Sat, Nov 28, 2020 18:54होमपेज › Satara › अवघ्या साडेपाच तासात झाला भुयारी मार्ग

अवघ्या साडेपाच तासात झाला भुयारी मार्ग

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:34PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

मध्य रेल्वे अंतर्गत येणार्‍या पुणे विभागातील पुणे ते सातारा लोहमार्गावर कोरेगाव तालुक्यातील  खोलवडी, रेवडी येथे रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक यंत्राचा वापर करत अवघ्या साडेपाच तासात नवीन भुयारी मार्ग तयार केला.  त्यामुळे गेल्या कित्येक वर्षानंतर खोलवडी ते रेवडीकडे जाणार्‍या नागरिकांना हा रस्ता आता कायमस्वरूपी खुला झाला आहे. दरम्यान, या कामासाठी रेल्वे  लाईन बंद ठेवल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक दुपारपर्यंत विस्कळीत झाली होती.

कोरेगाव तालुक्यातील पळशी ते जरंडेश्‍वर स्थानकादरम्यान फाटक क्रमांक 53 येथे लिमिटेड हाईट सर्व्हेचे काम रेल्वे प्रशासनामार्फत युध्दपातळीवर हाती घेण्यात आले होते. खोलवडी ते रेवडी या गावादरम्यान असलेले रेल्वे फाटक दररोज संध्याकाळी 7 वाजता बंद करण्यात येत होते. त्यामुळे या दोन्ही गावातील नागरिकांना सायंकाळी 7 पूर्वीच आपली कामे उरकून घरी जावे लागत होते. अचानक काही घडल्यास नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. 

याबाबत नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार निवेदने सादर केली होती. त्यानंतर प्रशासनाने रविवारी हे काम हाती घेतले. या कामासाठी 150 कर्मचारी, जेसीबी, क्रेन यांच्यामार्फत भुयारी मार्ग खोदून तयार करण्यात आला. यावेळी विभागीय अभियंता व्ही. के. सक्सेना, सहाय्यक विभागीय अभियंता संतोष कुमार, शाखा अभियंता निलेश, गोपाळ रेड्डी, मल्लिकार्जुन बंकापुरे यांच्यासह अन्य अधिकारी कामाच्या ठिकाणी तळ ठोकून होते. अवघ्या साडेपाच तासात रेल्वे प्रशासनाने हे काम केल्याने नागरिकांना कामाचा धडाका पहायला मिळाला. 

या कामामुळे खोलवडी व रेवडीदरम्यान असणारे रेल्वे फाटक आता बंद राहणार नाही. नागरिकांची भुयारी मार्गातून जाण्याची सोय केल्यामुळे येथील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

रेल्वे वाहतूक दुपारपर्यंत ठप्प 

रविवारी सकाळी 9.10 ते दुपारी 2.30 पर्यंत या कामासाठी पुणे ते सातारा रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात आला होता. या कालावधीत रेल्वेचे विविध विभागाचे कर्मचारी या कामासाठी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे अप पॅसेंजर रेल्वे सातारा व वाठार स्थानकादरम्यान धावली नाही. त्याचप्रमाणे डाऊन पॅसेंजरही वाठार ते सातारा स्थानकादरम्यान धावली नाही. कोल्हापूर-मुुंबई एक्सप्रेस कोल्हापूर ते सातारा स्थानकादरम्यान तब्बल 1 तास थांबवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.  दुपारी 2.40 नंतर पळशी येथे जरंडेश्‍वर स्थानकादरम्यानचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेच्या गाड्या पुणे, मुंबई व मिरजकडे मार्गस्थ झाल्याचे रेल्वे प्रशासनामार्फत सांगण्यात आले.