Mon, Jul 06, 2020 04:33होमपेज › Satara › उंडाळकरांच्या अस्तित्वाची विधानसभेपूर्वीच झलक

उंडाळकरांच्या अस्तित्वाची विधानसभेपूर्वीच झलक

Published On: Jan 31 2019 1:33AM | Last Updated: Jan 30 2019 11:02PM
कराड : अशोक मोहने 

विधानसभेची सेमी फायनल म्हणून मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले होते. काँग्रेस विरूध्द सेना-भाजप युती असा थेट सामना झाल्याने येथील लढत लक्षवेधी बनली होती. या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला असला तरी  माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर गटाला वगळून हा विजय साजरा करता येणार नाही हेही तेवढेच खरे आहे. काका-बाबा गटाचे हे समिकरण पुढे किती काळ चालेल, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात शंका असली तरी विधानसभा निवडणुुकीपूर्वीच उंडाळकर काकांनी आपल्या अस्तित्वाची जाणीव या निकालाने करून दिली, याकडे डोळेझाक करून चालणार नाही.

मलकापूर नगरपालिकेची स्थापनेनंतरची ही पहिलीच  निवडणूक होती. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची व रंगतदार होणार याची अटकळ सुरूवातीपासूनच बांधली गेली होती. झालेही तसेच. काँग्रेस विरूध्द भाजप- सेना युती असा थेट सामना झाला. काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ मिळाली  शिवाय काका- बाबा गटाचे समिकरणही या ठिकाणी जुळून आले. मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचे राजकीय कसब कामी आले.  

उंडाळकर पूत्र अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी फार न ताणता मनोहर शिंदे यांना पूर्ण ताकदीने मदत करण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णय घेवून ते थांबले नाहीत तर कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी कामाला लावली. त्याच वेळी उंडाळकर यांचे नेतृत्व मानणारे सुहास कदम व राजू मुल्ला यांनी ऐन रणधुमाळीत ना. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपात उडी मारली. त्यांच्या जाण्याने सत्ताधारी गटाला मोठा फटका बसेल अशी चर्चा होती, पण निकालानंतर ही केवळ चर्चाच राहिली.

मलकापूरमध्ये 19 हजारहून अधिक मतदार आहेत. 9 वॉर्डमध्ये हे मतदार विभागले आहेत. जुने मलकापूर व आगाशिवनगर या भागाचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये उंडाळकर गटाचे साधारण अडीत ते तीन हजाराच्या घरात मतदार आहेत, असे मानले जाते. या मतांवर आपला दणदणीत विजय होईल, अशा विश्‍वास सत्ताधार्‍यांना होता. शिवाय राष्ट्रवादी सोबत होतीच.निवडणूक प्रचारा दरम्यान उदयसिंह पाटील यांनी काँग्रेस उमेदवारांचे मनापासून काम केले. त्यांच्या प्रचारार्थ पाच जाहीर सभा घेतल्या. बारा ते चौदा कोपरा सभा घेतल्या. याशिवाय घरभेटीही झाल्याच.

मलकापूर मधील वॉर्ड नं. 5, 6 व 7 मध्ये काका गटाचे प्राबल्य  आहे.  वॉर्ड 1 मध्येही काका गटाला मानणारे कार्यकर्ते आहेत. शिवाय झोपडपट्टीत साठे मित्र मंडळासह त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योग या निमित्ताने दक्षिण मतदार संघातील शेकडो कुटुंब मलकापूरमध्ये स्थायिक आहेत. या  सार्‍याचा अपेक्षित परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला.

दुसर्‍या बाजुला भाजपानेही मलकापूर ताब्यात घेण्यासाठी मोठी ताकद लावली होती. राज्य मंत्रीमंडळातील दोन नंबरचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सहा मंत्र्यांच्या सभा मलकापूरमध्ये झाल्या. कराडचे नगरसेवकही भाजपचे मफलर गळ्यात बांधून सांगता सभेत व्यासपीठावर होते. शिवाय कृष्णा समूहामुळे ना. डॉ. अतुल भोसले यांचे हक्काचे मतदान मलकापूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.  

मतदारांमध्ये सत्ताधार्‍यांबद्दल असणारी नाराजी आणि राज्यातील सत्तेमुळे मलकापूरच्या विकासासाठी भरीव निधी आणता येईल या जमेच्या बाजू गृहीत धरून मलकापूरमध्ये परिवर्तन करता येईल ही ना. डॉ. अतुल भोसले यांची महत्वकांक्षा होती, पण त्यांना विजयाने चकवा दिला. 

काँग्रेसने मलकापूरची सत्ता राखली पण स्वतः मनोहर शिंदे यांनीही हा निसटता विजय अपेक्षित नसल्याचे बोलून दाखविले. मतांची टक्केवारी का घटली याचे आत्मचिंतन त्यांना करावे लागेल. हा विजय काका -बाबा समिकरणाचा असला तरी हे समिकरण  पुढे किती काळ टिकेल, टिकेल की नाही  याची चिंता कार्यकर्त्यांना आत्तापासूनच लागली आहे. मी काँग्रेसची ध्येयधोरणे सोडलेली नाहीत, विचार सोडलेले नाहीत असे उंडाळकर जाहीर कार्यक्रमात बोलतात. तर काँग्रेस विचारांच्या सर्वांना सोबत घेऊ असे आ. पृथ्वीराज चव्हाण सांगतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काका- बाबा समिकरण कोणते राजकीय वळण घेणार याचे चित्र तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात अधिक स्पष्ट होईल.