Thu, Jul 02, 2020 18:57होमपेज › Satara › महामार्ग शहरातून काढण्याचा घाट कशासाठी?

महामार्ग शहरातून काढण्याचा घाट कशासाठी?

Published On: Feb 09 2019 1:44AM | Last Updated: Feb 08 2019 11:19PM
कराड : प्रतिभा राजे 

भेदा चौक ते कार्वे नाका या रस्त्यास राज्य महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यानुसार हा रस्ता झाल्यास मिळकत धारकांचे मोठे नुकसान होणार आहे. हा महामार्ग शहराच्या बाहेरून काढण्यात येण्याऐवजी हा महामार्ग शहरातून काढण्याचा  घाट शासन कशासाठी घालत आहे? असा सवाल नागरिकांतून होत असून या महामार्गामुळे शहराची मुख्य पेठ उसवली जाणार आहे तर रस्त्यावरील किती मिळकतधारक बाधित होणार आहेत याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शासनाकडून याबाबत अद्यापही काहीच कागदपत्रे प्राप्‍त न झाल्याने मिळकत धारकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. 

भेदा चौक ते कार्वे नाका हा रस्ता पूर्वी 142 नंबरचा खंडाळा, पळशी, कोरेगाव, रहिमतपूर, मसूर, कराड, पलूस, सांगली, जयसिंगपूर, शिरोळ असा राज्यमार्ग होता. त्याचे रूपांतर राज्य महामार्गात झाले. कराडच्या डेव्हल्पमेंट प्लॅनमध्ये हा रस्ता 50 फूटाचा होता. त्यानंतर सुधारित आराखड्यामध्ये हा रस्ता 60 फूटाचा झाला आहे. या रस्त्यावर महामार्ग झाल्यास मिळकत धारकांचे नुकसान होणार आहे.

याबाबत प्रसिध्द झालेल्या गॅझेटमध्ये शहरातील 166 ई व 266 हे दोन रस्ते दाखवण्यात आले आहेत. यामध्ये 166 ई अंतर्गत महात्मा गांधी पुतळा ते दत्त चौक व कृष्णा पुल मार्ग तर 266 रस्ता भेदा चौक ते कार्वे नाका असा असून हे दोन्ही मार्ग पुढे जोडण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत गत महिन्यात  अधिकार्‍यांनी याबाबत पाहणी करून या रस्त्यावरील वृक्षांची तोड केली तर  दगड रोवून खूण रस्त्याची केली यामुळे संजय शिंदे व राष्ट्रीय महामार्ग क्र. 266 तासगाव कडून कराडकडे येताना होणार्‍या रूंदीकरणामुळे बाधित होणार्‍या नागरिकांनी तातडीने याबाबत नगरपालिकेस निवेदन दिले. त्यामध्ये हा महामार्ग शहरातून न काढता तो शहराच्या बाहेरून काढण्यात यावा अशी मागणी केली. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा रस्ता शहरांच्या बाहेरून काढण्यात आला आहे मग कराड शहरातूनच हा महामार्ग का काढला जात आहे असा नागरिकांचा सवाल आहे. 

100 फुटी रस्ता राज्य शासनाकडे असल्याने तो रद्द करण्यात आला मात्र हा महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. मात्र तरीही याबाबत पाठपुरावा होणे गरजेचे आहे. 

किती फुट रस्ता वापरणार याबाबत स्पष्टता नाही 

महामार्गाच्या कामाबाबत नगरपालिकेत झालेल्या चर्चेवेळी शासनाच्या संबंधित अधिकार्‍यांनी महामार्गावर चुकीच्या पध्दतीने मोजमाप  होवून दगड लावण्यात आल्याचे सांगण्यात आले तर पुन्हा हे मोजमाप  घेण्यात येणार आहे. मात्र नक्‍की किती फुट रस्ता महामार्गासाठी वापरण्यात येणार आहे याबाबत अधिकार्‍यांनीही काही सांगितले नाही. त्यामुळे 85 फुट रस्ता वापरण्यात येणार आहे किंवा नाही याबाबत नक्‍की काहीच माहिती देण्यात आली नसल्याचे नगर अभियंता एम.एच. पाटील यांनी सांगितले. 

महामार्ग रूंदीकरणाची भीती

म. गांधी पुतळ्यापासून ते कृष्णा नाका व भेदा चौक ते कार्वेनाका असा काढण्यात येणारा राष्ट्रीय महामार्गामध्ये अनेक नागरिकांच्या मिळकती जाण्याची शक्यता आहे. तर भविष्यात याच महामार्गाचे रूंदीकरण झाल्यास पुन्हा नागरिकांच्या मिळकती जाणार असल्याने महामार्ग रूंदीकरणाचीही भिती नागरिकांना वाटत आहे. 

राष्ट्रीय महामार्ग शहरातून होण्याऐवजी शहराबाहेरून व्हावा या नागरिकांच्या मागणीस आमचाही पाठिंबा आहे. याबाबत पालिकेत ठराव करण्यात येणार असून याबाबत पाठपुरावाही करण्यात येणार आहे. - जयवंतराव पाटील उपनगराध्यक्ष