Tue, Aug 11, 2020 22:26होमपेज › Satara › रडीचा डाव खेळू नका; गांधी मैदानावर समोरासमोर या : उदयनराजे

रडीचा डाव खेळू नका; गांधी मैदानावर समोरासमोर या : उदयनराजे

Published On: Jun 16 2018 1:32AM | Last Updated: Jun 15 2018 10:54PMसातारा : प्रतिनिधी

विकासकामे करताना प्रत्येकवेळी त्यांचे लोक आडवे पडतात? त्यांच्याकडून प्रत्येकवेळी  ‘ना’ चा पाढा लावला जातो. त्यांच्या अशा विद्वान, अभ्यासू, हुशार, होतकरु लोकांकडून लोकांचे कल्याण होणार आहे का? पण मी कामे करण्यास खंबीर आहे.  सर्वसामान्य लोकांना उत्तरे देण्यास बांधिल आहे. कामे न केल्यास लोक मला दारात उभे राहू देणार नाहीत.  50-50 लाखांची जादा बिले काढली म्हणून सांगितले जात आहे. यातील काही सत्य असेल तर चर्चेचे सर्व साहित्य घेवून गांधी मैदानावर समोरासमोर या. रडीचा डाव खेळू नका, असे आव्हान खा. उदयनराजे यांनी आ. शिवेंद्रराजे यांना दिले. 

शहरात आज पोवई नाका ग्रेड सेप्रेटरचे काम, भुयारी गटार योजना, कास धरण उंची वाढविणे, घरकुल अशी विविध सुमारे 700 कोटीची कामे सुरू आहेत. पालिकेचे बजेट हे 150 कोटीचे असताना 700 कोटीची कामे पालिका इतिहासात कधीच सुरू झाली नव्हती. पाणी, कचरा असे प्रश्‍न घेवून आरोप करणे चुकीचे आहे. 50 वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून यापुढे पाणी लोकांना मिळणार आहे, असेही खा. उदयनराजे म्हणाले. 

खा. उदयनराजे म्हणाले, ज्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली त्या संस्थेसाठी राजघराण्याचेही मोलाचे योगदान आहे. केवळ राजघराण्यातील माझ्या नावाचे वावडे असेलतर आ. शिवेंद्रराजे तरी आवडतात, मग त्यांना संस्थेवर पवारसाहेबांनी घ्यायला हवे होते, असे माझे म्हणणे होते.  ज्यांना काही गंध नाही अशा लोकांना संस्थेवर घेतल्याने रयत एक प्राईव्हेट संस्था झाली आहे. जर रयत संस्थेवर शिवेंद्रराजेंना घेतले असते तर त्यांच्या संस्था जशा डबर्‍यात गेल्या तशी रयत संस्थाही डबर्‍यात घातली असती. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांना रयतवर घेतले नसावे, असा टोलाही खा.उदयनराजे यांनी हाणला. 

सातार्‍यातील  एमआयडीसी संदर्भात  विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, मी कधीही कुणाच्या द्वेषापोटी बोलत नाही. पूर्वी जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी एमआयडीसी दिली जायची. त्याच ठिकाणी कंपनी उभारायला परवानगी असायची. सातार्‍यातही मोठ्या नामवंत उद्योगपतींच्या कंपन्या होत्या. त्यावेळी माझे काका अभयसिंहराजे भोसले जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी या कंपन्या टिकवण्यासाठी लक्ष द्यायला हवे होते.त्यांनी या कंपन्यांचा विस्तार होवू दिला नाही. गावगुंड लोक युनियन करुन त्या कंपन्यांकडून पैसे घ्यायचे. अशाच लोकांना त्यांनी सहकार्य केले. त्यामुळे सातार्‍यातील एमआयडीसी बंद पडत गेली. सातार्‍याबरोबरच नगर जिल्ह्यातही एमआयडीसी सुरु झाली होती. नगरच्या एमआयडीसीची ओळख निर्माण झाली. पण सातार्‍याची एमआयडीसी ‘ट्रबल्ड एमआयडीसी’ म्हणून बदनाम झाली.

एलएनटी ही मोठी कंपनीसुध्दा याठिकाणी कंपनी सुरु करणार होती. पण त्यांनाही त्यावेळी पैसे मागिल्याने ते निघून गेले. अशा प्रकारांमुळे लोक सातार्‍यात यायला मागत नाहीत. बाबासाहेब कल्याणी तसेच शिर्के यांच्याशी माझी चर्चा झाली. सातार्‍यात किंवा तुमची जन्मभूमी असेल त्याठिकाणी कंपन्या सुरु करा म्हणून त्यांना सांगितले. जरंडेश्‍वर रेल्वेस्टेशनजवळ  150 ते 200 एकरावर बाबासाहेब कल्याणी यांच्याकडून मोठी इंडस्ट्री सुरु केली जाणार असून संरक्षण खात्यासाठी आवश्यक साहित्याची निर्मिती केली जाणार आहे.

स्वच्छता ठेक्यातील भ्रष्टाचाराचे पुरावे द्या : बनकर

सातार्‍यातील स्वच्छतेचा ठेका साशा कंपनीला देण्यात आला असला तरी या कंपनीवर स्थानिकांचा विचार करुन पूर्वीच्या सर्व घंटागाड्या कामावर घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या कंपनीला 60 लाखांचे जादा बिल दिले असून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांनी केलेला आरोप चुकीचा आहे. स्वच्छतेची बिले ही केवळ घंटागाडीची नसून त्यानुषंगाने केलेल्या कामांचीही आहेत. विरोधकांनी चुकीची, संदर्भहीन माहिती देवून सातारकरांच्या मनात गैरसमज परसरला आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याची माहिती साविआचे नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

सातारकरांची दिशाभूल करण्यासाठी ठेक्याच्या माध्यमातून डल्ला मारल्याचे आरोप विरोकांनी केले असून त्यांनी त्याबाबत पुरावे द्यावेत. साशा कंपनीला स्वच्छता ठेका देण्यामागे कोणताही हेतू नव्हता. या कंपनीला ठेका देताना स्थानिकांचा विचार करुन पूर्वीच्या 39 घंटागाड्या लागू करण्याचे बंधन घालण्यात आले. ओला व सुक्या कचर्‍याचे सेपरेशन केल्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे सोपे झाले आहे. खा.श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगाव कचरा डेपोवर 25 कोटींच्या घनकचरा प्रकल्पाच्या प्रोसेसिंग युनिटचे काम सुरु आहे.  स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 800 ते 900 लाभधारकरांना शौचालये देण्यात आली आहेत. शहरात सुरु असलेल्या विकासकामांकडे दुर्लक्ष करुन चुकीची माहिती देवून सातारकरांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे.