Fri, Jul 10, 2020 17:09होमपेज › Satara › मोदी लाट ओसरली, आता मोदीविरोधी लाट : अजित पवार

मोदी लाट ओसरली, आता मोदीविरोधी लाट : अजित पवार

Published On: Apr 03 2019 1:51AM | Last Updated: Apr 02 2019 10:55PM
सातारा : प्रतिनिधी

लोकांच्या मनात मोदींची लाट राहिलेली नाही. हे  काल वर्ध्याच्या सभेने स्पष्ट केले आहे. नंतर उन्हाचे कारण सांगितले गेले. आता इथली गर्दी बघा, आज काही ऊन नाही का? मोदी लाट  ओसरली आहे हे आजच्या गर्दीवरून स्पष्ट होत आहे. उलट मोदींविरोधात सर्वत्र लाट निर्माण झाली आहे. गेल्यावेळी केलेली चूक पुन्हा होता कामा नये. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामाला लागले पाहिजे. उदयनराजेंना विक्रमी मतांनी निवडून आणून महाराष्ट्रात इतिहास घडवायचा आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अजितदादा पवार यांनी केले.

महाआघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित केलेल्या रॅलीला संबोधित करताना अजित पवार बोलत होते.  यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण,  राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले, श्रीमंत शिवाजीराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. बाळासाहेब पाटील,  आ. आनंदराव पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम आदि प्रमुख उपस्थित होते. 

यावेळी आ. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत केलेल्या टिकेला उत्‍तर दिले. ते म्हणाले,  सातारा लोकसभा मतदार संघातील जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो. कारण एवढे कडक ऊन असतानाही तुम्ही सर्वजण इथे आला आहात. आजची गर्दीच सर्वकाही सांगून जात आहे. निकाल काय लागणार हे सांगायला जोतिषाची गरज नाही.  देशात एक नंबर मतांनी उदयनराजे निवडून येतील, असेही आ. अजित पवार म्हणाले. 

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, खा. उदयनराजे पूर्वीपेक्षा रेकॉड ब्रेक मते मिळवून विजयी होतील असे हा  जनसमुदाय पाहून वाटते.  देशात जातीयवादी पक्षाने थैमान घातल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. आपल्याला हे जातीयवादी सरकार उलथवून टाकण्यासाठी 2014 ला झालेली चूक पुन्हा करायची नाही. पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. नोटाबंदीमुळे शेतकरी, छोटे व्यापारी देशोधडीला लागले, अशी टीकाही त्यांनी केली.

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, पाच वर्षांपूर्वी तुम्ही बहुमत दिले, पण काय झाले? अभिनय करून मते मिळवली पण सरकारने  दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. गरीबांच्या खात्यावर 15 लाख का आले नाहीत? नोटाबंदी करून सर्वसामान्यांकडून पैसे काढून घेतले.   शेतकरी, छोटे व्यापारी अडचणीत आले. ऑनलाईन खरेदीमुळे व्यापारी वर्ग अडचणीत आला . पाच वर्षाच्या काळातच मोठ्या प्रमाणावर शेकर्‍यांंच्या आत्महत्या झाल्या आहेत.  देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. भाजप सरकारने एकाच माणसाला तेल, गॅस विकला, उद्या हेच लोक आपल्या नद्या विकतील. त्यांची मन की बात ऐकलीत आता त्यांना जन की बात ऐकवा, असेही त्यांनी सुनावले. 

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील मतदार शरद पवारांच्या विचारांनी एकत्र आलेला आहे. त्यामुळे विजय आपलाच आहे. शेतकर्‍यांच्या विकासासाठी शरद पवारांच्या विचाराला मत द्या, असे  आवाहन त्यांनी केले. 

अजितदादा-उदयनराजे मनोमीलन

उदयनराजेंचा अर्ज भरण्यासाठी अजितदादा सातार्‍यात आले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अजितदादा उदयनराजेंच्या रॅलीतही सामील झाले. गेली अनेक वर्षे अजितदादा- उदयनराजे यांच्यामध्ये मतभेद असल्याचे सांगितले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसात दादा आणि राजे यांच्यामध्ये दिलजमाई घडून यावी यासाठी दोघांचेही कॉमन मित्र प्रयत्न करत होते. त्याला उदयनराजेंच्या रॅलीदिवशी यश आले आणि अजितदादा उदयनराजेंच्या रॅलीत सहभागी झाले.एवढेच नाही तर देशात प्रथम क्रमांकाने उदयनराजे निवडून येतील असे सांगून अजितदादांनी या मनोमीलनात एक पाऊल पुढे टाकले. उदयनराजेंनीही आपल्या भाषणात अजितदादांचा आदरपूर्वक उल्लेख केला. मतभेद होते पण मतभेदानंतर प्रेम वाढते असे सांगून उदयनराजेंनी जवळीक वाढली असल्याचे संकेत दिले. पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उदयनराजे जाणार असल्याचे संकेतही मिळाले आहेत. 

शशिकांत शिंदेंचा उखाणा

विरोधकांना धडकी भरेल अशी गर्दी आहे. ही विजयाची रॅली आहे.  जिल्ह्यातील मतदारांनी पुन्हा इतिहास घडवून दाखवावा. सातार्‍यात मोदी नाही तर शरद पवार आणि उदयनराजेंची लाट चालते हे पुन्हा एकदा दाखवून द्या.  सातार्‍यात मोदी पेढा...सातारा जिल्हा उदयनराजेंवर वेडा. नो नरेंद्र नो देवेंद्र ओन्ली उदयेंद्र, हे पुन्हा एकदा दाखवून द्या, असे आवाहनही आ. शिंदे यांनी  केले.