Sat, Sep 26, 2020 23:17होमपेज › Satara › उदयनराजेंच्या ‘कॉलर’ला  शरद पवार हात घालणार का?

उदयनराजेंच्या ‘कॉलर’ला  शरद पवार हात घालणार का?

Published On: Sep 22 2019 1:35AM | Last Updated: Sep 21 2019 10:41PM
सातारा : हरीष पाठणे

लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहिलेल्या उदयनराजे भोसले यांच्या ‘कॉलर’ उडवण्याच्या स्टाईलची दस्तुरखुद्द शरद पवारांनीही प्रशंसा केली. मात्र, उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर आता राज्याच्या दौर्‍यावर असलेले शरद पवार प्रत्येक ठिकाणी उदयनराजेंचा समाचार घेवू लागले आहेत. रविवारी छत्रपतींची राजधानी असलेल्या सातार्‍यात येत असलेले शरद पवार इथे येऊन उदयनराजेंवर थेट तोफ डागणार का? त्यांच्या ‘कॉलर’ला हात लावणार का? याविषयी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कुतुहल आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना उदयनराजेंनी अनेकदा ‘पक्ष गेला खड्ड्यात’, ‘बारामतीकरांनी जिल्ह्याचे पाणी पळवले’ असे थेट वार करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमीच घरचा आहेर दिला होता. मात्र, शरद पवारांनी कधीही उदयनराजेंवर टिका टिप्पणी केली नव्हती. विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर व उदयनराजे यांच्या वादातही पवारांचे झुकते माप उदयनराजेंच्याच पारड्यात असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून पवारांनी नेहमीच उदयनराजेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्मान ठेवला.  उदयनराजेंनी पक्षात असताना पवार वगळता कोणाचाही मुलाहिजा ठेवला नव्हता.

लोकसभेच्या निवडणुकीआधीपासून उदयनराजेंची ‘कॉलर’ गाजते आहे. ‘एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नही सुनता’ असा डायलॉग फेकत दोन्ही हाताने ‘कॉलर’ उडवत ‘स्टाईल इज स्टाईल’ म्हणणार्‍या उदयनराजेंचा संचार सगळीकडे दिसू लागला. जाहीर सभांमध्ये, टी. व्ही. चॅनलवरील मुलाखतींमध्ये, जाईल तिथे उदयनराजेंची कॉलर बातमीचा विषय होत होती. त्यांच्या या कॉलरची अजिंक्यतारा कारखान्याच्या सभेत रामराजेंनीही थट्टा उडवली होती. ‘एक कॉलर वर करतो आणि दुसरा इजार’, असे म्हणत रामराजेंनी तोफेला बत्ती दिली होती.

