Sun, Jul 12, 2020 19:34होमपेज › Satara › बसस्थानकात खासगी वाहनांचा सुळसुळाट

बसस्थानकात खासगी वाहनांचा सुळसुळाट

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 06 2017 8:57PM

बुकमार्क करा

सातारा : सुशांत पाटील

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सातारा बसस्थानकात आता खासगी वाहनांची रेलचेल असून खासगी वाहने कोठेही उभी केल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.  दरम्यान, अनेकदा खासगी वाहनांच्या घुसखोरीमुळे  बसस्थानकात वाहतूक कोंडी होत असून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

सातारा बसस्थानकात सध्या खासगी वाहनधारकांचा सुळसुळाट सुरु आहे. दुपारी व सायंकाळच्या कॉलेज सुटण्याच्या वेळेत तर अनेक रोडरोमियो बसस्थानक आपल्या घरचेच असल्याचा अविर्भावात येतात आणि डायरेक्ट बसस्थानकाच्या फलाटाशेजारीच वाहने लावतात. त्यामध्ये अनेकदा फोरव्हिलरही असतात. 

खरं तर खासगी वाहनांना  बसस्थानकात 100 मी. अंतरापर्यंत  पूर्णपणे बंदी आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर सेक्युरिटी नसल्यामुळे प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे वाहनधारक आपली वाहने बसस्थानकात घुसवत आहेत. त्यामुळे बसेसच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बसस्थानक परिसरात लावलेल्या दुचाकीस्वारावर वाहतूक पोलिस कारवाई करतात खरे पण नियमाविरुध्द बसस्थानकात डायरेक्ट घुसखोरी करणार्‍यावर का कारवाई होत नाही? असा सवाल आता प्रवासी विचारु लागले आहेत. 

रात्रीच्या वेळी तर तेथे खाजगी वाहतुकदारांचीच मक्तेदारी असते. बाहेरील खासगी वाहनांचे एजंट बसस्थानकात येऊन तेथील प्रवासी चक्क पळवतात. बसस्थानकात सुरक्षारक्षक नसल्यामुळेच खासगी वाहनधारकांवर  वचक नसल्याची बाब पुढे आली आहे. बसस्थानकात घुसखोरी करणार्‍यावर कारवाई करण्याची मागणी एसटी कर्मचारी आणि प्रवाशांकडून होऊ लागली आहे.

पार्किंगस्थळ नेहमीच असते ‘हाऊसफुल्ल’

सातारा बसस्थानकाबाहेर टू व्हीलर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र, हे वाहनतळ कायमच हाऊसफुल्ल असते. तरीही काही वाहनधारक त्या वाहनतळातून बाहेर पडणार्‍या रस्त्याच्या मधोमधच वाहने पार्क करतात. त्यामुळे  वाहनधारकांना पार्किंग करायला  जागाच भेटत नाही. अशा स्थितीत वाहनधारक आपली वाहने डायरेक्ट बसस्थानकातच लावतात.