Sat, Jul 04, 2020 05:11होमपेज › Satara › आनंदराव नानांनी पृथ्वीराज चव्हाण यांना का सोडले?

आनंदराव नानांनी पृथ्वीराज चव्हाण यांना का सोडले?

Published On: Sep 11 2019 2:05PM | Last Updated: Sep 11 2019 2:05PM
कराड : सतीश मोरे

दिवंगत नेते ना. आनंदराव चव्हाण आणि स्व. प्रेमिलाकाकी चव्हाण यांच्यापासून गेली 40 वर्षे काँग्रेस पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्ता ते नेता अशी आ. आनंदराव पाटील यांची ओळख आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात होण्या अगोदरपासून ते 2014 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आनंदराव पाटील हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आलेले आहेत. 1999 साली लोकसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या धक्‍कादायक पराभवानंतर त्यांच्यासोबत असणार्‍या निवडक पाच-दहा कार्यकर्त्यांपैकी आनंदराव पाटील एक होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या चांगल्या-वाईट काळात आनंदराव पाटील यांनी त्यांना मोलाची साथ दिली. 


दिल्लीमध्ये पुन्हा बस्तान बसविल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचा सातारा जिल्ह्यातील गट आनंदराव पाटील यांनी मजबूत केला. त्याचबरोबर स्व. प्रेमिलाताई चव्हाण आणि आनंदराव चव्हाण यांच्या स्मृती कायम जपण्यासाठी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आनंदराव पाटील हेच गेली अनेक वर्षे आयोजित  करीत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील माणूस म्हणून आनंदराव पाटील यांच्याकडे सर्वजण पाहतात. 2010 साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर आनंदराव पाटील यांच्याकडे दहा हत्तींचे बळ आले होते.


आनंदराव नानांनी या चार वर्षांच्या कालावधीत सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत  करण्याबरोबरच कोट्यवधी रुपयांची विकासकामे आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. जिल्ह्यातील विकासकामांबरोबरच वैयक्‍तिक कामांसाठी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात येणार्‍या 100 पैकी 70 शिफारसपत्रांवर आनंदराव पाटील यांचीच सही असायची. मुख्यमंत्र्यांच्या सातारा, सांगली,कोल्हापूर जिल्हा दौर्‍यात आनंदराव पाटील प्रति मुख्यमंत्री म्हणून वावरायचे. 2014 मध्ये शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्यपाल नियुक्‍त आमदार करुन आनंदराव पाटील यांच्या निष्ठेचा सन्मान केला होता.

 

आनंदराव पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणजे गुरु-शिष्य, निष्ठावंत नेत्याचा निष्ठावंत कार्यकर्ता, विश्‍वासू सहकारी अशी कौतुक सुमने उधळली जायची. आ. आनंदराव पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अचानक भाजप प्रवेशाच्या चर्चेला वाट मोकळी करुन दिली आहे. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून 13 सप्टेंबरला भविष्यातील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आ. पाटील यांच्या या निर्णयावर ‘विश्‍वास बसतच नाही, हे शक्यच नाही. नाना पृथ्वीराज चव्हाण यांना सोडून जाऊच शकत नाहीत’. अशा प्रकारच्या चर्चा सकाळपासूनच कराडसह जिल्हाभर रंगल्या आहेत. मात्र, आ. पाटील यांना भेटल्यानंतर त्यांच्या मनात सुरु असलेली घुसमट पाहिली तर हा निर्णय त्यांनी मनापासून घेतला नसल्याचे स्पष्ट होते.

कराड नगरपालिका निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडींनंतर आनंदराव पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. गेल्या अडीच वर्षांत आनंदराव पाटील यांना हळू-हळू पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. आ. पृथ्वीराज चव्हाण कराडात आल्यावर कोणत्याही कार्यक्रमाला आनंदराव पाटील यांना घेतल्याशिवाय कधीही जात नव्हते. मात्र, गेल्या दीड वर्षांत आनंदराव पाटील यांना टाळून पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक कार्यक्रम घेतले. जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरुन निर्माण झालेल्या वादळानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुचनेनंतर आनंदराव पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला होता. 


आनंदराव पाटील यांना बाजुला सारुन कराड दक्षिणमधील राजकारण यशस्वी होऊ शकते का? याचा कानोसा घेण्याचे काम आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून सुरु असल्याच्या चर्चा आता रंगत आहेत. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आनंदराव पाटील यांना पूर्ण बाजुला ठेऊन कराड दक्षिणचे अध्यक्ष तथा मलकापूरचे नेते मनोहर शिंदे यांनी ही निवडणूक स्वकर्तृत्वावर लढविली. काँग्रेसला मलकापुरात पुन्हा सत्ता मिळाली असली तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ 270 मतांनी मिळालेला विजय काँग्रेससाठी धोक्याची घंटा होती आणि या निवडणुकीत आ. आनंदराव पाटील यांनी विरोधात काम केले, असा आरोप मनोहर शिंदे यांचे कार्यकर्ते खासगीत करीत होते. 

दक्षिणमधील अनेक कार्यक्रमात मनोहर शिंदे यांच्याबरोबरच बंडानाना जगताप, पै. नाना पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्यांना बरोबर घेऊन गेल्या काही महिन्यांत अनेक कार्यक्रम झाले. मात्र, या कार्यक्रमांमध्ये आ. आनंदराव पाटील यांना मुद्दामहून दूर ठेवण्यात आल्याचे व याबाबतची खलबते आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयातूनच रचल्याचा आरोप आनंदराव पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलताना केला आहे. 

आपल्याविरुद्ध आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जवळचे काहीजण कट रचत आहेत. याबाबत अनेकदा पृथ्वीराज बाबांशी चर्चा केली. मन मोकळे केले. मात्र, म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. एका आमदाराला डावलून त्याला कार्यकर्त्यासारखी किंमत देण्याचा प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. मेसेज पाठवून सभेला या, असे निमंत्रण दिले जाते. इतका मी लहान आहे का? अशी खंतही आ. पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलून दाखविली. आ. पाटील यांच्या बोलण्यातून त्यांचे पृथ्वीराज चव्हाण  यांच्याविरोधात पूर्ण मत नसले तरी बरोबरच्या कोंडाळ्याचे किती ऐकायचे? हे बाबांनी ठरवायला पाहिजे होते, हे त्यांचे विधान बरेच काही सांगून जाते.

आ. आनंदराव पाटील हे पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून दूर जाण्यामुळे निष्ठावंत या शब्दाला धक्‍का बसला आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नानांसाठी काय-काय केल नाही? नानांनी असे करायला नाही पाहिजे होते. नानांनी हे करुन फार मोठी चूक केली, असे दिवसभर लोक बोलत होते. मात्र, नानांच्या या भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांची काय प्रतिक्रिया असेल? नानांच्या या निर्णयाचा पृथ्वीराज चव्हाण यांना काय तोटा होणार आणि फायदा कोणाला होणार? याबाबत लोकांमध्ये चर्चा होती. पृथ्वीराज चव्हाण हे उच्चविद्याविभूषित नेते आहेत. त्यांच्या विशिष्ट वलयामुळे आणि त्यांनी केलेल्या कामामुळे 2014 मध्ये कराड दक्षिणमधून ते निवडून गेले होते. त्यावेळी त्यांच्या विजयात आ. आनंदराव पाटील यांची फार महत्त्वाची भूमिका होती. पृथ्वीराज चव्हाण यांचा गावागावातील गट वाढविण्याबरोबरच दक्षिणमधील प्रत्येक गावातपृथ्वीराज चव्हाण गटाचा एक माणूस तयार करण्यामध्ये आनंदराव पाटील यांचा महत्त्वाचा रोल होता. 

आनंदराव पाटील यांनी 13 सप्टेंबरच्या मेळाव्यानंतर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर पृथ्वीराज चव्हाण यांचा याचा फार मोठा तोटा होऊ शकतो. वास्तविक आ. चव्हाण यांच्या इतक्या जवळचा, घरचा माणूस त्यांच्या विरोधात गेला आहे, ही गोष्ट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी धक्‍कादायक बाब आहे. आ. चव्हाण यांना राज्यपातळीवर काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाते. काँग्रेसच्या प्रमुख पाच लोकांच्या यादीत त्यांचे नाव आहे. मात्र, त्यांच्याच जवळचा, त्यांनीच आमदार केलेला आनंदराव पाटील यांच्यासारखा नेता काँग्रेस सोडून का जातो? याचे उत्तर पृथ्वीराज चव्हाण यांना लोक राज्यभर विचारणार आहेत.


आनंदराव पाटील यांची गेल्या काही महिन्यांत झालेली घुसमट जर त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कानावर घालूनही आ. चव्हाण यांनी त्याकडे खरेच दुर्लक्ष केले असेल तर आ. चव्हाण माणसे हाताळायला कमी पडतात, हा त्यांच्यावर होत असलेला आरोप खरा म्हणावा लागेल. सुरुवातीपासूनच ठराविक लोकांचेच ऐकायचे. तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवायचा नाही. एक-दोघांच्याच पूर्ण आहारी जायचे, ही आ. पृथ्वीराज चव्हाण यांची जुनी सवय आहे. फक्‍त राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील राजकारणाचा विचार करायचा. जिल्ह्याकडे आणि स्वतःच्या गावाकडे कामापुरतं पहायचं, ही पृथ्वीराज चव्हाण यांची कार्यपद्धती राहिली आहे. या कार्यपद्धतीनुसारच आ. चव्हाण यांनी एकेकाळी आनंदराव पाटील यांना फार मोठे स्थान देऊन इतरांना बाजुला केले होते. आनंदराव पाटील यांच्याकडून पक्षीय किंवा वैयक्‍तिक पातळीवर झालेल्या तथाकथित चुकांची शिक्षा म्हणून त्यांना दुर्लक्षित करण्याचा आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा निर्णय तसा अयोग्यच होता.


आनंदराव पाटील हे कधीही पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात जाऊ शकत नाहीत.. जाणारही नाहीत किंवा करुन करुन ते काय करतील? हे गृहित धरुन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना दुर्लक्षित ठेवले, असे म्हणावे लागेल. एकावेळेला सर्व कार्यकर्त्यांना समान अंतरावर ठेवून राजकारण करण्याची खेळी पृथ्वीराज चव्हाण यांना करता येत नाही. कारण ते गाव पातळीवरील राजकारणात जास्त लक्ष देत नाहीत. मात्र आनंदराव पाटील हे दुर्लक्षित करण्याइतके छोटे कार्यकर्ते नव्हते. त्यामुळे याबाबत दुर्लक्षामुळे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना भविष्यात त्रास होणार की नाही हे काळच ठरवेल.