Sat, Jul 11, 2020 14:25होमपेज › Satara › मिशीची फाईट पण कॉलरच टाईट 

मिशीची फाईट पण कॉलरच टाईट 

Published On: May 24 2019 2:28AM | Last Updated: May 24 2019 2:28AM
सातारा : प्रतिनिधी 

राज्यासह देशभरात नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा तडाखा काँग्रेस व  मित्रपक्षांना बसला असताना सातारा लोकसभा मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा तब्बल सव्वालाख मतांनी पराभव करून राष्ट्रवादीचा गड राखला. मिशी विरूद्ध कॉलर या लढाईत मिशीची फाईट पण कॉलरच टाईट असा शेवट झाला. उदयनराजेंच्या हॅटट्रीकने सातार्‍यात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. 

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी 2 हजार 296 मतदान केंद्रांवर 5 लाख 79 हजार 155 पुरूष व 5 लाख 30 हजार 277 महिला असे मिळून 11 लाख 9 हजार 434 मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला असून 60.33 टक्के मतदान झाले होते. मतमोजणीदरम्यान 23व्या फेरीअखेर उदयनराजे भोसले यांना 5 लाख 76 हजार 078 तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 49 हजार 661 इतकी मते मिळाली.  त्यामुळे  1 लाख 26 हजार 417 एवढ्या मताधिक्याने उदयनराजे विजयी झाले. 

उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी, उदयनराजे भोसले यांना 5 लाख 76 हजार 078, नरेंद्र पाटील 4 लाख 49 हजार 661, शैलेंद्र वीर  5 हजार 778, सहदेव ऐवळे40 हजार 418, पंजाबराव पाटील 5 हजार 107, आनंदा थोरवडे 6 हजार 791, दिलीप जगताप 5 हजार 10,  सागर भिसे 8 हजार 527, अभिजीत बिचुकले 2 हजार 384, आणि नोटा (नकाराधिकार) 9 हजार 106  अशी मते मिळाली.

सातारा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील, अपक्ष शैलेंद्र वीर, वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, बहुजन समाज पार्टीचे आनंदा थोरवडे, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीचे दिलीप जगताप,  अपक्ष  सागर भिसे, अभिजीत बिचुकले, हे 9 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.  

महाआघाडीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांनी पूर्वीपासूनच प्रचारात आघाडी घेतली होती.  प्रारंभीपासूनच एकतर्फी  वाटत असलेल्या या निवडणुकीत महायुतीकडून नरेंद्र पाटील यांची  उमेदवारी दिली गेली आणि उदयनराजेंसमोर कडवे आव्हान निर्माण झाले. दोन्हीही उमेदवारांनी जोरदार प्रचार करत निवडणूक रंगतदार बनवली. इतर उमेदवारांनीही त्यांच्या परीने प्रयत्न केले.  मात्र, उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील यांच्यातच खरी लढत झाली. सातारा लोकसभा मतदारसंघात काय घडणार? याची कमालीची उत्सुकता गेली महिनाभर त्यामुळे निर्माण झाली.  नरेंद्र पाटील हे  पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासाठी हा पहिलाच अनुभव असतानाही त्यांनी  अल्पावधीत प्रचार यंत्रणा उभी करुन मिळालेली मते  निश्‍चितच जास्त आहेत. सातारा अ‍ॅडीशनल एमआयडीसी येथील महाराष्ट्र फेडरेशनच्या गोडावूनमध्ये  गुरुवारी सकाळी 8 वाजता   जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व त्यांच्या सहकार्‍यांच्या उपस्थितीत मतमोजणीस सुरुवात झाली. पाहिल्यांदा पोस्टल मतदान, तसेच सैनिक व्होटर्सची (ईटीपीबीएस) मतमोजणी सुरु झाली. त्यानंतर पहिल्या फेरीची मते विधानसभा मतदारसंघनिहाय मोजण्यास सुरुवात झाली. पहिल्या फेरीच्या  निकालामध्ये उदयनराजे यांनी 8315 एवढया मतांची आघाडी घेतली.  

दुसर्‍या फेरीत  उदयनराजेंना 5205, तिसर्‍या फेरीत 5653, चौथ्या फेरीत 4536, पाचव्या फेरीत 7024, सहाव्या फेरीत 3893, सातव्या फेरीत 2256, आठव्या फेरीत 2690,  नवव्या फेरीत 265, दहाव्या फेरीत 724 असे मताधिक्य मिळत गेले. नवव्या फेरीनंतर उदयनराजेंचे मताधिक्य फेरीनिहाय  कमी होवू लागले. अकराव्या फेरीत तर विरोधी उमेदवार नरेंद्र पाटील यांना 1335 मते जास्त मिळाली. त्यामुळे जनतेला हा कल पुन्हा उलट सुरू होतो की काय? असे वाटू लागले. मात्र, 12व्या फेरीपासून उदयनराजेंनी पुन्हा मताधिक्य घेण्यास सुरूवात केली. 12व्या फेरीला 1674, 13व्या फेरीत  3729, 14व्या फेरीत 10655, 15व्या फेरीत 5780, 16व्या फेरीत 6682, 17व्या फेरीत 3533, 18व्या फेरीत 2350, 19व्या फेरीत 1276, 20व्या फेरीत 4064, 21व्या फेरीत 3618, 22व्या फेरीत 5709, 23व्या फेरीत 1575  असे फेरीनिहाय मताधिक्य मिळत राहिले आणि सरतेशेवटी 1 लाख 26 हजार 417 एवढे मताधिक्य मिळवत उदयनराजे विजयी झाले. 

सातारा विधानसभा मतदार संघात उदयनराजेंचा अपेक्षाभंग 

सातारा विधानसभा मतदार संघात उदयनराजेंना पाच वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 92 हजार 751 एवढे  मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही शिवेंद्रराजेंना या मतदार संघात चांगले लीड मिळाले होते. त्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत तर सातार्‍याच्या जनतेने उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीला झुकते माप दिले. सातारा, जावलीत खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांचा एकछत्री अंमल आहे. असे असताना उदयनराजेंना लोकसभा निवडणुकीत  फक्‍त 33 हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. विशेष म्हणजे वाई विधानसभा मतदार संघात 30 हजार, कराड उत्तर मतदार संघात 39 हजार, कोरेगाव विधानसभा मतदार संघात 33 हजार असे मताधिक्य असताना हक्काच्या सातारा विधानसभा मतदार संघात उदयनराजेंचे मताधिक्य 92 हजाराहून 34 हजारावर इतके कमी कसे झाले? याविषयी चर्चांना उधाण आले आहे. सातार्‍याच्या कमी मताधिक्याने उदयनराजेंचा अपेक्षा भंग झाला आहे. तो त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसला.  विशेष म्हणजे सातारपेक्षा  कराड उत्तरचे मताधिक्य जास्त आहे. वाईतून आ. मकरंद पाटील, कराड उत्तरेतून आ. बाळासाहेब पाटील व धैर्यशील कदम, कोरेगावातून आ. शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंना फार मोठी आघाडी मिळवून दिली. सातार्‍यातून मात्र खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांचे कथित मनोमीलन झाले असताना आकडेवारीत मात्र ते परावर्तित झाल्याचे दिसत नाही.