Mon, Aug 10, 2020 05:21होमपेज › Satara › मी माणसात विठ्ठल पाहिला 

मी माणसात विठ्ठल पाहिला 

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 11:02PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

काँग्रेसची राष्ट्रीय विचारधारा माझ्या नसानसात भिणली आहे. त्या विचारधारेशी मी फारकत घेऊ शकत नाही. माझी काही जीवन मुल्ये आहेत. मी पंढरपूरला फारसा गेलो नाही, पण माणसात देव पाहिला आणि त्यांचीच आयुष्यभर मनस्वी सेवा करत राहिलो, अशी कृतज्ञ भावना माजी विधी व न्याय मंत्री विलासराव पाटील -उंडाळकर यांनी व्यक्त केली. 

विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृह मंत्री सुशिलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर होते. 

विलासराव उंडाळकर यांनी वीस मिनिटांच्या आपल्या भाषणात आपल्या राजकीय वाटचाली बरोबरच भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, माझी काही जीवन मुल्ये, विचारधारा आहे. ती बाजारात विकत मिळत नाही. संपूर्ण जीवन जनतेसाठी समर्पित केले आहे. वैचारीक लढा देवून व रचनात्मक काम करून लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.  

समाज विज्ञाननिष्ठ झाला पाहिजे हा दृष्टीकोण ठेवून काम केले. ते आजही सुरू आहे. मी थकलेलो नाही. माझा तांत्रिक पराभव झाला असला तरी समाजसेवेचा वसा सोडलेला नाही, सोडणार नाही. सातारा जिल्हा ही यशवंतराव चव्हाण  यांची भूमी आहे. वैचारीक गुलामगिरी  स्वीकारू नका, असे स्व.चव्हाण यांनी सांगितले होते. आता मात्र पक्षाला आलेली मरगळ जिव्हारी लागत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून घरातील सामाजिक समतेच्या वातावरणात माझी जडणघडण झाली आहे. राष्ट्रीय विचाराशी कधी प्रतारणा केली नाही. मात्र सध्या वैचारिक गुलामगिरी लादली जात आहे. लोकशाही समाजव्यवस्थेला गृहण लागले असून लोकशाही वाचवावी लागेल.

काँग्रेसने मानव मुक्तीचा विचार मांडला. सामान्य माणसाला सत्तेच्या केंद्रस्थानी आणले. स्व.यशवंतराव चव्हाण यांचा हाच विचार राजकारण, समाजकारण करताना जपला. कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. हजारो संसार उभे केले. आज तिसर्‍या पिढीशी माझे नाते घट्ट आहे. कराड दक्षिणच्या लोकप्रतिनिधींना आज वाड्या वस्त्या माहित नाहीत. गाडीतून जाताना शेजारी विचारावे लागले ही वाडी कुठली? असा चिमटा आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता काढत हे फारकाळ चालणार नाही, असा विश्‍वास उंडाळकर यांनी व्यक्त केला. 

दक्षिणच्या  वाडी वस्तीवर रस्ते, पाणी, लाईट अशा मुलभूत सुविधा पोहचवल्या. जिथे तुळशीचे लग्न लावण्यासाठी ऊस मिळत नव्हता, रोजगारासाठी लोक पुणे मुंबईला जात होते तो भाग पाण्याने सुजलाम सुफलाम केला. नदीजोड प्रकल्प, गाव तिथे रस्ता वाडी तिथे वीज, आरोग्य सेवा, शेती अशा चोहोबाजुनी भागाचा सर्वांगिण विकास साधला. जनता हिच माझी ताकद आणि जनसेवा हेच माझे कार्य भविष्यातही सुरू राहील,अशी ग्वाही उंडाळकर यांनी दिली. यावेळी सुशिलकुमार शिंदे व कुमार केतकर यांच्याहस्ते विलासराव उंडाळकर यांना मानपत्र देण्यात आले. मानत्राचे वाचन धनाजी काटकर यांनी केले. सूत्रसंचालन सुधील गाडगीळ यांनी केले. आभार अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी मानले. 

भटशाही हटाव: ज्ञानेश महाराव 

देशात टोप्या घालणारांचे सरकार आहे. सत्तेपेक्षा धर्मसत्ता मोठी असे नरेंद्र महाराज सांगतात. देशात लोकशाही आणि रयतेपेक्षा कोणी मोठा नाही. आणि असे म्हणणारांना ‘भारत छोडो’ म्हणण्याची वेळ आली आहे. बुवाबाजी, भटशाही हटावचा नारा देण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी व्यक्त केले. लोकशाही विरोधी भूमिका घेणार्‍या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार्‍या भाजप सरकार विरोधात ज्ञानेश महाराव यांनी जोरदार टीका केली.  आज ‘भारत छोडो’ आंदोलनाचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना हा एक योगायोग आहे. क्रांतीसिह नाना पाटील यांच्या पत्रीसरकारचा इतिहास सातारा जिल्ह्याला आहे. या इतिहासाला स्मरून भटशाही व बुवाबाजी सरकार विरोधात कडवा संघर्ष उभा करावा लागणार आहे, असेही महाराव म्हणाले.