तारळे : एकनाथ माळी
तारळे विभागातील पाबळवाडी येथे नैसर्गिक अनेक झर्यामधून वाहत असलेले पाणी गावाची पिण्याचे पाणी, जनावरांचे व खर्चाचे पाणी भागवून दहा बारा एकर शेती ऐन उन्हाळ्यात पाण्याखाली येत आहे.त्यासाठी गावाने एकजूटीने पाण्याचे योग्य नियोजन केले आहे.
उन्हाची काहीली वाढत चालली आहे. तारळे विभागात अनेक गावे डोंगर परिसरात वसली आहेत. अनेक ठिकाणी पाण्याची चणचण भासत असताना पाबळवाडी, बांधवाट, बोर्गेवाडी, जळव, जन्नेवाडीसह अनेक गावामध्ये नैसर्गिक झर्याचे पाणी गावाची, गुराढोरांची तहान भागवत आहे. पण पाबळवाडी या छोट्याशा गावाने पाण्याचे अप्रतिम नियोजन करुन पाण्याचा पूरेपूर वापर करत बारमाही उत्पन्न काढत आहे. एखाद्या इंजिनियरला ही लाजवेल, असे पाणी नियोजन डोंगरावर राहणार्या लोकांनी केले आहे.
तारळे - पाटण रस्त्यावर उजव्या बाजुला हजारो फूट उंचीच्या डोंगरावर निसर्गाच्या कुशीत हे गाव वसले आहे. येथे पांडवकालीन तारकेश्वर मंदिर असुन पांडव व श्रीराम यांच्या पवित्र पदस्पर्शाने गाव पवित्र असल्याची आख्यायिका सांगितली जाते. मंदिराच्या बाजूने जाणार्या ओढ्याच्या पाण्यावर गावकर्यांनी पाण्याचे नियोजन केले आहे. त्या परिसरात आंबा, फणस यांची मोठमोठी झाडे आहेत. त्याची विक्री करून शेतकरी आपले अर्थिक नियोजन करतात.
पाबळवाडी गावच्या पश्चिमेस सुमारे एक किलोमीटर अंतरावर नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आहे. लहान लहान झरे एकत्र येत पाण्याचा प्रवाह बनत आहे. त्याच पाण्यावर गावची, जनावरांची व शेतीची तहान भागवली जात आहे. दाट झाडी व ऐन उन्हाळ्यात सुद्धा मुबलक पाणी असल्याने अनेक जंगली प्राणीही या परिसरात वावरतात. अनेक पर्यटक हे निसर्गरम्य ठिकाण पाहण्यासाठी येत असतात.
नैसर्गिक स्त्रोतापासून पाणी नियोजन करुन गावापर्यंत आणले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रॅव्हिटीने तर खर्चासाठी लागणारे पाणी सिमेंटचा नाला बांधून एका ठिकाणी आणला आहे. त्याठिकाणी पाणी भरण्याबरोबर कपडे धुण्यासाठी मोठा कट्टा बांधण्यात आला आहे.त्यापुढे जाऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी भला मोठा पाण्याचा हौद बांधला आहे. सर्व पाणी त्या टाकीत जाऊन पाण्याचा पुर्नवापर होण्यासाठी पाईपने ते पाणी हौदात सोडले आहे.
हौदाच्या दुसर्या बाजूला तळात व्हाल्व बसवून ते पाणी शेतीसाठी वापरले जाते. त्या पाण्यावर दोन तीन पिके घेतली जातात. त्याचबरोबर जनावरांना वर्षभर ओला चारा उपलब्ध होण्यासाठी त्या हौदाच्या पाण्यावर इतर पिकासह मका, बाजरी व अन्य वैरणीची मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. काही वर्षापूर्वी फक्त गावठी गुरांचे पशुपालन केले जात होते. पण आता ओला चारा बारमाही उपलब्ध होत असल्याने आता संकरीत गायी शेतकर्यांकडून पाळण्यात येत आहे.
शेती हा मुख्य व्यवसाय येथील लोकांचा आहे. त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय म्हणून गायी, म्हैशी व शेळीपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तारकेश्वर मंदिर परिसरामध्ये एका मोठ्या खड्ड्यात पाणी साठत असून त्याठिकाणी गावातील व एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलवाडा येथील जनावरे पाणी पिण्यासाठी व धुण्यासाठी आणली जातात.
Tags : satara Pabalwadi, Water supply,