Tue, Jul 07, 2020 08:44होमपेज › Satara › नगरपालिकेबाबत भाजपाची भूमिका काय?

नगरपालिकेबाबत भाजपाची भूमिका काय?

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 10:25PMकराड : अमोल चव्हाण

मलकापूर नगरपंचायतीस ‘क’ वर्ग नगरपालिकेचा दर्जा मिळावा यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी नगरपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपा मंत्र्यांची भेट घेऊन मलकापूर नगरपालिकेची घोषणा करण्याची मागणी केली होती. तर दुसर्‍या बाजूला न्यायालयात जनहित याचिका दाखल करत नगरपालिकेसाठी उपोषणही केले होते. याच पार्श्‍वभुमीवर गुरुवार दि. 17 रोजी मलकापूरमध्ये होणार्‍या भाजपाच्या मेळाव्यात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील काय घोषणा करणार? याकडे मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे.   

मलकापूर ग्रामपंचायतीचे 5 एप्रिल 2008 रोजी नगरपंचायतीत रुपांतर झाले तेंव्हापासूनच मलकापूरला नगरपालिकेचे वेध लागले होते. मलकापूरची लोकसंख्या झपाट्याने वाटत असून 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 31 हजार 671 इतकी आहे. परंतु, मलकापूरच्या विकासाचा वेग व त्यामुळे शहरात येणार्‍या लोकांचा विचार करता सध्या ही लोकसंख्या 45 हजाराच्यावर गेली आहे. त्यामुळे लोकसंख्येचा विचार करता मलकापूरला ‘क’ वर्ग नगरपालिकेचा दर्जा द्यावा असा ठराव नगरपंचायतीने 5 ऑक्टोबर 2013 रोजीच्या सर्वसाधारण सभेत करून तो शासनाला पाठविला आहे.    

त्यानंतर काही दिवसातच म्हणजेच सुमारे दोन वषार्ंपुर्वी भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड दौर्‍यावर आले असता त्यांनी एका कार्यक्रमात मलकापूरला लवकरच नगरपरिषदेचा दर्जा देण्याबाबतचे सुतोवाच केले होते. स्वत: मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यामुळे मलकापूरला लवकरच नगरपालिका होईल, असे वाटत होते. सत्ताधार्‍यांना ग्रामपंचायतीप्रमाणे नगरपंचायतीचीही सत्ता अर्धावरच सोडावी लागते की काय? अशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर असे काय झाले की दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप मलकापूरच्या नगरपालिकेबाबत मुख्यमंत्री किंवा भाजपाचे स्थानिक नेतेही जाहीरपणे काहीही बोलले नाहीत. स्थानिक नेत्यांनी खासगीत ना. चंद्रकांतदादांना काही कानगोष्टी सांगितल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर चंद्रकांतदादांनी मुख्यमंत्र्यांना काहीतरी सांगितल्यामुळेच की काय? नगरपालिकेच्या घोषणेचे भिजत घोंगडे कायम आहे?, असे बोलले जात आहे.  

मलकापूरला नगरपरिषद व्हावी ही सध्या जशी सत्ताधार्‍यांची इच्छा आहे तशीच ती दोनवषार्ंपुर्वी भाजपाचीही होती. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी मलकापूर नगरपालिकेबाबत आश्‍वासन दिले नसणार? मग आताच काय झाले की सर्वांची इच्छा असूनही मलकापूर नगरपालिकेची घोषण करण्यासाठी न्यायालयात जाण्याबरोबरच सत्ताधार्‍यांना उपोषण करावे लागते. त्यातच नगराध्यक्षपदाच्या जाहीर झालेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधार्‍यांच्या उपोषणाला विरोध करत विरोधकांनी फूस लावल्यामुळे काहीनी उपोषण केले होते. मात्र, नगराध्यक्षपदाचे आरक्षण कायम ठेवा पण मलकापूरला नगरपालिका करा अशी भुमिका मनोहर शिंदे यांनी घेतल्याने विरोधकांच्या उपोषणातील हवाच निघून गेली. 

दरम्यान, मलकापूर नगरपंचायतीची मुदत 29 सप्टेंबर 2018 रोजी संपत असल्याने निवडणुक आयोगाने निवडणुकीची पुर्व तयारी सुरु केली आहे. 17 सदस्य संख्या निश्‍चित करून त्याप्रमाणे प्रभाग रचना, सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम सुरु ठेवला आहे. जर नगरपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेमध्ये झाले नाही तर दोन सदस्यांना संधी मिळणार नाही. त्यांना सदस्य पदास मुकावे लागणार असून नागरिकांवर तो एकप्रकारे अन्यायच आहे. तसेच नगरपरिषदेच्या विकासासाठी येणारा अतिरिक्त निधीही उपलब्ध होणार नाही. 

सध्या नगरपंचायतीची निवडणुक झाल्यास त्यानंतर काही कालावधीतच लोकसंख्या व इतर बाबींचा विचार करून नगरपालिका जाहीर करून पुन्हा मलकापूरला नगरपालिकेसाठी निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे निवडणुकीवर दोनवेळा खर्च होण्यापेक्षा सध्या मुलकापूरची लोकसंख्या व इतर बाबींचा विचार करून नगरपालिकेची घोषणा करणे मलकापूरकरांच्या हिताचेच आहे.  

मलकापूर नगरपालिका व्हावी म्हणून भाजपाचे स्थानिक नेते आडकाठी आणत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावरही भाजपाच्या नेत्यांनी किंवा कोणीही काहीही प्रतित्तर दिले नाही. कदाचित मलकापूरच्या नगरपालिकेबाबत योग्य वेळी बोलण्याचा निर्णय भाजपाच्या नेत्यांनी घेतला असावा. आणि त्यासाठीच मलकापूरमध्ये उद्याचा  भाजपाचा मेळावा आयोजित केला आहे की काय? अशी चर्चा आहे. 

मलकापूरमध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर गुरुवार दि. 17 रोजी होणार्‍या भाजपाच्या मेळाव्यात नगरपालिकेबाब काय निर्णय होतो. भाजपाचे स्थानिक नेते जसे मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करून घेतली तसेच महसूल मंत्री चंद्रकांतदादांकडून मलकापूरच्या नगरपालिकेबाबतची घोषणा करून घेणार का? मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात सहीसाठी अडकलेल्या फाईलवर मंत्रीमंडळातील वजनदार नेते चंद्रकांतदांदानी सांगितले तर त्वरीत सही होऊ शकते. त्यामुळे भाजपाचे स्थानिक नेते व भाजपाचे मंत्री चंद्रकांतदादा मलकापूर नगरपालिकेबाबत उद्याच्या भाजपाच्या मेळाव्यात काय भुमिका घेणार? काय घोषणा करणार? याकडे मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे.