सातारा : प्रवीण शिंगटे
सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात 3 लाख 52 हजार 76 हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत 1 लाख 56 हजार 692 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. अद्यापही 1 लाख 95 हजार 384 हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने पेरणी केलेली पीके वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकर्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
मागील वर्षाच्या तीव्र दुष्काळानंतर जूनच्या शेवटच्या व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने सर्वत्रच जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. पश्चिम भागातील शेतकर्यांनी धुळवाफेवर पेरण्या केल्याने या पिकांना पावसाचा चांगला फायदा झाला तर काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने सर्वच ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. काळवट जमिनीला वाफसा न आल्याने या पेरण्या लांबल्या होत्या. त्याठिकाणी पेरण्यांनी वेग घेतला त्यामुळे शेतशिवारे गजबजून गेली आहेत.
आता मात्र पावसाने पुन्हा ओढ दिली असल्याने अत्यल्प पावसावर उगवून आलेली पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहेत. महागडे बी-बियाणे खरेदी करून शेतकर्यांनी पेरण्या केल्या असल्या तरी येत्या 8 दिवसात पाऊस न पडल्यास पेरणीसाठी केलेला शेतकर्यांचा खर्च वाया जाण्याची भिती आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांवर ओढावणार असल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडणार आहे.
सातारा तालुक्यात 47 हजार 800 सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी 9 हजार 149 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीचे 19.14 टक्के क्षेत्र आहे. जावली तालुक्यात 20 हजार 642 सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी 9 हजार 36 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. पेरणीचे क्षेत्र 43.77 टक्के आहे. पाटण तालुक्यात 65 हजार 642 सर्वसाधारण क्षेत्रापैकी 45 हजार 298 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. पेरणीचे 69.01 टक्के क्षेत्र आहे.
कराड तालुक्यात 66 हजार 546 सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी 31 हजार 427 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. पेरणीचे क्षेत्र 47.23 टक्के आहे. कोरेगाव तालुक्यात 33 हजार 423 सर्वसाधारण क्षेत्रापैकी 15 हजार 269 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. पेरणीचे 45.68 टक्के क्षेत्र आहे.खटाव तालुक्यात 34 हजार 605 सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी 21 हजार 334 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. पेरणीचे 61.65 टक्के क्षेत्र आहे. माण तालुक्यात 25 हजार 279 सर्वसाधारण क्षेत्रापैकी 13 हजार 773 हेक्टरवर पेरणी झाली असून पेरणीचे 54.48 टक्के क्षेत्र आहे.फलटण तालुक्यात 21 हजार 481 सर्वसाधारण क्षेत्रापैकी 3 हजार 167 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून पेरणीचे 14.74 टक्के क्षेत्र आहे. खंडाळा तालुक्यात 11 हजार 347 सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी 159 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून पेरणीचे 1.40 टक्के क्षेत्र आहे.वाई तालुक्यात 21 हजार 365 सर्वसाधारण क्षेत्रापैकी 5 हजार 385 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून पेरणीचे 25.20 टक्के क्षेत्र आहे. महाबळेश्वर तालुक्यात 3 हजार 946 सर्वसाधारण क्षेत्रापैकी 1 हजार 898 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून पेरणीचे 48.10 टक्के क्षेत्र आहे.
जिल्ह्यात भात 21 हजार 575, ज्वारी 14 हजार 495, बाजरी 19 हजार 642, मका 6 हजार 337, नाचणी 2 हजार 268, तुर 889, उडीद 1 हजार 888, मूग 4 हजार 111, भुईमूग 24 हजार 15, तीळ 29, सुर्यफूल 95, सोयाबीन 36 हजार 898, कारळा पिकाची 340 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून 4 हजार 559 हेक्टर क्षेत्रावर उसाची लागण झाली आहे.