Sat, Sep 19, 2020 12:36होमपेज › Satara › लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला

लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला

Last Updated: Jul 26 2020 10:57PM

संग्रहित छायाचित्रसातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रविवारी पुन्हा एकदा लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला आहे. दि. 17 ते 26 या कालावधीत लॉकडाऊन जाहीर केला होता. रविवारी मुदत संपताच दुपारी सर्व आस्थापना सकाळी 9 ते 2 या वेळेत सुरू ठेवण्याचा आदेश प्रशासनाने काढला होता. मात्र, सायंकाळी अचानक हा आदेश बदलून फक्‍त अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याचा नवा आदेश काढण्यात आला. या प्रकारामुळे जिल्हावासीयांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली होती. 

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्याने तीन हजारी पार केली आहे. तर, कोरोनामुळे 100 जणांचा जीव गेला आहे. याच पार्श्‍वभूमीवर दि. 17 ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊनचा कालावधी रविवारी संपला. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी दुपारी आदेश काढून पूर्वीचाच 9 जुलैचा आदेश राबवण्याच्या सूचना केल्या. त्यामध्ये सर्व दुकाने सकाळी 9 ते 2 या वेळेत सुरू करण्याचे आदेश होते. परंतु, सायंकाळी दुपारी काढलेला आदेश रद्द करून पुन्हा नव्याने सुधारित आदेश काढण्यात आला. त्यामध्ये फक्‍त अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आल्या आहेत. बाकी सर्व आस्थापना व दुकाने बंदच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, मंगल कार्यालये, हॉल, लग्‍न समारंभ, स्वागत समारंभ बंद राहतील. मात्र, 14 जुलैपूर्वी परवानगी घेण्यात आलेले खासगी जागेतील व मंगल कार्यालयातील समारंभास 20 पेक्षा कमी व्यक्‍तीच्या उपस्थितीत कार्यक्रम करता येतील. सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक करण्यास व सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग घेण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. 

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा कुणी विरोध दर्शवल्यास संबंधितांविरोधात पोलिस व संबंधित कर्मचार्‍यांनी कायदेशीर कारवाई करावी, असेही शेखर सिंह यांनी बजावले आहे.

प्रशासनाला दरभोळ आहे की नाही 

कोरोनाची लागण झाल्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्हा प्रशासन सातत्याने विसंगत व संभ्रमावस्था निर्माण करणारे निर्णय घेताना दिसत आहे. एखादा निर्णय घेतला तर त्यावर ठाम राहिले पाहिजे. मात्र, सकाळी एक निर्णय, दुपारी दुसरा अन् संध्याकाळी तिसरा. अशी आजवरची परंपरा राहिली आहे. याबाबत अनेकदा अनेक पत्रकार परिषदांमधून प्रशासनाने जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते समाजावर प्रभाव असणार्‍या व्यक्‍तींशी चर्चा करून घ्यावेत. अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या होत्या. मात्र, कोणाचेच ऐकून घेण्याची मानसिकता नसल्याने आणि ‘आपला तो बाब्या’ अशा पद्धतीने निर्णय रेटायची सवय लागून गेल्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारीसुद्धा हीच परंपरा कायम राहिली. रविवारी दुपारी 31 जुलैपर्यंत 9 ते 2 या कालावधीत सर्व दुकाने सुरू राहतील, अशा पद्धतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. संध्याकाळी पुन्हा सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवून फक्‍त अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. निर्णय घेताना कुणाचा कुणाला पायपोस राहिला नाही, दरभोळ राहिला नाही. जनतेला वेगवेगळ्या निर्णयांच्या मागे फरफटत नेले जात आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. 

हे सुरु...

अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी सर्व किराणा दुकाने प सर्व भाजीमार्केट, आठवडा मंडई, फळ विक्रेते
मटण, चिकन, अंडी, मासे
दूध विक्री, घरपोच दुधाचे वितरण व वर्तमानपत्र वितरण
सर्व मेडिकल दुकाने
पेट्रोल व गॅस वितरण
घरपोच अन्‍न व मद्य विक्री
सर्व बँका, पतसंस्था, सहकारी संस्था, सर्व प्रकारची कृषी व औषध दुकाने.
शेतीकामे व दुग्ध व्यवसाय
पसार्वजनिक आरोग्य सुविधा, खासगी दवाखाने व पशुचिकित्सा सेवा
राष्ट्रीय प्रकल्प व शासकीय कामे 
औषध व अन्‍न प्रक्रिया उद्योग
मद्य व खाद्य पदार्थांची पार्सल सेवा

हे बंद...

सर्व दुकाने व आस्थापना
उपहारगृह, लॉज, बार, हॉटेल्स, मॉल, बाजार, रिसॉर्ट, मार्केट 
सार्वजनिक व खासगी क्रीडांगणे, उद्याने, बगीचे, केशकर्तनालय, स्पा, ब्युटी पार्लर
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था 
धार्मिकस्थळे व प्रार्थनास्थळे.
शॉपिंग मॉल, हॉटेल, 
रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस.
खासगी बांधकाम व कन्स्ट्रक्शन, मंगल कार्यालय, हॉल, लग्‍न व स्वागत समारंभ
चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कलाकेंद्र, प्रेक्षागृह, सभागृह.
सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, सभा.
सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहतूक.

 "