उदयनराजे भाजपच्या दिशेने झुकू लागले होते आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता तेव्हाही त्यांच्या वाढदिवसाला येवून आपल्या आमदारांची नाराजी ओढवून पवारांनी उदयनराजेंची भलावण केली होती. राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीचा पेचप्रसंग निर्माण झाला तेव्हा ‘मी असताना सगळे सरळ होते अगदी ‘कॉलर’सुद्धा सरळ होते’, असे म्हणत शरद पवारांनी स्वत:ची कॉलर उडवत उदयनराजेंना चिमटा काढला होता. 
प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यानंतर राजेंची कॉलर जाईल तिथे फडकू लागली. मोदी-शहांवर टिका, केंद्रातील व राज्यातील अस्वस्थता, चुकीचे आर्थिक धोरण असे मुद्दे घेवून उदयनराजे सभांमध्ये सरतेशेवटी हमखास कॉलर उडवायचे. कराडच्या प्रचाराच्या शुभारंभात तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांनीच उदयनराजेंचे भाषण संपल्यावर आपल्या स्वत:च्या हाताने त्यांची कॉलर उडवली. शरद पवार उदयनराजेंवर एवढे बेहद्द खुश दिसले की उदयनराजेंनाही गुदगुल्या झाल्या. पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी उदयनराजेंची कॉलर स्वत:च्या हाताने उडवली. मात्र, त्याच पवारांच्या हाताला तीन महिन्यांनी 440 व्होल्टचा करंट बसला. पक्षातल्या आमदारांना डावलून ज्यांच्यावर प्रेम केले त्या उदयनराजेंनीच पवारांना ‘टांग’ मारली. सातार्‍यातील सांगता सभेत उदयनराजेंच्या साक्षीने ‘अमित शहा काय उखड काय उखडायची ते’ असे शरद पवार म्हणाले होते. त्याच अमित शहांच्या डोक्यावर उदयनराजेंनी पगडी ठेवून पक्ष बदलल्याने शरद पवार कमालीचे अस्वस्थ आहेत. 
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर पवार कमालीचे आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. मिर्झाराजे जयसिंगच्या सांगण्यावरुन महाराज दिल्‍लीला, आग्र्‍याला  गेले. पण सन्मान होत नाही हे दिसताच ते परत माघारी आले. त्यांनी तडजोड केली नाही, असा दाखला देत पवारांनी महाराष्ट्रातील प्रत्येक दौर्‍यात उदयनराजेंवर थेट वार करायला सुरुवात केली आहे. राजेरजवाड्यांमुळे  लोकांचे फारसे कल्याण होत नाही, असेही पवार एका मुलाखतीत बोलून गेले आहेत.
सातार्‍यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर पगडी ठेवली. त्यामुळे भारावलेल्या फडणवीसांनी यापुढे ‘छत्रपतींच्या आदेशाने राज्यकारभार करु’, असे विधान केले.  लोकसभेच्या निवडणुकीवेळी ‘घराच्या भिंतीवर रोज खडूने लिहा की उदयनराजे पडणार आणि मी त्यांना पाडणार’ असे म्हणणारे महसूलमंत्री चंद्रकांतदादा तर उदयनराजे भाजपमध्ये आल्यावर उदयनराजेंपुढे कमरेत वाकले. त्यावर राज्यातून टिका टिप्पणी सुरु झाली. पवारांनी त्यावरही बोट ठेवले. ‘यांच्या’ आदेशाने राज्यकारभार करु म्हणणारे राज्याला कुठल्या दिशेने नेत आहेत. त्याचे परिणाम लवकरच दिसतील, असे म्हणत पवारांनी पुन्हा एकदा उदयनराजेंवरच निशाणा साधला आहे.
2009 च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सातार्‍यात एकसे बढकर एक उमेदवार होते. तेव्हा पवारांनी उदयनराजेंना आयात करुन पक्षात घेतले. उमेदवारी दिली. सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या सभेत त्यांच्या हातात तलवार दिली आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा हा खोंड तासाला धरुन चालल्याशिवाय राहणार नाही,’ असे जाहीर विधान पवारांनी केले. आता उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर पवारांनी नेमक्या त्याच विधानाला शेलका बाज दिला आहे. ‘बैल तासाला सरळ न चालता आडवा तिडवा चालू लागला तर मालक त्याचा बाजार करतो, पक्षांतर करणार्‍या अशा बैलांना येत्या निवडणुकीत बाजार दाखवा’, असे विधान करुन पवारांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. पक्षांतर करणार्‍यांना  थेट अंगावर घेवून पुन्हा शिंगावर घेण्यासाठीच शरद पवार अशी आक्रमक विधाने करत आहेत. त्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चेतवण्याचे काम होत आहे. 
 सातारा ही छत्रपतींची राजधानी. सातारा शरद पवारांचा तसाच सातारा उदयनराजेंचाही. ज्या सातार्‍यात शरद पवारांना उदयनराजेंच्या कॉलरची भुरळ पडली होती त्याच  सातार्‍यात आज येत असलेले शरद पवार उदयनराजेंच्या कॉलरला हात घालणार का? त्यांच्या पक्षांतरावर जाहीर सभेत भाष्य करणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.