Sun, Jul 12, 2020 17:41होमपेज › Satara › उदयनराजे पहिल्यांदाच पोहोचले संसदेत

उदयनराजे पहिल्यांदाच पोहोचले संसदेत

Published On: Mar 25 2019 1:50AM | Last Updated: Mar 24 2019 11:24PM
सातारा : प्रतिनिधी

लोकसभेच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत 2009 मध्ये सातारा जिल्ह्यातील राजकीय पटलावर मोठा बदलाव झाला. पुनर्रचनेमुळे कराड लोकसभा मतदारसंघ रद्द झाला. त्याचवेळी नव्या माढा लोकसभा मतदार संघाचा जन्म झाला. पुनर्रचित सातारा मतदार संघातून  राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच संसदेत प्रवेश केला. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार पुरूषोत्‍तम जाधव यांचा पराभव केला. उदयनराजेंनी जाधव यांच्यावर  तब्बल 2 लाख 97 हजार 515 मतांनी विजय मिळवत पुनर्रचनेनंतरही राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम ठेवला.   दरम्यान, नव्या माढा मतदार संघात शरद पवार यांनी दणदणीत विजय मिळवला. 

सन 2009 मध्ये मतदार संघाची पुनर्रचना झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील कराड मतदार संघ रद्द झाला. पुनर्रचित सातारा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोण करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचंड मताधिक्क्य मिळवून हिरोगिरी सिध्द केली. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बसपा, रासप व एक अपक्ष असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याने सातारा लोकसभेची निवडणूक पंचरंगी झाली.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेवून श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश मिळवला होता. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आाणि भाजपच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांचीही भेट घेतली होती.  तसेच माढा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करत राजकीय दबावतंत्र अवलंबले होते. त्यांच्या खेळ्या यशस्वी होत गेल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या श्री. छ. उदयनराजेंची पाटी कोरीच होती. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी किमान सहा महिने आधी उदयनराजेंनी विविध प्रश्‍नांवर रान उठवून वातावरण निर्मिती केली होती. ना. शरद पवार यांनी राष्ट्रवादीतून उदयनराजेंना उमेदवारी दिल्याने हा बालेकिल्ला आणखी मजबूत झाला.  उदयनराजे निवडून येणार हे नक्‍की होते.   पवारांची ही खेळी यशस्वी झाली. सातारा लोकसभा मतदारसंघ सुरक्षित राहिला. सुमारे 3 लाखाच्या फरकाने उदयनराजे विजयी झाले. 

सातारा, कराड उत्‍तर, कोरेगाव या विधानसभा मतदारसंघावर सातारा तालुक्याच्या राजकारणाचा प्रभाव राहिला. सातारा विधानसभा मतदारसंघातून आ. शिवेंद्रराजे भोसले  यांच्या प्रयत्नामुळे उदयनराजेंना मोठी आघाडी मिळाली. कराड उत्‍तर मतदारसंघातून आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, युवा नेते अतुल भोसले यांनी केलेले प्रयत्न कामी आले. कोरेगाव मतदारसंघात आ. शालिनीताई पाटील, यशवंत भोसले व काँग्रेस राष्ट्रवादीची भक्‍कम फळी उदयनराजेंना मताधिक्क्य देवून गेली.पाटण तालुक्यात आ. विक्रमसिंह पाटणकर यांच्याबरोबर आ. शंभूराज देसाई यांच्या गटानेही उदयनराजेंचेच काम केल्याचे निकालातून स्पष्ट झाले. कराड दक्षिण मतदारसंघात भोसले-मोहिते गटाचा प्रभाव दिसून आला. वाई मतदारसंघाने उदयनराजेंचे मताधिक्य घटवले. या मतदारसंघात खंडाळा तालुक्याने उदयनराजेंऐवजी भूमिपुत्राला साथ देण्याचा निर्णय घेतला. वाई तालुक्यातही तशीच परिस्थिती झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, बावधन गटाने उदयनराजेंना मोठे मताधिक्क्य दिले होते. 

ही निवडणूक श्री. छ. उदयनराजे भोसले व शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव या उमेदवारांमध्येच रंगली. श्री. छ. उदयनराजे 5 लाख 32 हजार 583 मते मिळवून ते निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जाधव यांना 2 लाख 35 हजार 68 मते मिळाली. बहुजन समाज पक्षाचे प्रशांत चव्हाण यांना 25 हजार 112, राष्ट्रीय समाज पक्षाचे भाऊसाहेब वाघ यांना 11 हजार 221 तर अपक्ष अलंकृता आवाडे-बिचुकले यांना 12 हजार 612 मते मिळाली होती.

अशा झाल्या होत्या कुरघोड्या... 

पुनर्रचनेनंतर 2009च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघ नव्याने अस्तित्वात आला. यादरम्यान माढ्यातील मोहिते-पाटलांमधील भाऊबंदकी उफाळून आली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावाचा आग्रह धरला गेला. त्यामुळे या मतदार संघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवली. तत्पूर्वी सातारा मतदार संघात बर्‍याच कुरघोड्या झाल्या. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीत येण्याअगोदर पवारांच्या विरोधात माढ्यातूनही स्वत:ची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर मात्र पवारांनी उदयनराजेंना पक्षात घेत बरेच प्रश्‍न निकाली काढले. शरद पवार यांच्याविरोधात रासपचे महादेव जानकर, शिवसेना -भाजपचे सुभाष देशमुख, अपक्ष जे.टी. पोळ यांनी निवडणूक लढवली. मात्र, पवारांनी दणदणीत विजय मिळवला.