Wed, Jul 08, 2020 10:05होमपेज › Satara › खा. उदयनराजे -मुख्यमंत्री यांची भेट

खा. उदयनराजे -मुख्यमंत्री यांची भेट

Published On: Jun 25 2019 1:37AM | Last Updated: Jun 25 2019 1:37AM
सातारा : प्रतिनिधी

सातारा शहरातील ग्रेड सेपरेटर, भुयारी गटर योजना, कास धरण उंची वाढवणे अशा विविध विकासकामांसंदर्भात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तसेच अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची सोमवारी मुंबईत भेट घेतली. याच भेटीत त्यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्‍नांवरही चर्चा केली.

सातारा शहरात सुमारे 50 कोटींचे ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. त्याचबरोबर सातारा शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा भाग असलेले कास धरण उंची वाढण्याचे सुमारे 60 कोटींचे कामही हाती घेण्यात आले आहे. ही दोन्ही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. ग्रेड सेपरेटचे काम सध्या मंदावले आहे तर कास धरण उंची वाढवण्यासाठी निधीच्या पुढील टप्प्याची आवश्यकता आहे.  शहरात भुयारी गटर योजनेचे काम थांबले आहे.  सोनगाव कचरा डेपोवर घनकचरा प्रकल्पाचेही काम सुरु आहे. मात्र, या महत्वाकांक्षी योजनांना निधीची आवश्यकता आहे. निधी अभावी योजना रखडू नयेत, तातडीने निधी उपलब्ध  व्हावा, यासाठी खा. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री ना. दवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यांना विकासकामांसंदर्भात निवेदन दिले. या मागण्यांवर मुख्यमंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. त्याचबरोबर खा. उदयनराजे भोसले यांनी अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतही निधीसंदर्भात चर्चा केली. त्यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, कराडचे उपनराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव उपस्थित होते.