरा, कारवी, व्हायटी, सोनवेल, ऐन, नाना, लाल सावर, बुरूंबी,  वाघचावड, रानपेरव (रेहंदा) आदी आयुर्वेदिक झाडे  मोठ्या प्रमाणात आहेत.या झाडांच्या फुलांपासून मिळणारा मध हा  चवीने चांगला, पारदर्शक व घट्ट असतो.त्यामुळे या मधास जगामध्ये चांगली मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने ज्या जंगलामध्ये  कोणत्याही प्रकारची औषध फवारणी होत नाही अशा निवडक  गावांची निवड करून सेंद्रिय मध ही संकल्पना सुरू केलेली आहे.

सेंद्रिय मध संकलनासाठी सर्वेक्षण करून प्रमाणिकरणासाठी उत्तराखंड स्टेट ऑरगॉनिक सर्टिफिकेशन एजन्सी या यंत्रणेची नियुक्ती केली आहे. ही यंत्रणा केंद्र शासनाच्या अपेडा यांनी मान्यता दिलेली शासकीय यंत्रणा आहे. या संस्थेचे निरीक्षक विनोदकुमार श्रीवास्तव, मध संचालनालयाचे रसायनशास्त्रज्ञ डी. आर. पाटील यांनी नुकतीच सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील सेंद्रिय मध संकलनास  वाव असणार्‍या गावांचे सर्वेक्षण केले. मधोत्पादक  व मधपाळ यांच्या भेटी घेऊन सर्वेक्षण केले असून या कामात पर्यवेक्षक बी.डी. महाडीक, एस.आर. कांबळे, जी. के. असोलकर यांचे सहकार्य लाभले आहे.
सेंद्रिय मध प्रमाणिकरणासाठी  जी गावे व मधोत्पादक मधपाळ सेंद्रिय  मधोत्पादनाचे निकष पूर्ण करतात त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची नोंदणी मंडळाकडे व उस्का या यंत्रणेकडे केलेली आहे. त्यांना शास्त्रोक्त पध्दतीने सेंद्रिय मध संकलन करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पश्‍चिम घाटातील सेंद्रिय मध आता जगाच्या नकाशावर पोहोचला आहे.

या गावांत होणार मधसंकलन...

सातारा जिल्ह्यातील  महाबळेश्‍वर तालुक्यातील दुधोशी, पारपार , घोगल, पारटेवाडी, बिरमणी, शिरवली, कासरूंड, हातलोट, बिरवाडी, दुधगाव, झांजवड,  गोरोशी, चुतरबेट, दाभे, खरोशी, रेणोशी, लामज, सोनाट, आचली, येरणे बु., येरणे खुर्द, कारवी आळा या 22  गावातील 97 मधपाळ 1 हजार 50 मधपेट्याद्वारे तर जोर, ता. वाई  येथील 16 मधपाळ 160 मधपेट्याद्वारे  मध संकलन करणार आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील  राधानगरी तालुक्यातील  शेळपबांबर, म्हाबळेवाडी, सतिचामाळ, हसणे, दाजीपुर, ओलवण, भटवाडी, शिवाचीवाडी या 8 गावांतील 23 मधपाळ 202 मधपेट्याद्वारे, भुदरगड तालुक्यातील  डेळे, भरमलवाडी, मठगाव, चांदमवाडी, अंतुर्ली, मानी, शिवडाव, पाटगाव, शिवाजीनगर, धुयाचीवाडी, तळी, तांब्याचीवाडी येथील 12 गावांतील 36 मधपाळ 276 मधपेट्याद्वारे, आजरा तालुक्यातील चाफवडे, खानापूर, वेळवट्टी, हाळोली, किटवडे, आल्याचीवाडी, गवसे, जेउर, दाभील, देवकांडगाव, दाभीलवाडी, दर्डेवाडी, एरंडोल, घाटकरवाडी या 16 गावातील  75 मधपाळ 160 मधपेट्याद्वारे मध संकलन करणार आहे.