Tue, Jul 07, 2020 08:42होमपेज › Satara › उदयनराजे-शशिकांत शिंदेंची ‘अश्रूभरली’ गळाभेट

उदयनराजे-शशिकांत शिंदेंची ‘अश्रूभरली’ गळाभेट

Last Updated: Dec 04 2019 1:09AM
सातारा : हरीष पाटणे 
छत्रपती उदयनराजे भोसले व शशिकांत शिंदे हे दोघेही सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील महारथी. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीपासून दोघेही एकमेकांचे जीवलग दोस्त. मात्र, पक्षाची फाटाफूट झाल्यानंतर एकमेकांची जिरवायच्या नादात दोघांचीही जिरली. ‘दोस्त दोस्त ना रहा’  अशी अवस्था होऊन दोन्हीही महारथी पराभूत झाले. दीड महिन्याच्या अबोल्यानंतर शेंद्रे येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने समोरासमोर आल्यावर निवडणुकीतील ही दुश्मनी एका मिठीत गळून पडली, अश्रूंना वाट मोकळी झाली आणि दोस्ती पुन्हा जिंकली. ही अश्रूभरली गळाभेट जिल्ह्याच्या पुढच्या राजकारणात नवीन समेट घडविणार का? याविषयी आता कुतूहल आहे. 

छत्रपती उदयनराजे भोसले यांचा करिष्मा अफाट. अंगावर येईल त्याला शिंगावर घेण्याची त्यांची वृत्ती महाराष्ट्राला सुपरिचित. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हा ‘तोफगोळा’ आपल्याजवळ ठेवला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना  जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेतेमतंडळींचे आणि उदयनराजेंचे कधीच जमले नाही. त्यांचा कायम कोंडमारा होत गेला. उदयनराजेही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाला मोजत नव्हते. राष्ट्रवादीत असलेल्या उदयनराजेंची बाजू कायम लावून धरली ती एकट्या शशिकांत शिंदे यांनी. लोकसभेच्या तीनही निवडणुकांना उदयनराजेंना राष्ट्रवादीतून उमेदवारी देण्याचा आग्रह धरण्यामध्ये सर्वात पुढे शशिकांत शिंदेच होते.

पक्षातील आमदारांसह स्थानिक पदाधिकार्‍यांनी जेव्हा जेव्हा उदयनराजेंवर बहिष्काराचे हत्यार उपसले तेव्हा तेव्हा शशिकांत शिंदे त्यांच्याबरोबर सावलीसारखे राहिले. त्याचवेळी शशिकांत शिंदे यांच्या प्रत्येक विषयांमध्ये उदयनराजेंनी त्यांची बाजू लावून धरली.  लोकसभेला उदयनराजेंना शशिकांत शिंदेंनी मदत करायची आणि विधानसभेला शशिकांत शिंदे यांना उदयनराजेंनी मदत करायची असा दोघांचा ‘वारंगुळा’ होता.

शशिकांत शिंदे वगळता बाकीच्यांना आपला विरोध ही उदयनराजेंची देहबोली असायची.  पक्षांतर्गत विरोधक जे उदयनराजेंचे होते तेच शशिकांत शिंदे यांचेही होते. त्यामुळे दोघांची मैत्री घट्ट होत गेली. प्रसंगी पक्षातल्या आमदारांना शशिकांत शिंदे एक डोळा मारायचे त्यावेळी दुसरा डोळा उदयनराजेंना मारायचे पण वेळ मारून न्यायचे. त्याचा फायदा दोघांनाही राजकारणामध्ये होत होता. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे राहिलेल्या उदयनराजेंचा प्रचार शशिकांत शिंदे यांनी टिच्चून केला होता. राष्ट्रवादीत असताना उदयनराजे 1 लाख 26 हजार 528 मतांनी निवडून आले तेव्हा गुलाल एकट्या उदयनराजेंच्या अंगावर नव्हता तर तो शशिकांत शिंदे यांच्याही अंगावर होता. ‘मी म्हणजे शशिकांत शिंदे’ असे निवडणुकीपूर्वी उदयनराजे गरजले होतेच.

मात्र, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी विपरित घडले. भाजपची सत्ता राज्यात येणार असल्याने जिल्ह्याला निधी मिळवायचा असेल तर महाराज आपण भाजपमध्ये गेले पाहिजे असे ‘खूळ’ उदयनराजेंच्या डोक्यात काही ‘चिनपाटांनी’ घातले. अगोदरच रणजितसिंह ना. निंबाळकर, जयकुमार गोरे या त्यांच्या मित्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला होताच. त्यातच मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी तर उदयनराजेंसाठी जलमंदिरापासून पायघड्या अंथरल्या होत्या. भरीस भर शिवेंद्रराजे भोसले यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे उदयनराजेंनीही उचल खाल्ली. त्यांच्या दुर्दैवाने लोकसभेची व विधानसभेची निवडणूक एकावेळी आली.  

