Sat, Oct 24, 2020 09:24होमपेज › Satara › तीन राज्यातील ‘वॉन्टेड’ना अटक

तीन राज्यातील ‘वॉन्टेड’ना अटक

Last Updated: Oct 19 2020 2:08AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा शहरातील कॅनरा बँकमधील एटीएम मशीनमधून वेळोवेळी तब्बल 2 लाख रुपये ‘हात की सफाई’ करुन चोरी करणार्‍या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी छडा लावला. संशयित टोळी महाराष्ट्रासह तीन राज्यात वॉन्टेड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी हरियाणा राज्यात धडक मारुन संशयितांना थरारकपणे पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी, सातार्‍यातील राधिका चौकातील कॅनरा बँकेच्या एटीएममधून अज्ञात चोरट्यांनी हात चलाखी करुन वेळोवेळी पैसे चोरी केल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. सपोनि विशाल वायकर यांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यांना धागेदोरे लागत गेले. गुन्ह्याची व्याप्ती व त्यातील गांभीर्य मोठे असल्याने ही बाब पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांना सांगितली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी शाहूपुरी पोलिसांना तपासाचा ‘फ्री हॅन्ड’ दिला.

शाहूपुरी पोलिसांनी खोलात जावून तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यांना संशयितांची माहिती मिळाली. मात्र संशयित हरियाना राज्यात होते. परराज्यात जाण्यासाठी सातारा पोलिसांनी तयारी केल्यानंतर सपोनि संदीप शितोळे, पोलिस हवालदार स्वप्नील कुंभार, मोहन पवार, पंकज मोहिते हे रवाना झाले. पोलिस तपासाला गेल्यानंतर तेथे त्यांना अडचणी आल्या. काही थरारक अनुभव आल्यानंतर त्यावर मात करत ते संशयितांपर्यंत पोहचले. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांचे पथक सातार्‍याकडे रवाना झाले.

शाहूपुरी पोलिस ठाण्याप्रमाणेच शहर पोलिस ठाण्यातही अशाचप्रकारचा एक गुन्हा 15 दिवसांपूर्वी दाखल झाला आहे. यामध्ये याच टोळीचा समावेश असण्याची शक्यता आहे. यामुळे आतापर्यंत नेमक्या किती राज्यात किती एटीएम चोरट्यांनी टार्गेट केली आहेत हे तपासाअंती समोर येणार आहे. दरम्यान, शनिवारी रात्री हे पोलिसांचे पथक शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी तपास पथकाला हार घालून फटाके देखील फोडण्यात आले. संशयितांना न्यायालयात हजर करुन त्यांच्याकडे पुढील तपास सुरु केला जाणार आहेे.

कारमधून घालायचे धुडगूस...

शाहूपुरी पोलिसांनी संशयितांकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांच्या मालिकेचीच कबुली दिली. सातार्‍यासह कोल्हापूर, पुणे, मुंबई याशिवाय गुजरात व कर्नाटक राज्यातही या टोळीने धुडगूस घातला आहेे. हात चलाखीने संशयित एटीम सेंटरमध्ये जात. तेथे तांत्रिक बाबी करुन टप्प्याटप्प्याने 5 ते 25 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढत. एका एका शहरात राहून लाखो रुपयांची माया गोळा करुन ते पुढच्या जिल्ह्यात जात. यासाठी संशयित कार वापरत असल्याचेही समोर आले आहेे.

 "