Wed, Jul 08, 2020 15:18होमपेज › Satara › उरमोडी प्रकल्पग्रस्तांची अधिकार्‍यांकडून बोळवण 

उरमोडी प्रकल्पग्रस्तांची अधिकार्‍यांकडून बोळवण 

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 8:50PMपरळी : सोमनाथ राऊत

उरमोडी प्रकल्पग्रस्तांनी अधिकार्‍यांकडून बोळवण होत असल्याची तक्रार केली आहे. पुनर्वसनासह विविध प्रश्‍न वर्षानुवर्षे प्रलंबित असून त्यावर ठोस निर्णय घेतले जात नसून केवळ आश्‍वासने देवून प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली जात असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. 

उरमोडी धरणग्रस्तांना शासन दरबारी लाल फितीचा अनुभव येत आहे. पुनर्वसनासह विविध प्रश्‍नांची सोडवणूक होत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.  उरमोडी धरणग्रस्त कृति समितीने दि. 21 डिसेंबर 2017 रोजी उरमोडी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हा प्रशासन  बैठक घेत नसल्याने धरणावर शासनाचे श्राद्ध घालण्याचे आंदोलन आयोजित केले होते. त्यावेळी पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी मध्यस्थी करुन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची बैठक घडवून आणली आणि आंदोलन स्थगित करण्यास सांगितले.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी येणार्‍या 15 दिवसांत मी पुनर्वसन महसूल पाटबंधारे विभागाला एकत्रित करुन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्याचे आदेश देते व मी स्वत: दि. 17 जानेवारीला प्रगल्पग्रस्त गावांना भेटी देवून पाहणी दौरा करणार असल्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात बुधवार दि. 17 जानेवारी रोजी लुमणेखोल येथे  बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारती भोसले, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, उरमोडी धरण कार्यकारी अभियंता शरद गायकवाड, उपअभियंता अनिता गोडसे हेच अधिकारी बैठकीला आले.

बैठकीदरम्यान उरमोडी प्रकल्पग्रस्तांनी दि. 14 मे 2010 चे परिपत्रकात प्रकल्पाच्या बॅक वॉटरला असलेल्या गावांच्या नागरी सुविधा रद्द केल्या आहेत.  त्या त्यांच्या अटी शिथील केल्या का? ज्या प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळाल्या आहेत त्या जमिनीतूनच पुन्हा कालवे काढले आहेत. त्यांना पर्यायी जमीन कधी मिळणार? असे अनेक प्रश्‍न  व अडीअडचणी प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केले. त्यावर अधिकार्‍यांनी हे धोरणात्मक निर्णय असून यावर आम्ही निर्णय घेवू शकत नाही अशी उत्तरे देवून तारीख पे तारीख अशीच बैठक लांबवली.

या बैठकीला धरणग्रस्त कृति समितीचे वसंत भंडारे, बबन देवरे, जगन्नाथ अरगडे, सुधीर देसाई, हणमंत देवरे, राम वाईकर, तानाजी वांगडे, बाळासाहेब अनगळ आदि पदधिकारी दहिवड, पुनवडी, वडगाव, आंबवडे बु॥, नित्रळ, कासारथळ, ताकवली, बनघर आदि परिसरातील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. या बैठकीनंतरही प्रश्‍न सुटण्याच्यादृष्टीने कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याचे उरमोडी धरणग्रस्तांचे म्हणणे आहे. आम्हाला न्याय तरी कधी मिळणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.