ज्यांनी सार्वत्रिक निवडणुकांवेळी उदयनराजेंच्या विरोधात बेंबीच्या देठापासून प्रचार केला होता ते त्यांच्याबरोबर फिरताना दिसू लागले. मात्र, ते नुसतेच फिरत होते, त्यांच्याकडे मतांची गोळाबेरीज नव्हती. दुसरीकडे ज्यांनी सार्वत्रिक निवडणुकीत उदयनराजेंचा प्रचार केला होता त्यांच्या विरोधात उदयनराजेंना फिरावे लागत होते.  दोन्ही निवडणुकांमधील अंतर तीन महिनेच होते, बोटावरची शाईसुद्धा वाळली नव्हती. स्वत:च्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा भाजप-सेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी उदयनराजेंनी कंबर कसली होती.  याउलट विधानसभेचे काही उमेदवार स्वत:पुरती मते मागत होते. भोळ्याभाबड्या उदयनराजेंना हे समजतच नव्हते. ‘दोस्त दोस्त होते है,  और दुश्मन दुश्मन.’  मात्र, वेळ निघून जात होती.

या घनघोर लढाईत कोरेगावची शिवसेनेची सीट अडचणीत असल्याचे उदयनराजेंना सांगण्यात आले आणि शशिकांत शिंदे यांच्या विरोधात उदयनराजेंनी जातीने लक्ष घातले.  सातारा तालुक्यातील उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात, कोरेगावात शशिकांत शिंदे यांच्याविरोधात एकतर्फी मतदान झाले. तशीच परिस्थिती उदयनराजेंच्याबाबतीही उद्भवली. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत. श्रीनिवास पाटील निवडून यावेत यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. जावली आणि कोरेगावात शशिकांत शिंदे यांना मानणार्‍या भागांमध्ये उदयनराजेंच्या विरोधात एकतर्फी मतदान झाले. 

ज्यांनी कठीणप्रसंगात एकमेकांना सोबत दिली, हातात हात घालून राजकारण वाढवले, तीन महिन्यांपूर्वी जे एका ताटात जेवले तेच विधानसभेची निवडणूक व लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दुश्मनासारखे वागले. संपूर्ण  राज्यात ज्या महारथींना बलाढ्य म्हणून ओळखले जाते ते दोघेच दुसर्‍यांसाठी उकर्‍या काढत होते, पक्षीय लढाई लढत बसले होते. राजकीय दुश्मनीने एवढे डोके वर काढले की जहरी पत्रकबाजी करून दोघांनीही एकमेकांना दुखवून ठेवले. या ‘सुंदोपसुंदीत’ दोघांचाही पराभव झाला. उदयनराजे व शशिकांत शिंदे पडले ही बातमीच मुळी राज्याच्या राजकारणात भूकंप होईल अशी होती. आता पराभवाच्या विश्‍लेषणात एकमेकांना दुषणे दिली जावू लागली, अबोला वाढत गेला. एक तर उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला, कोरेगावात शिवसेनेच्या महेश शिंदे यांना मदत केली. राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे पराभूत झाले. भाजपचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजेही पराभूत झाले आणि आश्‍चर्य म्हणजे उदयनराजेंनी जो पक्ष सोडला ती राष्ट्रवादी व उदयनराजेंनी ज्या पक्षाला कोरेगावात मदत केली ती शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र आली. यात उदयनराजे व शशिकांत शिंदे यांना मिळाले काय? उदयनराजेंच्याच भाषेत सांगायचे तर ‘इल्ला! ’

तब्बल दीड महिन्याच्या अबोल्यानंतर सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उदयनराजे व शशिकांत शिंदे समोरासमोर आले. एकमेकांना पाहून दोघेही गहिवरले, पक्षीय मतभेदांच्या भिंती गळून पडल्या, उदयनराजेंनी शशिकांत शिंदे यांना घट्ट मिठी मारली. ‘आता सोडणार नाही’ असेही उदयनराजे बोलले. तेव्हा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. निवडणुकांच्या धामधुमीत दुरावलेले दोन दोस्त पुन्हा एकत्र आले. दोन क्षण मनातले बोलले. योद्धांच्या विजयाचा आनंद गुलालात न्हावून निघाला होता तसेच एकमेकांच्या पराभवाचे सांत्वनही मिठीत विरघळताना सारा समाज पहात होता. जमलेला सारा माणूसमेळ या मिठीने भावूक झाला. दोघांनीही एकमेकांचे हात हातात घेतले. मात्र, या अश्रूभरल्या गळाभेटीत पक्षांतराने निर्माण झालेली राजकीय दुश्मनी  हरली आणि झालेल्या पराभवानंतरही खिलाडूवृत्तीमुळे दोस्ती पुन्हा जिंकली.  निर्माण झालेला हा समेट जिल्ह्याच्या राजकारणात नव्याने काही बदल घडवू शकतो का? हे पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे.