Wed, Jul 08, 2020 10:52होमपेज › Satara › सातार्‍यात उदयनराजेच; माढ्यात रणजितसिंह

सातार्‍यात उदयनराजेच; माढ्यात रणजितसिंह

Published On: May 24 2019 2:28AM | Last Updated: May 24 2019 2:28AM
सातारा : प्रतिनिधी

सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा तब्बल सव्वालाख मतांनी पराभव करून राष्ट्रवादीचे श्री. छ. उदयनराजे भोसले हे सलग तिसर्‍यांदा संसदेत गेले; तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांचा तब्बल  85 हजार 300 मतांची विजयी आघाडी घेतली. उदयनराजेंच्या हॅट्ट्रिकने सातार्‍यात, तर रणजितसिंहांच्या करिष्म्याने फलटणमध्ये जल्लोषाला उधाण आले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात 9 उमेदवारांनी नशीब आजमावले. मात्र, राष्ट्रवादीचे उदयनराजे व शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यामध्येच खरी लढत झाली.  पहिल्या फेरीपासून उदयनराजे मताधिक्य घेत गेले. शेवटच्या फेरीपर्यंत त्यांनी नरेंद्र पाटील यांच्यावर सुमारे 1 लाख 26 हजार 363 मतांची आघाडी घेतली. उदयनराजे यांना 5 लाख 75 हजार 978, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 49 हजार 615 मते मिळाली. उदयनराजे यांना गत लोकसभा निवडणुकीत सुमारे 3 लाख 66 हजार एवढे मताधिक्य होते. यावेळी मात्र हे मताधिक्य घटले आहे. पाटण व कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघांत नरेंद्र पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे, तर कराड उत्तर, कोरेगाव, सातारा व वाई या विधानसभा मतदारसंघांमध्ये उदयनराजेंना मताधिक्य आहे. पैकी सातारा विधानसभा मतदारसंघातील उदयनराजेंचे कमी मताधिक्य चर्चेचा विषय ठरले आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तर अटीतटीची झाली. 25 व्या फेरीअखेर भाजपचे रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांचा 85 हजार 300 मतांनी विजयी आघाडी घेतली होती. निंबाळकर यांना 5 लाख 76 हजार 852 मते पडली, तर संजय शिंदे यांना 4 लाख 91 हजार 552 मते मिळाली. 85 हजार 300 हजार मतांच्या फरकाने निंबाळकर हे निवडून आले आहेत. 

रणजितसिंह व संजयमामा यांच्यामध्ये पहिल्या फेरीपासून चुरस होती. कधी रणजितसिंह पुढे, तर कधी संजयमामा पुढे, असा पाठशिवणीचा खेळ आठव्या -नवव्या फेरीपर्यंत सुरू होता. मात्र, त्यानंतर रणजितसिंह निंबाळकर आघाडी घेत गेले व त्यांनी संजयमामा शिंदे यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर  यांच्यासाठी हा धक्‍कादायक पराभव मानला जात आहे; तर रणजितसिंहांच्या विजयाने विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. जयकुमार गोरे, शेखर गोरे, डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई अशा नेत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.