Thu, Jul 09, 2020 07:45होमपेज › Satara › मेढा-महाबळेश्‍वर रस्त्यावर शेकडो वृक्षांची कत्तल

मेढा-महाबळेश्‍वर रस्त्यावर शेकडो वृक्षांची कत्तल

Last Updated: Dec 04 2019 1:09AM
मेढा : वार्ताहर
मेढा ते महाबळेश्‍वर रस्त्यावर  गवडी ते चिंचणीपर्यंत  ठेकेदाराने शेकडो वृक्षांची कत्तल केली असून रस्ताच बोडका झाल्याने पूर्वी रस्त्याला लागून असलेल्या काही वृक्षांच्या ओळखीमुळे गावांना ओळखले जायचे. पण आता हजारोंच्या संख्येने झालेल्या  वृक्षतोडीमुळे गावांचे गावपण लयाला गेल्याचे चित्र  ठिकठिकाणी दिसत आहे. मूळातच मेढ्यात बेकायदेशीरपणे महावितरणच्या कामाचा सपाटा लावला असून त्या कामासाठी व रस्त्यासाठी एकच ठेकेदार असल्याने बेकायदेशीरपणे वृक्षांची कत्तल सुरु आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून या संपूर्ण कारभाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. रोडवे सोल्युशन नावाची ठेकेदार कंपनी या रस्त्याचे काम करीत आहे. संबंधित ठेकेदाराची मनमानी सुरु असून बेकायदेशीरपणे वृक्षांची कत्तल सुरु आहे. महावितरणच्या कार्यालयांकडून बेकायदेशीर मंजुरी घेऊन हॉट मिक्सिंगचा प्‍लॅन्ट काढण्याचा उद्योग ज्यांनी चालविला आहे तेच पुन्हा या भानगडीत असल्याचे समोर येत आहे. 

गवडी येथे सर्वाधिक झाडांची कत्तल
गवडी येथे तब्बल 105 झाडांची कत्तल झाली आहे तर करंजे 59, सावली 40, मामुर्डी 38, चोरांबे 27, जवळवाडी 29, आगलावेवाडी 26, बिभवी 48, रिटककवली 42, ओझरे 57, भणंग 23, केसकरवाडी 17, केंजळ21, मोरावळे 56, अशा शेकडो झाडांची कत्तल काही दिवसांतच झाली आहे.

पिढ्यानपिढ्या सावली देणारे वृक्ष संपले
वास्तविक मोळाच्या ओढ्यापासून पुढे आल्यानंतर माळेवाडी- चिंचणी, कण्हेर, मोरावळे, ओझरे, रिटकवली, बिभवी, मेढ्यापर्यंत रस्त्यांच्या दुतर्फा असलेले मोठमोठे वृक्ष पिढ्यानपिढ्या पादचार्‍यांना सावली व निवारा देत उभे होते. मेढा -महाड हा मार्ग आता राज्य महामार्ग म्हणून विकसित होणार आहे. पण, मोठ्या प्रमाणावर तोडल्या गेलेल्या झाडांच्या जागी दुसरी झाडे लावण्याचे किंवा पुनर्लागवडीचे निर्बंध न घातल्यामुळे हा रस्ता उजाड झाला आहे. पूर्वजांची साक्ष सांगणारी मोठमोठाली झाडे पाडल्याने तालुक्यातून वड,पिंपळाची झाडे हद्दपार होणार आहेत.  सातारा व जावली तालुक्यात वृक्षतोडीचा मनमानी कारभार सुरु आहे.

विकासाच्या नावाखाली मनमानी कत्तल
एक झाड तोडायला अवघा तास पुरतो. मात्र, ते वाढण्यासाठी काही दशके वाट पाहावी लागतात, याचे गांभीर्य कधी तरी समजून घेतले पाहिजे. विकासाच्या नावाखाली संबंधित ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरू आहे. अनेक झाडे गरज नसताना तोडली जात आहेत. त्यामुळे मेढा-महाबळेश्‍वर रस्त्याचे रस्तेपणही हरवले आहे.

रस्त्याचे नैसर्गिक सौंदर्य लुप्त
सातारा ते महाबळेश्‍वर मार्गावर पुरातन काळापासून असलेल्या वड,पिंपळ, बाभूळ, सवर, आंबा, जांभूळ, निलगिरी, सूबाभूळ, करंज, उंबर, चिंच, लिंब, सागवान अशा शेकडो झाडांची कत्तल झाली आहे. ही झाडे तोडण्याचे काम दोन सप्ताहापूर्वी झाले असून रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडे तोडल्याने रस्ते बोडके झाले आहेत.  या मार्गाचे आता महामार्गात रूपांतर होणार आहे, मात्र वृक्षतोडीमुळे रस्त्याचे नैसर्गिक सौंदर्य लुप्त झाले आहे.

८० ते १०० वर्षांची जुनी झाडे उद्ध्वस्त
मेढा- महाबळेश्‍वर रस्त्यावरील तब्बल 588 डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली. ही झाडे 80 ते 100 वर्षे जुनी होती. त्यामुळे काही झाडे पुनर्रोपण करुन ती वाचविता आली असती. काही झाडांना पुनर्रोपनाच्या माध्यमातून जीवनदान मिळाले असते,परंतु इच्छाशक्‍तीचा अभाव येथे दिसून आला. रस्ते बांधकामासाठी सर्रास झाडांचा बळी घेतला जात आहे.  मेढा -महाबळेश्‍वर रोडवरील वाढत्या वाहनांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय शासनाने एक वर्षांपूर्वी घेतला. या निर्णयामुळे वाहतूक सुलभ होणार असली तरी झाडांची अमाप कत्तल करण्याचे काम सुरु असल्याने पर्यावरणप्रेमी नाराज झाले आहेत. मंजूर झाडे कापण्याबरोबर ज्या झाडांची रस्त्याला अडचण नाही, अशी झाडेसुद्धा मोठ्या प्रमाणात तोडण्यात आली आहेत. सर्व नियमांना बगल देऊन स्वतःला हवे तेच करून घेण्यात पटाईत असलेल्या ठेकेदारांनी पाच, दहा नव्हे तब्बल 588 झाडे तोडली आहेत.

अनेक ठिकाणी गावांच्या नावाचे फलक, रस्त्यांवरील अपघातांच्या जागा दाखविणारे सूचनाफलक गायब झाले आहेत.  मूळ रस्ता 40 ते 65 फूट रुंद होणार आहे. परंतू, मुळ रस्ताही नादुरुस्त झाल्याने वाहनांना ये- जा करण्यासाठी सातारपर्यंत तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यावर पक्के बांधीव दुभाजक नसल्याने अचानक कोठेही नियम मोडून वळणार्‍या वाहनांमुळे अपघातांचा धोका निर्माण होत आहे.